
25/11/2023
कोविड लसीचे दोन डोस अचानक मृत्युमुखी पडण्यापासून सुरक्षा देतात
12
गेले काही महिने कमी वयाच्या व्यक्ती चालता बोलता मरण पावण्याच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये आणि नंतर नंतर डॉक्टरांमध्ये देखील कोविड लसीबद्दल भीती निर्माण झाली होती.
याविषयी शंका व संभ्रम वाढू लागल्याने ICMR ने याविषयी नक्की कारण शोधण्यासाठी एक अभ्यास सुरू केला. हा अभ्यास देशभरातील एकूण 47 महाविद्यालयांद्वारे पार पडला . या अभ्यासातील निष्कर्ष नुकतेच IJMR या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत . तत्पूर्वी तज्ञ मंडळींकडून या अभ्यासाच्या कृती आराखडा व निष्कर्ष प्रक्रिया याची कसून तपासणी झाली आहे व त्यानंतर हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. (अभ्यासाची लिंक कमेंट मध्ये देईन)
एखाद्या आजाराचे किंवा घटनेचे कारण शोधण्यासाठी matched case control या प्रकारचा अभ्यास केला जातो. यामध्ये ज्या घटनेचा किंवा आजाराचा अभ्यास करायचा तो गट (cases) इतर नॉर्मल व्यक्तीसोबत (controls) तुलनात्मक रित्या तपासले जाते. यातून मग मुख्य संभाव्य कारणे आणि प्रत्येक कारणाचा जोखीमस्तर मोजता येतो. प्रत्येक केस साठी 4 नॉर्मल कंट्रोल घेतल्यास तुलना सखोल रीतीने करता येते .
या अभ्यासामध्ये एकूण 729 आकस्मिक मृत्यूचा अभ्यास झाला आणि तुलनेसाठी एकूण 2918 नॉर्मल व्यक्ती निवडण्यात आल्या . यांचे लिंग, वय आणि निवास ठिकाण मृत्युमुखी पडलेल्याप्रमाणे होता.
अभ्यासाचा मुख्य भर कोविड लसीकरणावर होता आणि इतर काही जोखीम घटक देखील तपासण्यात आले .
या अभ्यासात दिसून आले की कोविड लसीकरण आणि आकस्मिक मृत्यू यांचा संबंध नाही . मात्र जर कोविड लसीचे २ डोस घेतले असतील तर मात्र आकस्मिक मृत्यूचा धोका जवळजवळ निम्म्याने कमी होतो.
त्या अभ्यासातील एक साधा टेबल पहिल्या फोटो मध्ये दिसतोय. यामध्ये OR म्हणजे जोखीम किती आहे याचे प्रमाण प्रत्यर्क जोखीम घटकासमोर लिहिलेली आहे. ( इतर कारणांचा विचार न करता हे आकडे दिले आहेत ज्यामध्ये अंदाज येतो, अभ्यासातील पुढील टेबल सर्व घटकांच्या सामूहिक परिणामासह OR किती आहे हे सांगतो. ते आकडे जास्त योग्य समजावे) या टेबलने समजणे सोपे जाईल म्हणून हा unadjusted OR चा टेबल समजून घेऊ.
पहिल्या उभ्या रकन्यामध्ये आकस्मिक मृत्यूची संभाव्य कारणे दिली आहेत .
दुसऱ्या रकन्यामध्ये प्राथमिक स्तरावरील OR म्हणजे जोखीम प्रमाण दिले आहे (हे 1 असेल तर काही परिणाम नाही, हे 1 पेक्षा कमी असेल तर जोखीम नसून सुरक्षा आहे आणि हा आकडा 1 पेक्षा जेवढा जास्त तेवढे पट अधिक जोखीम असे समजले जाते) प्रत्येक कारणापुढील आकडा अवश्य बघा .
तिसऱ्या रकान्यात p म्हणजे शक्यता . मिळालेली माहिती योग्य नसण्याची शक्यता किती आहे हे देखील मोजले जाते. जर शक्यता 0.05% पेक्षा कमी असेल तरच निरीक्षण संख्या शास्त्रीय दृष्ट्या सत्य समजतात . त्यामुळे अभ्यासाची सत्यतेची कसोटी देखील यामध्ये आहे .
(अश्याच पद्धतीने यापुढील टेबल तुम्ही मूळ अभ्यासाच्या पेज ला भेट देऊन समजून घेऊ शकता)
निष्कर्ष काय मिळाले ?
*कोविड लसीकरण आकस्मिक मृत्यूची जोखीम वाढवत नाही , उलट दोन डोस घेतले असल्यास काही प्रमाणात सुरक्षा मिळते.*
मग कोणत्या घटकांनी आकस्मिक मृत्यूची जोखीम वाढली व संभाव्य कारणे कोणती असू शकतात?
1. कोविड झाल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले असेल तर
2. कुटुंबातील इतर कोणाचा यापूर्वी असा आकस्मिक मृत्यू झाला असेल तर
3. मध्यम किंवा भरपूर दारू पिण्याची सवय असेल किंवा मृत्यूपूर्वी 48 तासापर्यंत भरपूर दारू घेतली असल्यास
4. सध्या किंवा पूर्वी सिगारेट ओढण्याची सवय असल्यास
5. मृत्यूपूर्वी 48 तासापर्यंत तीव्र शारीरिक श्रमाचे कृत्य केले असल्यास
6. काही ड्रग्स घेण्याची सवय असल्यास
या अभ्यासाची बातमी म्हणावी तितकी प्रसिद्ध झाली नाही मात्र हा खूप महत्त्वाचा अभ्यास आहे आणि सर्व लोकांपर्यंत पोचायला हवा .
कारण
यामुळे लसीकरणाबाबत जी भीती मनात होती ती कमी होऊ शकेल.
एकापेक्षा दोन डोस अधिक सुरक्षा देतात म्हणजे लसीकरण विविध प्रकारे उपयुक्त आहे हे पटेल.
मुख्य म्हणजे आकस्मिक मृत्यूची कारणे व जोखीम कोणामध्ये जास्त आहे हे समजल्याने असे मृत्यू टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे शक्य होईल .
माहिती सर्वांपर्यंत पोचवा .
या बातमीने दिलासा मिळालाय.
जर भीती वाढली असती तर आत्तापर्यंत व्हायरल झाली असती बातमी.
ही पॉझिटिव्ह बातमी देखील प्रत्येकापर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे.
इतरांसोबत अवश्य शेयर करा .
लस घेणे हा तुमचा योग्य निर्णय होता हे या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) MD
GMC, Miraj
(या अभ्यासामध्ये माझा विषय म्हणजे Community Medicine / PSM विभागातील देशभरातील बरेच तज्ञ सामील होते हा अभिमानाचा विषय आहे. )