19/10/2020
*सुसंस्कृत ... !!!*
एक श्रीमंत घरातली तरुण आणि सुशिक्षित व्यक्ती...
घरातील भांडणामुळे घर सोडले. घराबाहेर पडल्यावर एक्सीडेंट झाला, यामध्ये त्याचा डावा पाय गुडघ्यातूनच काढावा लागला.
पुण्यातील एका फुटपाथवर "तो" निराधार राहतो. स्वतःहुन भीक मागत नाही, पण कुणी दुस-यानं दिलं तर खातो. एकुण काय ... ? तेच !
आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी एका बोटाचा आधार त्याला हवा होता. "कुणीतरी" त्याची माझी भेट घालुन दिली. अर्थातच मी त्याला माझे दोन्ही हात दिले... !
येत्या काही दिवसात त्याला आपण कृत्रिम पाय आणि व्यवसाय टाकून देणार आहोत. तशी तयारी सुद्धा सुरू केली आहे. कळवेनच याबाबत नंतर...!
तर, भारावून जाऊन एके दिवशी माझे हात हातात घेऊन म्हणाला, 'सर आता मी तुमच्यासाठी काय करू सांगा ?'
तेव्हा मी म्हणालो होतो, 'रक्तदान करशील का ? तुझ्या एक बाटली रक्तामुळे किमान तीन जणांचे प्राण वाचतील... !'
यावर तो हसत म्हणाला होता, 'सगळंच रक्त मी द्यायला तयार आहे... 3 कशाला 30 लोकांचे प्राण वाचू दे की... !'
आज शुक्रवार ! ठरलेला रक्तदानाचा दिवस...
आज याला घेऊन आलो रक्तदानासाठी.
बिल्डिंग मध्ये आम्ही लिफ्ट ची वाट बघत बसलो. याला ते मंजूर नव्हतं... !
कुबड्या बाजूला ठेवून, एकेका पायरीवरून अक्षरशः सरपटत हा ब्लड बँकेत निघाला आणि पोचला देखील...
याने रक्तदान तर केलंच, पण दर चार महिन्यांनी मरेपर्यंत मी रक्तदान करणार हे वचन दिलं... !
माझ्या प्रेमाखातर, केवळ एका शब्दाखातर इतका त्रास घेवुन हा इथवर आला, रक्तदान केलं... काय म्हणू याच्या प्रेमाला ?
तरीही त्याला विचारलं, 'का करावंसं वाटलं तुला रक्तदान ?'
म्हणाला, ' घरच्यांनी साथ सोडल्यावर रस्त्यावरच्या लोकांनी साथ दिली, समाजानेच मला जगवलं... या समाजाचं मी सुद्धा काहीतरी देणं लागतो... आज हे ऋण फेडण्याचा माझा प्रयत्न ! अशा पद्धतीने ते मला फेडता येईल असं वाटलं नव्हतं...' त्याच्या डोळ्यात आता पाणी होतं... बाहेर आभाळही झाकोळलं होतं !
याच्या आणखी एका वाक्याचं मला कौतुक वाटतं. एकदा म्हणाला होता, 'माझा व्यवसाय चांगला चालायला लागल्यावर कामावर कुणाला ठेवायची वेळ आली तर मी माझ्यासारख्याच एखाद्या निराधार मुलाला काम देईन सर ! जसा तुम्ही मला हात देत आहात तसा मी सावरल्यावर दुसऱ्यालाही हात देवुन बघणार ... !' यावेळी पाऊस माझ्या डोळ्यांत होता.
एखाद्याने हात देऊन आपल्याला खड्ड्यातून बाहेर काढलं तर बाहेर आल्यावर आपणही आपला हात देवून दुसऱ्याला बाहेर काढायचं असतं.... त्याच्या या विचारांनी मीच भारावून गेलो होतो... !
माझ्या रक्तदानामुळे तीन माणसांचे जीव वाचतील या साथीच्या काळात, या विचाराने त्याने आज रक्तदान केलं... !
याच्यातल्या माणसाला सलाम करू ?
की याच्या जिद्दीला प्रणाम करू ?
की घासातला घास काढून देण्याच्या याच्या मानसिकतेला नमस्कार करू ?
भुक लागली की खाणे... ही झाली प्रकृती !
दुसऱ्याचं ओरबाडून खाणे... ही झाली विकृती !!
पण घासातला घास काढून दुसऱ्याला भरवणे ही आहे संस्कृती !!!
अशा या *सुसंस्कृत* माणसाला साष्टांग नमस्कार घालण्या शिवाय माझ्या कडे दुसरं उरतच काय ?
माझा साष्टांग नमस्कार स्वीकार रे बाबा !!!
शुक्रवार 16 आॕक्टोबर 2020
*डाॕ. अभिजीत सोनवणे*
*डाॕक्टर फाॕर बेगर्स*
*सोहम ट्रस्ट, पुणे*
*abhisoham17@gmail.com*
*www.sohamtrust.com*
*Facebook : SOHAM TRUST*