10/04/2020
आयुर्वेद दिनचर्या काही दिवस पाळू या.
*डॉ प्रो पवार आनंद एम*
*एम डी ( पंचकर्म ) जामनगर. गुजरात*
*डी ए एम ( जर्मनी)*
आयुर्वेद शास्त्रात स्वास्थ्य टिकविण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचे वर्णन सविस्तर आले आहे. सद्य स्थिती मध्ये याचे पालन आरोग्यासाठी शक्य आहे.
दिनचर्या - म्हणजे दिवसभरात करावयाच्या गोष्टी ज्या पूर्वी केल्या जायच्या, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काय करावे आणि काय नाही याचे वर्णन आयुर्वेद शास्त्रातील मूळ ग्रंथांमध्ये आलेले आहे.याठिकाणी ज्या गोष्टी आजच्या काळात करावयास शक्य आहेत त्या गोष्टी मी साध्या भाषेत आपणास सांगत आहे. नक्की पालन करा.एक विलक्षण अनुभव होईल आणि आरोग्य प्राप्ती ही होईल.
१- ब्राह्म मुहूर्तावर उठावे म्हणजेच सकाळी ४.४५ ते ५.३० दरम्यान उठावे ,यामुळे शरीरातील विविध ऊर्जा स्त्राव कार्यरत होतात. मन प्रसन्न होते.
२. चेहरा थंड वा गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा
३- मलमुत्र विसर्जन - चेहरा स्वच्छ धुऊन झाल्यानंतर मलमूत्र विसर्जन करून घ्यावे ते करत असताना मुद्दाम वेग काढू नये किंवा जोर करू नये.मल विसर्जन योग्य होत असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मलमूत्र विसर्जन झाल्यानंतर हात पाय स्वच्छ धुऊन घ्यावेत.
४ - दात घासणे - तिखट, कडू , तुरट रसांच्या वनस्पतींच्या काड्यांनी दात घासावे विशेषतः वडाची, कडुलिंबाची, बाभूळ, खदिर किंवा करंजाची काडी यासाठी आपण वापरू शकतो साधारणता यापैकी कुठल्याही वनस्पतीची काडी थोडीशी मधामध्ये बुडवून त्याद्वारे ही दातांवर घासल्यास अतिशय चांगला उपयोग होतो. शक्य नसल्यास आयुर्वेद दंतमंजन जे उपलब्ध असेल त्याचा वापर करावा.
५- जिव्हा निर्लेखन - म्हणजेच जीभ घासून स्वच्छ करणे.त्यासाठी मऊ अशा धातूची पातळ तार अथवा मृदू वनस्पती ची काडी याचाही वापर यासाठी करू शकतो.यामुळे जिभेवरील मळ कमी होतो ,जीभ स्वच्छ होते.
६ - गंडूष - गुळण्या करणे, गरम पाण्यामध्ये हळद चूर्ण व थोडेसे मीठ टाकून त्याद्वारे गुळण्या कराव्या त्यासोबतच उपलब्धता असल्यानंतर खदिर चूर्ण, त्रिफळा चूर्ण यांच्या काढ्याने देखील गुळण्या कराव्यात. शक्य झाल्यास तिळतेल गरम करून ते देखील तोंडामध्ये फिरवावे , म्हणजेच त्याच्या गुळण्या कराव्या त्यामुळे हिरडे मजबूत होतात ,मुखातील जखमा कमी होतात ,दात मजबूत होतात, चेहरा ही मजबूत होतो आणि मुखदुर्गंधी दूर होते.
७ - कवल धारण - सुगंधी द्रव्य विशेषतः सुपारी, लवंग ,दालचिनी ,जायफळ ,कापूर, नागवेलीचे पान यापैकी एक ,दोन अथवा मिश्रण करून ते मुखामध्ये धारण करावे यामुळे तोंडातील व्रण, दुर्गंधी, चिकटपणा नाहीसा होईल,मुख शुध्दी होते.
८- व्यायाम - यथाशक्ती व्यायाम करावा.चालणे ,सूक्ष्म व्यायाम , सूर्य नमस्कार , दोरी वरच्या उड्या, एरोबिक्स इत्यादी. व्यायाम केल्यामुळे शरीर व अंग हलके होते , मांस पेशी बलवान होतात, अग्नि म्हणजेच पचनशक्ती वाढते , अतिरिक्त मेदाचा क्षय होतो आणि शरीर बलवान होते.व्यायाम अर्ध शक्ती करावा.सध्या व्यायाम घरी करावा यात नित्य प्राणायाम, आसन, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार याचा समावेश असावा...उन्हाळा असल्याने व्यायाम जास्त करू नये..
