04/09/2023
*वजन कमी करायचं खुळ*
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग
3 सप्टेंबर 2023.
वजन कमी करायचंच हाये, हे कोणत्या आरोग्य शास्त्रात लिहिलंय ?
ही नको ती खुळं पाश्चात्य विचारावर आधारीत डाॅक्टर, तत्सम डायेटीशीयन्स ललना आणि जिम इन्स्ट्रक्टर महोदय वारंवार सांगत असतात.
एकच चुकीची गोष्ट वारंवार सांगितली की ती खरी वाटायला लागते. हा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. त्यामुळेच वजन कमी करायलाच हवं हा अत्यंत चुकीचा सिद्धांत प्रस्थापित झाला आहे.
परवा एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या वयोगटातील रुग्णांनी दवाखान्यात येऊन हीच मागणी केली की माझं वजन कमी होत नाही, वजन कमी करायचंच आहे. यात विशेष म्हणजे आघाडीवर सर्व महिला आघाडीच होती. एक मुलगी चौदा वर्षाची होती, एक बावीस वर्षाची होती तर एक चक्क बासष्ट वर्षाची होती. आणि त्यात बासष्ट वर्षाच्या वैद्य होत्या. सर्वांचा हट्ट एवढा की वजन कमी करायचंच आहे.
वजन का कमी करायचंय ? असं विचारल्यावर मात्र उत्तर कुणाकडेही नव्हतं. घाबरत घाबरत उत्तर येत होतं.. "सगळेच म्हणतात ना वजन कमी करायचंय म्हणून !?"
आता याला काय म्हणावं ? 🤨
नरवीर तानाजी मालुसरेंनी कधी वजन कमी करण्याचा अट्टाहास धरला नव्हता, ना शूरवीर बाजीप्रभुंनी ! ना पंचपांडवापैकी भीमांनी.
म्हणूनच मी याला *वजन कमी करण्याचं खुळ* म्हणतो. वजनावर आपली प्रतिकारशक्ती अवलंबून असते. जगण्याची उमेद जशी मनावर अवलंबून असते, तशीच ती वजनावर पण अवलंबून असते.
आणि वजनदार माणसांची भारताला गरज आहे; बडाघर पोकळ वाश्यांची नाही. नेहेमीच ताकदवान असणं आवश्यक आहे; जाड असणं नाही.
आमचे माननीय पंतप्रधान पहा, नाहीतर गृहमंत्री ! एकदम फीट. ना वजन कमी करण्याचा आटापीटा; ना कधी आजारी दिसलेत.
असो.
तर मी काय लिहित होतो, वजन का कमी करायचं, या प्रश्नाचं प्राॅपर उत्तर कुणालाच सांगता येत नव्हतं. एकानं बीएमआय चं पालुपद रटवलं, तर एकानं हार्ट एटॅक होईल म्हणून मत व्यक्त केलं तर काहीजणाना फिटनेस हवा असतो, तर काही ~जणांना~ जणींना छत्तीस चौवीस छत्तीसचं आकर्षण असतं.
पुरूषांना मात्र यातलं कोणतंही कारण मनापासून पटत नाही. "मला वजन कमी करायचंय" म्हणून सांगायला पुरूष फारच कमी संख्येने येतात. त्यांना उलट बाॅडी बिल्डींग करायची असते. भरदार छाती, पिळदार शरीर, डौलदार चाल आणि पोटावर सहा बिस्किटं असली की यांची आयुष्याची सगळी मेहनत कामी येते, असं यांना उगीचच वाटत असते. माझ्या लहानपणी कधी अमिताभ, धर्मेंद्र, शत्रुघ्न, शशीकपूर, गब्बरसिंग संजीवकुमार कधी सिक्सपॅकच्या मागे लागले होते, असं दिसलं नाही. यांचे उघड्या छातीचे फोटो कुठल्याही मासिकाच्या कव्हरपेजवर दिसले नाहीत. पण सल्लू, संजय, शारुखच्या जमान्यापासूनच्या तरुणाईला सिक्स पॅकचं जाम वेड लागलंय. जीम जाॅईन केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. त्याची फी एडजेस्ट करायला बापाला आणि जीमच्या वेळेला जेवणाची वेळ एडजेस्ट करायला मातोश्रीचं वजन कमी होत रहातं, हा भाग वेगळा.
