10/10/2023
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?.....
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस !
मन म्हणजे काय याच्या बऱ्याच व्याख्या आपण वाचल्या असतील. वैद्यकीय भाषेत मनाचं स्वास्थ्य आणि त्याचं महत्त्व काय यावर बरेच लेख आपण नेहमीच वाचत असतो.
आपल्या शरीरातील मन नावाचा हा अवयव मात्र दाखवता येत नाही. त्याच्या भावभावनांची अनुभूती फक्त येते.
मन हे अथांग समुद्रासारखं आहे. त्याच्या तळाशी अनेक मौल्यवान रत्नं दडलेली आहेत. त्याचप्रमाणे या सागराच्या पोटात कचरा सुद्धा साठलेला असतो. हा कचरा म्हणजे नकारात्मक भावना. एखादं निमित्त पुरतं आणि मनाच्या सागराला उधाण येतं. अशावेळी भावनांचा कडेलोट होतो आणि मनात साठलेला कचरा शब्दरुपाने बाहेर पडतो. अश्रू सुद्धा झरझर वाहू लागतात. आणि एकप्रकारे मनावर साठलेलं ओझं हलकं करतात.
पण काही प्रसंगात भावना गोठतात, अश्रू आटून जातात. अशावेळी ती व्यक्ती कोणत्याही प्रकारे व्यक्त होत नाही. अगदी जिवंत पुतळाच जणू! इथे समुपदेशनाची हळुवार फुंकर खूप उपयोगी ठरते. वर्षानुवर्षे एखाद्या नकारात्मक भावनेशी झगडणाऱ्या व्यक्तीला हवा असतो विश्वासाने आपले म्हणणे ऐकणारा एक आधार!
समुपदेशक हा तटस्थ असतो. तो फक्त उपाय सुचवतो, मार्ग दाखवतो. पण शेवटी त्या मार्गावर वाटचाल मात्र आपल्यालाच करायची असते. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत कोणताही उपदेश मग तो हितकारक का असेना, तो स्विकारण्याची अवस्थाच नसते. म्हणून काही वेळा समुपदेशनाबरोबरच औषधं सुद्धा गरजेची असतात. या औषधांमुळे तुफानी वादळासारख्या घोंगावणाऱ्या भावना काबूत येतात. मन स्थिर आणि ग्रहणशील झालं की मग विवेकीपणे विचार करणं शक्य होतं.
आजकाल टेन्शन, डिप्रेशन, स्ट्रेस, स्पर्धा, जगण्याचा भरधाव वेग, नातेसंबंधात येणारा दुरावा, विभक्त आणि नॅनो कुटुंब हे सगळे घटक जगणं कठीण करतायत. यासोबतच सोशल मीडिया आणि त्याचा अनिर्बंध वापर हा देखील मनःशांती बिघडण्यासाठी कारणीभूत आहे.
अशावेळी आपल्या मनाची अर्थात भावनांची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. त्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक भावना कोणत्या हे समजून घेतले पाहिजे.
प्रेम, आनंद, काळजी घेणे, आदर, परोपकार, समजून घेणे अर्थात शेअरिंग आणि केअरिंग या सुखद, सकारात्मक भावना आहेत. याविरुद्ध द्वेष, मत्सर, संताप, भीती, लाज, अपराधीपणा, एकाकीपणा, उपेक्षा, अनादर अशा अनेक नकारात्मक भावना आहेत.
जगताना संपूर्ण सुखी किंवा पूर्णतः दुःखी अशी व्यक्ती कधीच नसते. आपल्या आयुष्यात काही जमेच्या बाजू तर काही उणीवा असतात. फक्त मानवी मनाची प्रवृत्ती अशी आहे की आपला फोकस माझ्याकडे काय नाही इथेच जास्त असतो. एकदा हे समजलं की मग जाणीवपूर्वक माझ्याकडे काय आहे हे मनाला विचारावं. आपली बलस्थानं लक्षात आली की त्यावर काम करावं, मेहनत घ्यावी. यात मनाला गुंतवले की मग नकारात्मकता पूर्वी इतकी सलत नाही हे नक्की!
REBT (Rational Emotive Behaviour Therapy) अर्थात विवेकनिष्ठ भावना व वर्तन पद्धती ही मानसोपचारातील एक उपचार पद्धती आहे. यात आपल्याला भावभावनांचे नियमन कसे करावे हे शिकवले जाते. या उपचार पद्धतीचे जनक आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस. त्यांचं आयुष्य म्हणजे अनेक भावनिक दृष्ट्या हतबल करणाऱ्या प्रसंगांची मालिकाच आहे. त्यातून समन्वय साधून चांगल्या गोष्टी कशा पहाव्यात आणि संतुलित, विवेकपूर्ण विचार कसा करावा हे त्यांनी सांगितले आहे.
आयुर्वेदात तर मन आणि शरीर यांचा एकत्रितपणे विचार केलेला दिसतो. एवढेच नव्हे तर यापलीकडे जाऊन आत्मा या विषयी सुद्धा सखोल विवेचन केले आहे. म्हणजे आधुनिक विज्ञान जिथे physical, mental, emotional health असा विचार करते तिथे हजारो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रात spiritual aspect चा देखील विचार केलेला आहे. याचबरोबर योगशास्त्र सुद्धा मनाचे सशक्तीकरण करणारे आहे. प्राणायाम, ध्यानधारणा यामुळे भावनांचे नियंत्रण योग्य प्रकारे करता येते.
भगवद्गीता काय किंवा ज्ञानेश्वरी काय यात जगण्याचा जो मार्ग सांगितलेला आहे त्याचा आधार ' विवेक ' हाच आहे. आपल्या कडे एक अतिशय सुंदर म्हण आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी ! विपरीत बुद्धी म्हणजे अविवेकी वागणे, त्यातून येणारी संकटे आणि परिणामस्वरूप होणारा मानसिक त्रास तसेच शारिरीक, सामाजिक, कौटुंबिक सर्व पातळ्यांवर येणारी अस्वस्थता!!!
म्हणून आजच्या world mental health day च्या निमित्ताने मनाशी मैत्र साधूया !
आपल्या भावना ओळखणे, त्यासाठी न लाजता मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशक यांची मदत घेणे यात कोणताही कमीपणा मानू नये.
मानसिक आरोग्य याविषयी असणारी अनास्था निदान स्वतःच्या कुटुंबापुरती तरी दूर करुया. तरच सुदृढ मन असणारा समाज निर्माण होईल. आत्महत्या, नैराश्य हे आधुनिक युगातील विकार आहेत. आणि यांच्याशी लढण्यासाठी निकोप मन, भक्कम आधार देणारे सुहृद तसेच विवेकपूर्ण विचार करणारा समाज या मुलभूत गरजा आहेत.
बऱ्याच वेळा मानसिक आजारातून पूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्तीला समाज संपूर्णपणे स्वीकारत नाही ही वस्तुस्थिती आहे.
मन मनास उमगत नाही,आधार कसा शोधावा या अवस्थेपासून प्रगल्भ होत होत आपण मनाच्या या टप्प्यावर यावे की जिथे आपलं आयुष्य सत्य, सुंदर, मंगलमय, प्रार्थना असावी.
देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य, सुंदर, मंगलाची नित्य हो आराधना
दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना
भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना
सत्य, सुंदर, मंगलाची नित्य हो आराधना.
©Dr Shilpa Samant
Watch this amazing Marathi songs 'Mana Tujhe Manogat' from the Marathi movie 'Kalat Nakalat', Directed by Kanchan Nayak and Produced by Smita Talwalkar. Song...