९ - उद्वर्तन / लेप - म्हणजेच वनस्पती चूर्ण द्वारे शरीरावर लेप करणे अथवा औषधी वनस्पतीच्या चूर्ण द्वारे शरीरावर मर्दन करणे यासाठी आपण त्रिफळा , दारूहळद ,चंदन , यष्टिमधु ,वेखंड ,मंजिष्टा , लोध्र, अनंतमूळ चूर्ण आदींचा वापर त्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचे पीठ अथवा मसूर डाळीचे पीठ टाकून करू शकतो यामुळे दुर्गंधी कमी होते ,त्वचा वर्ण सुधारतो अनावश्यक चरबी कमी होते.
१० - अभ्यंग - उद्वर्तन वा पावडर मसाज झाल्यानंतर तिळतेल अथवा तत्सम औषधी तेल विशेषतः बला तेल याद्वारे शरीरावर मर्दन करावे म्हणजेच मसाज करावा ,मसाज करत असताना विशेषतः डोक्यावर आणि पायांच्या तळव्यावर नित्य करावा .नियमित अभ्यंग केल्याने थकवा दूर होतो, वार्धक्य दूर टाळले जाते ,अंगदुखी, सांधेदुखी, मांस पेशी संकोच दूर होतो, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, मांस पेशी सुदृढ आणि बलवान होतात ,झोप चांगली लागते आणि नेत्र शक्ति वाढते.
११- स्नान - शरीर परिमार्जन म्हणजे अंघोळ करणे
अभ्यंग झाल्यानंतर गरम पाण्याने शरीर परिमार्जन म्हणजेच शरीर शुद्धीसाठी स्नान करावे.पाण्यात कडुनिंबाची पाने व थोडी हळद वापरणे उत्तम.स्नान केल्यामुळे शरीर जडता, अंग गौरव, शरीर दुर्गंधी, खाज कमी होतात ,थकवा दूर होतो, पचनशक्ती वाढते .आयुर्वेद शास्त्रात स्नानाला उर्जास्कर तथा वृष्य सांगितले आहे.स्नान पश्चात आपल्या धर्मानुसार पूजा करावी,अर्चना करावी.
१२- अंजन आणि नस्य - शक्य असल्यास डोळ्यांना अंजन लावावे, त्यामुळे डोळे स्वच्छ होतात, नेत्र शक्ती वाढते. नस्य म्हणजे नाकात औषधी तेल सोडणे . २/२ थेंब कोमट तीळ तेल अथवा गायीचे तूप नाकात सोडल्याने सर्दी ,डोकेदुखी, कमी होते , केस गळणे पिकणे कमी होते, स्मृती वाढते,निद्रा येते आणि बरेच फायदे होतात.
१३ - धूम पान - आयुर्वेद शास्त्रात वर्णित वनस्पतींना जाळून त्याचा धूर नाकाने व तोंडाने ओढला जातो .यासाठी इलायची,अगरु, तेजपत्र, दालचिनी, गुग्गुळ, राळ, नागरमोथा, ज्येष्ठमध, लवंग ,जटामांसी आदींचा वापर केला जावू शकतो या एक व अनेक वनस्पतींना एकत्र करून पेस्ट करावी आणि ती सुकल्यानंतर त्याला जाळून त्याचा धूर घ्यावा छोट्या नळी चा वापर करून.,यामुळे सर्दी, डोकेदुखी, खोकला, घसा दुखणे, केस गळणे, डोके जड होणे आदींवर चांगला उपयोग होतो.
१४- भोजन - स्नान झाल्यावर भूक लागली असता सहा रसांनी युक्त, गरम, स्निग्ध ,योग्य मात्रेत , जास्त न बोलता ,जास्त न हसता, जास्त घाई न करता आपल्या प्रकृती अनुरूप,योग्य ठिकाणी ,योग्य साधना सह, मन लावून आहार सेवन करावे.