महिलांच्या सौंदर्य स्पर्धातून हे खुळ, भारतीय तरुणींच्या नेत्री उतरवलं जातं. भले भविष्यात सगळे सांधे खिळखिळे झाले तरी बेहत्तर, भले गालफटं खाली बसली तरी चालतील, पण माझं वजन उतरवायचंच आहे, या भ्रमात ती आपली प्रतिकारशक्ती कमी करून घेतेय, हे लक्षात येईपर्यंत तिच्या हाडाची काडं झालेली असतात.
आणि डोसक्यावरील केसांची रया तर पार बिघडून गेलेली असते. शरीरातील स्निग्धपणा कमी झाल्याने थायराॅईडची पातळी देखील बिघडायला लागते आणि आयुष्यभर ती गोळी पण संगतीला येते.
शरीराचा स्निग्धपणा कमी करून चालत नाही. सांध्याचे वंगण, आतड्यातील ओलेपणा, डोळ्यातील तेज, नखांची चमक, त्वचेची मार्दवता, केसांची लकाकी, हाडांचा मजबूतपणा, काम झेपण्याची कार्यकारी शक्ती इ सार्या गोष्टी या शरीरातील वजनाशी, स्निग्धत्वाशी जुळलेल्याच असतात. ही चेन ब्रेक झाली की आरोग्याचे पुढील मणी, फिटनेसच्या माळेतून, गळायला सुरवात झालीच म्हणून समजा.
या नादात व्हिटामिन ए, बी, बी6, बी12, सी, डी, डी 2, इ. ते अगदी पार झेड पर्यंत सर्व रिपोर्टस देखील बिघडायला सुरवात झालेली असते. जे मिळवायचं आहे ते सोडून, ही विकतची दुखणी मात्र भरल्या खात्या पित्या घरात ओढवून आणतोय, हे लक्षातच येत नाहीये.
वजन आणि जाडी या दोन वेगळ्याच गोष्टी आहेत. फुग्यात हवा भरली तर फुग्याची जाडी वाढेल. पण वजन वाढणार नाही. आणि हवा काढून टाकली तर जाडी कमी होईल, पण वजनात एवढुसा पण फरक होणार नाही.
तसंच शरीराचं आहे. वात भरलेला असेल तर फक्त जाडी वाढलेली दिसेल, पण चरबी वाढलेली असेल तर वजनात देखील वाढ दिसेल.
काय असायचं ते असूदेत, जे जिथे अतिरिक्तपणे वाढलंय, ते तिथून जेवढं कमी व्हायला हवंय तेवढंच कमी करायचं असेल तर, कोणताही डाएट प्लान न पाळता, फक्त प्रदक्षिणा आणि लोटांगणं घालावीत. परिणाम नक्कीच दिसतो.
जेवढं वजन त्याच संख्येत लोटांगण आणि वजनाच्या निम्म्या संख्येत प्रदक्षिणा.
पहिल्यांदा प्रदक्षिणा नंतर लोटांगणं.
प्रदक्षिणा उभं राहून दोन्ही दिशेत... उलट सुलट आणि लोटांगण झोपून एकाच दिशेत. एकाच ठिकाणी गोल गोल लोळलात तरी चालेल, नाहीतर एका भिंतीपासून समोरील भिंतीपर्यंत लोळत गेलात तरी चालेल. पण परत लोळत येताना मात्र जिथे डोकं होतं त्या दिशेत पाय आणून, दिशा बदलून, लोटांगण घालत परतावे. म्हणजे एकाच कुशीने वळत लोटांगणं पूर्ण होतील.
