10/10/2024
#राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा
रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर. आणि मंदीराला प्रदक्षिणा घालणे ही आपली संस्कृती, आपली परंपरा. आणि या परंपरेचा पाईक होण्याची संधी सन १९९२/९३ मध्ये युथ होस्टेल (युथ क्लब) महाडला मिळाली. ३ जानेवारी १९९३ रोजी युथ होस्टेल मुंबई तर्फे पहिली रायगड प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली. आणि या प्रदक्षिणेच्या आयोजनात महाडचा सिंहाचा वाटा होता. रूट मार्किंग, ग्रुप लिडर्स, प्रदक्षिणार्थींची खानपान व्यवस्था या सर्वच बाबतीत चोख व्यवस्था करण्यात आली. आणि तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अव्याहत, अखंड सुरू आहे.
काळाप्रमाणे प्रदक्षिणेचे स्वरूप बदलले. कार्यकर्ते बदलले, नवीन कार्यकर्ते निर्माण झाले. इतर क्षेत्राप्रमाणेच अधुनिकता येऊ लागली. तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. प्रदक्षिणार्थींची संख्या वाढू लागली. आज महाड युथ क्लब उपलब्ध मनुष्यबळामध्ये ७५० च्या आसपास प्रदक्षिणार्थींची सहज व्यवस्था करू शकते. तेही कोणताही गोंधळ न होता. अगदी सहजपणे. एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रमाणीत कंपनीप्रमाणे प्रदक्षिणेचे काम सुरू असते. प्रत्येक विभागासाठी वेगळी टीम असते. सरकारी परवानग्या, रूट मार्किंग, पॅक लंच व्यवस्था, इतर खाण्यापिण्याची व्यवस्था, ग्रुप लीडर्स, वाहतूक व्यवस्था, मंडप व्यवस्था, ॲडमिनिस्ट्रेशन अशा अनेक विभागातून युथ क्लबचे सदस्य निरपेक्ष भावनेने काम करीत असतात. एखाद्या संस्थेचा कार्यक्रम आहे असे वाटतच नाही. जणू प्रत्येकाच्या घरचा सोहळाच..
बदलत्या काळानुसार आता प्रदक्षिणेची नोंदणी ऑनलाइन करता येते. प्रत्येक प्रदक्षिणार्थीला बॅच दिला जातो त्यावर युनिक नंबर असतो. ज्यामुळे प्रत्येकाची येण्याजाण्याची व्यवस्थित नोंद होते. प्रत्येकाला सर्व उपलब्ध सुविधा प्राप्त होतात. आणि नियोजित वेळेत प्रदक्षिणा संपन्न होते. प्रदक्षिणार्थींची नोंद बार कोडद्वारे करण्याचे युथ क्लबचे प्लॅनींग आहे. आणि लवकरच ते सुरू होईल.
राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणेला जिल्हा परिषदेतर्फे पूर्ण सहकार्य आहे. आर्थिक सहकार्य तर आहेच पण अनेक सरकारी कर्मचारी आणि अधिकारीवर्ग प्रदक्षिणेत सक्रिय सहभाग नोंदवतात. महाराष्ट्रातील विवीध प्रांतातून जवळपास ७००/८०० प्रदक्षिणार्थी यात सहभागी होतात आणि व्यवस्थापनावर खुश होऊन एक सकारात्मक, प्रोत्साहनात्मक प्रतिसाद देऊन परत प्रदक्षिणा करण्याचे आश्वासन देऊन जातात. ५ वर्षाच्या (पालकांसमवेत) बालकांपासून ते ८५ वर्षांच्या वयोवृद्ध (चिरतरूण) सहभागींचे इथे स्वागत होते आणि प्रत्येक जणाकडे व्यवस्थित लक्ष दिले जाते. युथ क्लबच्या शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे दिव्यांग व्यक्ती सुध्दा सहजपणे प्रदक्षिणा पूर्ण करू शकते.
साधारणपणे १६ किमी अंतराची ही प्रदक्षिणा खुप काही देउन जाते. प्रचंड निसर्ग वैभव, इतिहासाची उजळणी, आपल्या शारीरिक क्षमतेची परिक्षा, रोजच्या रूटीनमध्ये थोडीशी विश्रांती, मानसिक शांतता आणि पुष्कळशी सकारात्मकता.. वनस्पती, पक्षी यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तर ही एक पर्वणीच. एक दोन अवघड टप्पे सोडले तर बाकी एकदम सोपी वाट आहे. पण ही अवघड वाटही युथ क्लबच्या लीडर्सच्या सहाय्याने सहज पार होते.
अशी ही युथ क्लबची राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा यंदा *रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४* रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी आपला सहभाग नोंदवून आपल्या परंपरेचा पाईक होण्याची संधी प्राप्त करावी....
ऑनलाईन बुकींग लवकरच सुरू होत आहे...
लेखक: मकरंद जोशी Makarand Joshi