21/12/2024
दिवाळी अंक थिंक पॉझिटिव्हसाठी मित्राच्या अनुभवावर लेख लिहिला होता, पण जरा उशीर झाला, तोपर्यंत अंकाचे संपादन झाले होते तरी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे म्हणून
*राहून गेलेली गोष्ट*
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी देशभक्ती ही उच्च कोटीची असते, सर्वत्र उत्साही वातावरणात असतं. शाळा ,कॉलेज मधून ध्वजारोहण व विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात, प्रभातफेरऱ्यांचे आयोजन असते, सुट्टी असली तरी गृहरचना संस्था व इतर सामाजिक संस्था ध्वजारोहण आणि कार्यक्रम, लहान मुलांना खाऊ वाटप असे भरगच्च कार्यक्रम असतात. संपूर्ण परिसर हा राष्ट्रभक्तीने भारावून गेलेला असतो. काही सेवाभावी संस्था या गोष्टींचे औचित्य साधून आरोग्य शिबिरे आणि रक्त दान शिबिरांचे आयोजन करतात.
परवा १५ ऑगस्टला अशाच प्रकारे आमच्या काही डाॅक्टर मित्रांनी रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते हे सातवे वर्षं होतं. दरवर्षी ही मंडळी आमंत्रित करतात आणि मी ही आवर्जून जसं जमेल त्याप्रमाणे एक चक्कर मारतोच. यावेळीही गेलो होतो रक्त दात्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता, आयोजकांची लगबग सुरू होती. यावेळी मला मी जरा नाराज, नाराज म्हणण्यापेक्षा एक खंत मला सतावत होती. खरंतर मी दरवर्षी या शिबीराला भेट देतो कधी रक्तदात्यांचा सन्मान करतो, मनोगत व्यक्त करतो कधी प्रमुख उपस्थिती म्हणून सन्मान स्विकारतो. पण परवा रक्तदान शिबीरांचे आयोजन करणारे त्रिशतकवीर डॉ. जे. एस्. महाजन सर यांची डॉ .मंगेशने मुलाखत घेतल्याची माहिती त्याने दिली. तेव्हा पुन्हा एकदा रक्त विकार, रक्ताची गरज, रक्ताला दुसरा पर्याय नसणं हे सर्व नव्याने समोर आल्या सारखं झालं, डॉक्टर मित्रांमुळे याबाबत माहिती आहे पण हे उत्साही रक्तदाते, आयोजक पाहून मला एक खंत वाटत होती की संधीवात आणि मधुमेहाचा पेशंट असल्याकारणाने आपण रक्तदान करू शकत नाही.
आणि सर्व भुतकाळ असा डोळ्यासमोर तरळला, माझ्याकडे एक रक्त दानाचं प्रमाणपत्र होतं पण रक्तदान केल्याचं असं ठळक आठवत नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयात असतानाच्या काही गोष्टी आठवल्या. पहिल्या वर्षी १७ वर्षाचा होतो, रक्त दान करण्यासाठी १८ पूर्ण लागतात. मग द्वितीय वर्षाला होतो तेव्हा एक पेशंटचा नातेवाईक बाॅईज होस्टेलला आला होता,त्यांच्या पेशंटला रक्त द्यावे लागणार होते, आमच्या कॅम्पस जवळचं मेडिकल कॉलेज आणि त्यांचं हाॅस्पिटल होतं. आम्ही त्यावेळी जोशमधे रक्तगट व इतर माहिती विचारली नाही आणि गेलो त्यांच्याबरोबर. बीटीओ सरांनी केबीनमधे बोलवलं चौकशी केली आणि चांगलं फैलावर घेतलं म्हणाले, " बाळा शिकायला आला आहेस, मेसला जेवण करता, कशाला ही हिरोगीरी करता, आणि बरं येण्याआधी चौकशी करायची ब्लड ग्रुप कोणता आहे, आणि तुला माहिती आहे का पेशंटचे पाच सहा नातेवाईक आहेत ते देत नाहियेत रक्त, आणि तुमचं काय उतु चाललं आहे का? अभ्यास कर मी पहातो काय करायचं." होस्टेलवर आल्यावर समजलं गावातील बऱ्याच मंडळीचा रक्त दानाबद्दल गैरसमज आहे, पाहिजे त्यापेक्षा जास्त रक्त काढून घेतात, अशक्तपणा येतो, आजार जडतात वगैरे वगैरे आणि त्यामुळे ही मंडळी रक्त दानाला तयार होत नाही. मग असंच एका रक्तदान शिबिराचं ते प्रमाणपत्र बरेच दिवस बॅगेत होतं पण छातीठोकपणे आठवत नाही आणि सांगता येत नाही की " मैंने इस देश के लिये देशबंधू के लिये अपना खून दिया हैं "
आमचे काही मित्र आहेत ही मंडळी नियमित रक्त दान करतात अमोल हा त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करतो, प्रताप, राकेश हेही शिबीर असलं की करतातच, आमचे एक सिनियर मित्र आहेत जनरल मॅनेजर पोस्टवर कार्यरत आहेत तेही गरजू रुग्णांना अनेकदा रक्त देण्यासाठी पुढं असतात.
तर रक्तदान करायचं असं फार दिवसांपासून मनात असायचं, एकदा एका मित्राच्या वडिलांची बायपास सर्जरी होती हृदय शस्त्रक्रियेला बरंच रक्त लागायचे आणि तेही फ्रेश, म्हणून आम्हाला त्याने बोलवलं होतं पण त्यावेळीही बॅड लक संधी हुकली आमचा रक्त गट बी पॉझिटिव्ह लगेच पाचसहा जणांचे मॅच झाले होते. पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि वेगवेगळ्या कंपन्यातील नोकरी, परदेशवारी या व्यापात जमलं नाही आणि २००९- १० ला आम्ही डी कंपनीचं सदस्यत्व स्वीकारले डी कंपनी म्हणजे डायबिटीस कंपनी मधुमेह झाला सुरुवातीला इन्सुलिन सुरू झालं, आणि माझं रक्त दान करायची इच्छा धुसर होत गेली... पुढं संधीवातानेही कंपनी द्यायला सुरु केले. कामाच्या ताणामुळे एक वेळ अशी आली की माझंच हिमोग्लोबिन ९ वर आलं डाॅक्टर म्हणाले फार कमी झालं तर तुम्हाला रक्त द्यावं लागेल , घ्या रक्त दान करायचं लांबच इथं स्वतःला रक्त घ्यायची वेळ आली होती, सुदैवाने वेळेत उपचार घेतल्याने ते टळलं.
जवान सीमेवर देशासाठी रक्त सांडतात आपल्याला देशवासीयांसाठी रक्त दान करायची संधी असते, म्हणूनचं माझं तरुण मित्रांना आवाहन आहे की मित्रांनो व्यसनापासून दूर रहा , व्यायाम करा सशक्त निरोगी रहा आणि आपल्या देशबांधवांना जेव्हा जेव्हा रक्ताची गरज भासेल तेव्हा रक्तदान करा. कारण पुढ वयाच्या चाळीशीनंतर दुर्दैवाने काही आजार जडतात आणि मग इच्छा असून पण रक्तदान करता येत नाही. ज्याप्रमाणे माझं राहून गेलं...
-श्री. प्रतिक पाटील
(शब्दांकन : डॉ. मंगेश बोराटे)