
23/04/2024
Patchwork
"रेसिपी मध्ये दोन चमचे लिहिलेलं असलं तरी एकदम भसकन दोन चमचे नको घालू. अंदाज घेऊन बेता बेताने घालावं ", इति आई. थोड्याफार फरकाने हेच ग्यान इति आजी सुद्धा. अर्थात आई ही ते आजी कडूनच शिकली असणार.
भाई काकांनी मला दहावीत असताना चहा करायला शिकवला. मी आज इतके वर्षांनी सुद्धा साधारण त्याच प्रमाणाने चहा करते.
माझ्या मावशी च्या जावेने मला पोळ्या भाजायला शिकवल्या. वास्तविक त्यांचा माझा फारसा संबंध ही यायचा नाही. कधीतरी मावशी कडेच भेट झाली तर. पण एकदा योगोयोगाने मी पोळ्या करत असतानाच त्या आल्या आणि मला काही टिप्स देऊन गेल्या. आणि गम्मत म्हणजे आजही मी तश्याच पोळ्या भाजते.
कोणाची पद्धत वापरून दही छान लागतं, कोणाचं बघून केलेली भाकरी टम्म फुगते, कोणी ठराविक कपडे कसे कॅरी करायचे ते शिकवलं तर कोणाला बघून कठीण प्रसंग डिप्लोमॅटिकली हॅन्डल करायला शिकले.
कधी मुद्दामून तर कधी बघून बघून सहज पणे. पण आपल्या संपर्कात आलेल्या कित्येक माणसांकडून आपण कितीतरी गोष्टी शिकत असतो, आत्मसात करत असतो. कधी एखादी लकब, एखादी बोलण्याची ढब, एखादं काम करायची पद्धत, किंवा मग कुठला परफ्युम किंवा मेकअप टीप !
आणि हो, प्रत्येक वेळी समोरच्याचं काही कॉपीच केला पाहिजे असं नाही हं. कधी कधी कसं नाही वागायचं हे ही शिकतोच कि आपण लोकां कडून.
काही आठवणी, काही किस्से, काही वस्तू, ठराविक माणसांशी घट्ट जोडलेल्या असतात. त्या प्रसंगी किंवा ती वस्तू बघितल्यावर, त्या माणसाची आठवण हमखास येते. आपल्या माणसांना असं मुद्दाम बसून आठवावं लागत नाही. ती आठवतातच. रोजच्या छोट्या छोट्या कृतीतून.