11/01/2022
*मणक्यांचे विकार व बस्ती चिकित्सा -*
डॉ. वैभव गवळी
आयुर्वेदानुसार सर्व मणक्यांचे विकार हे वात विकारात समाविष्ट केलेले आहेत. मणक्याची झीज होणे, मणके सरकने, मणक्यातील गादी दाबली जाणे, मणक्यात शिर दबणे, मणक्यावर सूज येणे, असे विकार होतात. त्यामुळे कंबर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, किंवा आखडणे. हाताला, पायाला बधिरता येणे, मुंग्या आल्यासारखे वाटणे, मणक्यात चमक निघणे,हातापायात वेदना होणे, हातात व पायात ताकद कमी वाटणे, मणक्यावर सुज येणे, डोके दुखणे, यासारखी लक्षणे दिसतात.
आयुर्वेदानुसार अति प्रवास, अतिश्रम, क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलणे, एकाच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने खूप वेळ बसणे, तसेच वात वाढविणाऱ्या रुक्ष पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करणे, (उदा. रताळे, हरभरा डाळीचे पदार्थ, बेकरीचे, मैद्याचे पदार्थ) हाडांना व शरीराला पोषक अशा पोषण मूल्यांचे शरीरात कमतरता असणे,( calcium, vit.D,) यामुळेही अस्थींची झीज होऊन मणक्यांचे विकार उद्भवण्यास सहाय्य होते. तसेच बऱ्याच वेळा इतर आजार जसे आमवात, वातरक्त( गाऊट), संधिगतवात यांच्या परिणाम स्वरूपातही मणक्यांचे विकार उद्भवतात. आयुर्वेदानुसार उपचार करताना आजाराचे योग्य निदान होणे आवश्यक असते. आयुर्वेदानुसार धातूक्षयज व अवरोध जन्य असे दोन प्रकारांनी मणक्यांचे विकार होतात. या दोन्ही प्रकारात बस्ती ही शोधन प्रक्रिया अतिशय उत्कृष्ट आहे. बस्ती केल्याने वातदोष कमी होतो, पचन सुधारते, हाडांची झीज भरून येते व लक्षणेही लवकर कमी होतात. याबरोबरच स्नेहन, स्वेदन, कटीबस्ती, मन्याबस्ती, रक्तमोक्षण, अग्निकर्म ही पंचकर्मे देखील उपयोगी ठरतात. त्याचबरोबर वात कमी करणारे व हाडांची झीज भरून काढण्यासाठी आयुर्वेद औषधे घेतल्यास कायमस्वरूपी त्रास कमी होतो.मणक्यांच्या विकारात योगासने, प्राणायाम,चालणे, विशिष्ट मणक्यांचे व्यायाम फायदेशीर असतात. परंतु ते योग्य मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे. अशा रुग्णांनी गाईचे दूध, तूप, मोड आलेली धान्य यांचा वापर नित्य आहारात करणे आवश्यक आहे. रताळे, साबुदाणा यासारखे जड पदार्थ, हरभरा डाळी सारखे वातूळ पदार्थ, अपचन करणारे बेकरीचे पदार्थ, कुरकुरे, वेफर्स ,शीळे, रुक्ष पदार्थ खाणे टाळावे.
मणक्यांचे विकार होऊ नये म्हणून देखील स्नेहन, स्वेदन व बस्ती यासारखे पंचकर्म उपयुक्त ठरतात
डॉ वैभव गवळी
तेजसेवा आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, बाबा कॉम्प्लेक्स, कोर्ट रोड, कोपरगाव