लोटांगण घालताना खाली मऊशार गादी नसावी तर, घट्ट पृष्ठभाग असावा. फरशी, जमिन, वाळू, लाॅन, टेरेस, बाल्कनी, खिडकी कट्टा, दिवाण, बाक, इ.इ. कुठेही लोटांगण घातली तरी चालतील. माझ्या एका रुग्णेच्या कामवाल्याबाईने तर पहाटे लवकर उठून, तिच्या झोपडीच्या समोरील डांबरी रस्त्यावर लोटांगण घालून स्वतःची जाडी दोन महिन्यात पाच इंच कमी केली. इच्छा असली की अन्य कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही, हे खरे !
आणि उभं राहून प्रदक्षिणा घालायला, कोणत्याही ठिकाणची दीड बाय दीड फुटची जागा पण पुरते.
हे अस्सल भारतीय व्यायाम प्रकार करताना सुरवातीला थोडीशी चक्कर येईल, पोटात ढवळेल, पडल्यासारखं वाटेल, वाटूदेत. उलटी झाली तर अवश्य करावी. नंतर पाच सहा दिवसात हे त्रास पण कमी होत जातात. हलकेपणा येतो. मुख्य म्हणजे वजन कमी न होता पोटाची जाडी, आकार कमी होतो. सीट, मांड्या, दंडाचा आकार कमी होतो. त्यासाठी हे पाचही अवयव मिमी मध्ये टेलर टेपने मोजून ठेवावेत. एक महिन्याने पुनः मोजावेत, म्हणजे खरा फरक समजेल. उगाचच शंका घेत रहाण्यापेक्षा प्रत्यक्ष करून पहा म्हणजे परिणाम दिसेल. नंतर स्वानुभव शेयर करा.
आणि जाड असणं हा देखील गंभीर गुन्हा असल्याप्रमाणे वाटून घेत, स्वतःला विनाकारण नैराश्याच्या गर्तेत लोटू नका.
अशी पराभूत मानसिकता असलेल्या व्यक्तींचे रिपोर्टस देखील थोडेफार बदललेलेच येतात. याना फॅटी लिव्हर, बाॅर्डरवर साखर, पित्ताशयात खडे, गर्भाशयात गाठ, किंवा एखाद्याला मानेतली काखेतली अथवा स्तनातील गाठ, किडनीत खडा अथवा पोटातच काहीतरी गोळा वगैरे आढळून येतो. कोणताही त्रास नसताना फक्त रुग्णांना घाबरवणारे असे रिपोर्टस, थेट रुग्णांच्या हाती कशाला देतात कोण जाणे ?
यामागील रहस्य कधी कळलं नाही.
आमच्या विशाखाताई आणि
निर्मितीताई यांची जाडी ( किंवा वजन देखील) त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आड कधी आलेले पाहिलेले नाही. किती स्वच्छंदी, आनंदी दिसतात. आणि त्यांच्या रंगमंचावरील हालचालीमधे देखील किती सहजपणा असतो ना ! त्यांच्या अभिनयाकडे लक्ष गेले तरी त्यांची जाडी अथवा वजन आपल्या डोळ्यांना पण दिसत नाही.
ताकद, मजबूती, आपली कार्यकारीशक्ती, प्रतिकारक्षमता, आपले व्यक्तिमत्त्व इ. विसरून आपली फिगर, सिक्स पॅक, बीएमआय, वजन ऊंची इ. च्या मोहातून वेळीच बाहेर पडायला हवं. नाहीतर नको ते पथ्य पाळायच्या "हट्टाहासात" आहारातील विविध रसांचा आस्वाद घेण्याऐवजी विविध वासांच्या कृत्रिम गोळ्यांवर जगायची वेळ येऊ नये, म्हणजे मिळवली.
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग
जनहितार्थ प्रसारीत,
कुणालाही नाहक बदनाम करण्यासाठी हा लेख लिहिलेला नाही. नाहीतर जाणीवपूर्वक पोलीस कलम 500 लावतील. 😝