आहारामध्ये आवर्जून, मूग आणि उडद डाळ,मटकी , दूध ,तूप, लोणी, खडीसाखर, कारले,दोडका,भोपळा, शेवगा, पडवळ, मेथी,पालक ,कांदा, लसूण ,हळद , चुका, राजगिरा, पान कोबी ,सुरण, बीट , तींडा , तोंडली,घोळ, काकडी ,भेंडी, आले, खोबरे, तांदुळजा काळयामनुका ,खारीक ,बदाम ,अंडी, यांचा वापर करावा.
फळे खावीत, पाणी भरपूर प्यावे,
टाळावे - अती तिखट आणि तेलकट पदार्थ, जड अन्न, शिळे अन्न, बेकरी प्रॉडक्ट्स, तंबाखू, दारू आणि तत्सम पदार्थ.
१५ - भोजन पश्चात शतपावली करून वामकुक्षी घ्यावी .मात्र लगेच झोपू नये, झोप घ्यावयाची असल्यास जेवणानंतर २ तासांनी घ्यावी. सध्या दुपारी झोपणे चांगले त्याने उष्ण ऋतू मुळे येणारा थकवा दूर होतो.
१६- यानंतर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी चर्चा करावी , कुटुंबासोबत वेळ घालवावा.
१७ - आपले रोजचे काम करावे परंतु सध्या तरी घरी राहणे गरजेचे त्यामुळे दिवस घरी घालवावा.
१८- सद्वृत - सात्विक जीवन शैली, आयुर्वेदात दहा पाप कर्मे सांगितली असून ती वर्ज्य करावी असे सांगितले आहे,
हिंसा, चोरी, व्यभिचार, द्वेष, अप्रिय, असत्य असंबंध बडबड, इतरांना नाश करण्याची बुध्दी, मत्सर, शास्त्र विरूद्ध विचार यांचा त्याग करावा.
गरीब,व्याधीत आणि दुःखी लोकांना मदत करावी,
हितकारक ,प्रिय ,अल्प आणि प्रसंगोचीत बोलावे.
इंद्रियांवर विजय मिळवावा त्यांच्या अधीन जावू नये.
नित्य नख,केश काढावे, मलद्वारे स्वच्छ ठेवावीत.
स्वच्छ वेष धारण करावा .तोंड झाकल्या शिवाय शिंक अथवा जांभया देवू नये. कायिक वाचिक आणि मानसिक क्रिया थकण्यापुर्वी बंद कराव्या.
त्याग: प्रज्ञापराधानां इंद्रियोपशं स्मृती: |
देशकालआत्मविज्ञानं सदवृत्तस्य अनुवर्तनं |
१९ - निद्रा - रात्री लवकर झोपावे साधारणतः ९.३० १० पर्यंत झोपावे,झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना तील तैल चोळून झोपणे त्यामुळे झोप शांत येते आणि नेत्र शक्ती वाढते.योग्य निद्रा झाल्यास दिवस भरातील शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो.
निद्रायत्त सुख दुखं पुष्टी : कार्श्य बलाबलम्|
वृषता क्लीबता ज्ञानं अज्ञानं जिवितं न च |
२० - गृह धुपण - शक्य असल्यास निंब ,करंज ,पिंपळ, वड , गुगुळ ,राळ ,धूप, कापूर, लवंग आदींचा घरी धूप करावा म्हणजेच या वनस्पतींना एकत्र करून गोवऱ्यासह जाळून घरात फिरवावे.
विशेष औषधी योग - तुळशीच्या पानांचा रस १ चमचा + गुडूची रस १ चमचा + हळद १/२ चमचा + आले रस १ चमचा + २ चमचे मध रोज सकाळी सेवन करावे.
वरीलपैकी जे जे शक्य असेल ते रोज करावे सध्या वेळ आहे . आपली आरोग्यदायी जीवनशैली हीच होती पूर्वी ,आजच्या या घडीला याचे पालन करणे शक्य आहे जमेल तेवढे करा,त्यामुळे शारीरिक आणि मानसिक समाधान मिळेल आणि आरोग्य प्राप्ती होईल ,व्याधिक्षमत्व वाढेल
📝लेखक📝
*डॉ प्रो.आनंद पवार*,
*आयुर्वेद वाचस्पती*
*एम डी (पंचकर्म),जामनगर ,गुजरात*
*डी ए एम ( जर्मनी)*
*आयु केयर आयुर्वेद अँड पंचकर्म चिकित्सालय,लातूर,पुणे*.
*संपर्क-९४०५६४७४६९,९१७५२२८१६८*