01/01/2024
पॅथॉलॉजिस्ट ची गोष्ट
“अरे विशाल (काल्पनिक नाव), 57 नंबर चा CBC कोणाकडून आलाय रे, पटकन सांग पाहून आणि पेशंटला फोन लावून दे.” मी PS (peripheral smear) पाहण्या आधीच, फक्त मशीन चा रिपोर्ट आणि graph पाहून अगदी किंचाळलोच आणि कारणही तसंच होत. मी सहसा प्रत्येक CBC (complete blood count) रिपोर्ट काचपट्टि न पाहता कधीच रिपोर्टिंग करत नाही. कारण ह्या काचपट्टि शिवाय कोणताच CBC रिपोर्ट हा पूर्ण होऊच शकत नाही. पण त्या 57 नंबर चा रीपोर्ट एवढा क्लासिक होता कि तेव्हाच कळून गेल कि it’s a medical emergency डॉक्टर किंवा पेशंट ल लगेच कळवायला हव .
पेशंटला लगेच फोन करून बोलवून घेतलं. वनिता (काल्पनिक नाव) 19 वर्षाची मुलगी होती आणि तिच्या वडिलांसोबत आली होती. “साहेब तिला बऱ्याच दिवसापासून ताप होता आणि अशक्त पण झाली होती. एका दिवशी हिरड्यातून रक्त आल तर आमच्या गल्लीतल्या लॅब मध्ये रक्त तपासलं, त्यांनी सांगितलं हिला डेंगू झाला आहे आणि हिचे रक्त गोठवणाऱ्या पेशी (platelets) कमी झाल्या. मग त्यांनी सुचवलेल्या डॉक्टर कडे गेलो, तर त्यांनी पॅथॉलॉजिस्ट कडून तपासणी करून घ्या असे सांगितले. मुलगी सलाईन वर आहे, पण तिच्या पेशी काही वाढल्या नाही. रक्त पुन्हा एकदा दुसऱ्या जागी तपासाव म्हणून मग तुमच्या कडे आलो.”
एखाद्या चुकीच्या रीपोर्ट मुळे कशी चुकीची ट्रीटमेंट मिळू शकते याच हे एक उदाहरण होत. जुनी फाइल उघडून पहिली तर एका पण रिपोर्ट वर PS च्या म्हणजे काचपट्टीचे निष्कर्ष नव्हते. त्यामुळेच डॉक्टर ने पॅथॉलॉजिस्ट कडे जा असा सल्ला दिला असणार. खातरजमा करण्यासाठी मी वनिताचे पुन्हा एकदा सॅम्पल घेतले. त्यांना बाहेर बसवून ते पुन्हा एकदा चेक केले. आणि यस आय वॉज राइट इट वॉज क्लियर केस ऑफ Acute promyelocytic leukemia (APML).
“काका अहो हिला ब्लड कॅन्सर झाला आहे, आणि जमेल तेवढ्या लवकर उपचार सुरु केले पाहिजेत. तुम्ही घाबरू नका योग्य उपचार लवकर सुरु केले तर हा कॅन्सर बरा पण होऊ शकतो.” माझ बोलन ऐकून ते कावरेबावरे झाले होते, एवढ्या छोट्या वयात ब्लड कॅन्सर होऊ शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच नीट समुपदेशन करून धीर दिला आणि रक्त विकारतज्ञ कडे पाठवले.
पॅथॉलॉजी चे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आमचे वरिष्ठ नेहमी म्हणायचे, “missing the diagnosis of APML is nothing less than CRIME”. जर तुम्ही APML चे निदान लवकर करू शकत नसाल तर तुम्ही पॅथॉलॉजीस्ट झालाच नाही अस समजा. मला पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मी स्वतः ओळखलेली पहिली कॅन्सरची केस म्हणजे APML! “आजचा दिवस लक्षात ठेव, मायक्रोस्कोप वर बसून तू आज एकाचे जीव वाचवले आहेस”. हे वरिष्ठांचे शब्द आजही आठवतात.
वनिताची ट्रीटमेंट बरोबर चालू होती आणि ती उपचाराला बरोबर साथ देत होती. काही महिन्यानंतर वनिताचे वडील एक छानशी भेटवस्तू घेऊन आले होते, "धन्यवाद साहेब, तुमची योग्य ती मदत मिळाल्यामुळेच वनिता बरी झाली.”
"अहो काका, असे काय म्हणता, तेच तर माझे काम आहे. वनिता बरी झाली हेच माझं गिफ्ट आहे. आता डॉक्टरांचा सल्ला नीट ऐका आणि सांगितलेली ट्रीटमेंट पूर्ण करा". काका समाधानाने परत गेले
सांगायचे तात्पर्य म्हणजे एका सध्या काचपट्टि च्या आधारे सुद्धा जीव वाचवता येते याचेच एक उदाहरण. जर एखाद्या CBC रीपोर्ट वर काचपट्टीचे निष्कर्ष नमूद नसतील तर तो रीपोर्ट पॅथॉलॉजिस्ट चा नाहीच म्हणून समजा.
आपले सगळे रिपोर्ट पॅथॉलॉजिस्ट लॅब चेच असावेत याचा आग्रह धरा.
योग्य लॅब म्हणजे योग्य रीपोर्ट म्हणजेच योग्य उपचार.
सर्वांना प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट संघटना, लातूर कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- लेखक - डॉ. रुपेश गुंडावार , पॅथॉलॉजिस्ट, कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी, लातुर
- संपादक - 1) डॉ. संजीवनी तांदळे मुंडे, उपाध्यक्ष व मायक्रोबायोलॉजिस्ट,
२) डॉ. रुपेश गुंडावार , पॅथॉलॉजिस्ट व उपसचिव,
प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट संघटना, लातूर