11/12/2024
सध्या ‘औषधाच्या गोळ्या तोडून खाव्यात की नको’ यावर काही फेसबुक मित्रांची चर्चा चालू आहे त्या निमित्ताने-
१.काही गोळ्या या साध्या सरळ सोप्या असतात.
त्यांना बनवताना काही हायफाय पद्धती वापरलेल्या नसतात. वर त्यात मध्ये एक रेष दिलेली असते ज्याला स्कोअरिंग म्हणतात. म्हणजे या रेषेच्या दोन्ही बाजूंना समप्रमाणात अर्धेअर्धे औषध आहे.
पूर्वी दोन रेषा असलेल्या म्हणजे चार समभाग होतील अशाही तापाच्या गोळ्या असायच्या.
तर अशा गोळ्या आपण तोडून घेऊ शकतो.
पण त्यातही एक रेषा करून दोनच भाग केले असतील तर आपल्याला कमी डोस घ्यायचाय किॅवा लहान मुलांना वजनानुसार डोस द्यायचाय तर चार तुकडे करू नयेत. एक रेष असेल तर दोनच तुकडे करावेत.
चार तुकडे केल्यास प्रत्येक भागात ठराविक २५ टक्के औषध असेलच असे नाही.
२.काही गोळ्या एका गोळीच्या वर दुसरी अश्या असतात.
विशेषतः डायबेटिस ब्लडप्रेशर अश्या आजारांच्या दुरंगी गोळ्या.
समजा अ ५० मिग्रॅ आणि ब ५०० मिग्रॅ अशा कॅांबिनेशनची एक गोळी आहे.
बनवणाराने निळा रंग अ ला आणि पांढरा रंग ब ला दिलाय. तर त्या निळ्या रंगात एकूण ५० मिग्रॅ औषध असेल पण ते सगळीकडे समप्रमाणात असेलच असे नाही.
आणि तुम्हाला अ २५ आणि ब २५० असा डोस घ्यायचा असेल तर , ती टॅब्लेट स्कोअर्ड असेल तर तोडून घेऊ नये.
तर अ आणि ब चे हवे ते कॅांबो असलेली वेगळी अखंड टॅब्लेट घ्यावी.
३. काही टॅब्लेट्स एंटरिक कोटेड असतात.
म्हणजे त्या जठराच्या ॲसिडमध्ये सुरक्षित राहून लहान आतड्यात गेल्यावरच काम करणार असतात. त्यांचे कोटिंग तोडून त्या घेतल्यास काहीच काम करणार नाहीत जठरातच नष्ट होतील.
४. काही टॅब्लेटचे औषध खूपच कडू असल्याने त्यांच्यावर गोड कोटिंग असते. त्या तोडून खाल्ल्यावर गोडाच्या लेपाचा काय उपयोग.
५. काही टॅब्लेट सस्टेन्ड रिलीज असतात म्हणजे जर त्या अखंड गिळल्या तर त्यांच्या बांधणीनुसार त्यातलं एकेक औषध किंवा डोस टप्प्याटप्प्याने वेळेनुसार रिलीज होते आणि आपले कार्य करते. या प्रकारच्या टॅब्लेट्स तोडून फायदा नसतो. काही वेळा सगळाच डोस रिलीज झाल्याने उलट नुकसान होते.
६. काही टॅब्लेट्सची बांधणी अशी केलेली असते की त्यांच्यात समजा तीन औषधे असतील तर एका मागून एक ठराविक काळाने रिलीज व्हावीत. ती औषधे एका गोळीच्या पोटात एक अशी ठेवलेली असतात.
अशी औषधे मध्येच तोडून खाल्ल्याने एकदम हाय डोस रिलीज होतो. ब्लड प्रेशरवरची कॅांबिनेशन औषधे शक्यतो अशाप्रकारची असू शकतात.
आणि त्यामुळे अशी तोडून गोळी खाल्ल्याने तिनही औषधे एकदम रिलीज होऊन ब्लड प्रेशर चटकन कमी होऊ शकते.
या बरोबरच कॅप्स्युल्स कधीही तोडून खाऊ नयेत कारण आत ज्या बारक्या बारक्या ग्रॅन्यूल्स असतात त्या योग्यप्रकारे अर्ध्या करणे शक्य नसते.
पातळ स्वरूपात असलेली औषझे ‘शेक वेल बिफोर यूज’ अशीच घ्यावीत नाहीतर मूळ औषध खालीच राहून आपण फक्त गोड साखरेचे पाणीच पिऊ.
मिक्स प्रकारचे (बायफेजिक) इन्स्युलीन फ्रीज मधून बाहेर काढल्यावर पाचेक मिनिटे थांबून तळव्यामध्ये हळुवार रोल करून (शेक वेल करून नाही) मिक्स करून घ्यावे नाहीतर जे दूध का दूध पानी का पानी असतं ते तसंच नीरक्षीरविवेकबुद्धीने सिरींजमध्ये येईल.
आणखी काही शंका असतील तर स्वागत.