28/09/2022
*उरल्या सगळ्या त्या आठवणी.....*
*लतादीदी आज तुमचा वाढदिवस!* आज तुम्ही 93 वर्षाच्या झाल्या असतात! तुमची शेवटपर्यंत असलेली कार्यमग्न शैली पाहून असे वाटले होते; की तुम्ही सहज *शंभरी* पार कराल. पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. ६ फेब्रुवारीला भारतातील सुरेलपणा संपला.
तुम्ही आजारी असताना,तुमचे जे घरगुती व हॉस्पिटल मधील व्हिडिओ जे कोणी प्रसिद्ध केले ते बघून भडभडून आले व ते प्रसिद्ध करणाऱ्याचा खूप राग आला व वाईटही वाटले. कारण आम्ही आमच्या लतादीदीला नेहमी उत्साही , आनंदी व तरतरीत पाहिले होते. एक प्रसन्न आणि आदरयुक्त भाव तुमच्या दर्शनाने निर्माण व्हायचा. या व्हिडिओतील केविलवाण्या लताबाई आमच्यासमोर यायला नको होत्या. पण हा सेलिब्रिटी स्टेटस चा साईड इफेक्ट म्हणून मनाला समजाविले.
दर वाढदिवसाला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून नमस्कार करावसे वाटायचे, पण इतक्या लाखो चाहत्यांना तुम्ही तरी कुठे पुऱ्या पडणार होतात? म्हणून तुम्ही नॉन कॉन्टॅक्ट्टेबल व्हायचात. फोन कॉल पण घ्यायच्या नाहीत. पण एकदा दीनानाथला तुमच्या वाढदिवशी एक प्रोग्राम होता. तेव्हा माझ्या मनाने हिय्या करून, सर्व अडथळे , सुरक्षा इत्यादी पार करून मी डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचलो. तुमच्या पाया पडताना तुमच्या पायांना थोडी सूज आल्याचे दिसले, देवाला सांगितले, माझे सर्व आयुष्य ,आमच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या या स्वरसम्राज्ञीला देऊन टाक. तुमच्या वाढदिवशी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून वंदन करता आलं हे स्वप्न पूर्ण झालं आणि एका एखाद्या *विजयी* *वीरा* सारखा हा विजय पुन्हा प्रेक्षकात येऊन बसला. (M.D. झालो तेव्हा पण एवढा आनंद झाला नव्हता.)
नाहीतर प्रत्येक वाढदिवशी तुमचा फोन असंख्य वेळा ट्राय केला होता आणि प्रभु कुंजापर्यंत फेरी मारून तिथले प्रवेशद्वार ते 101 मधील तुमचे दार इथपर्यंत ठेवलेले पुष्पगुच्छ पाहून त्यांच्याकडेच ( मेघ)दूताप्रमाणे *पुष्पदूत* बनून तुम्हाला शुभेच्छा पाठवल्या होत्या. 75 व्या वाढदिवसाच्या तुम्ही शिवाजी पार्कवरील नेबुलामध्ये रात्री जेवायला गेल्यात तेव्हा वाटले होते कीआधी कळले असते तर मी सुद्धा तिथे गेलो असतो.
90 व्या वर्षी तर आख्खे प्रभूकुंजच रोषणाईने सजविले होते. पण एकदाच तुमच्या वाढदिवशी तुम्हाला भेटण्याचा योग आला.माझे अनेक मित्र मैत्रिणी (माझे लता प्रेम बघून)*मलाच* तुमच्या वाढदिवशी विश करतात.
मित्रांवरून आठवले माझा मित्र मैत्रिणींनी तुम्हाला प्रत्यक्ष भेटता यावं म्हणून माझी खूप मदत केली . कोणी लताबाईंच्या जवळच आहे कळले की माझे मन लालचावयाचे!माझा मित्र डॉक्टर राजन जोशी आशाताई व तुमचा भाचा योगेश (मीनाताईंचे सुपुत्र)यांच्या जवळचा .त्यांनी योगेशजिना सांगितले. तसेच आमचे डॉक्टर चंद्रशेखर देवपुजारी सर यांची रचना खडीकर शहा (मीनाताई खडीकरांची मुलगी)ही स्टुडन्ट. ती तर तुमची लाडकी भाची आणि तुमच्या खूप जवळची. तिच्यामार्फतही ट्राय केले. तसेच तुमचे स्नेही संगीतकार मयुरेश पै यांनी माझा एक लेख वाचून विचारले होते की तुम्हाला लताबाईंच्या रेकॉर्डिंग ला यायचे आहे का? मी एकदा बोलवीन. पण काय करू तो योग नव्हता .तुम्ही हळूहळू सर्वांनाच भेटणे कमी केले होते त्यामुळे खूप प्रयत्न करूनही असे प्रत्यक्ष भेटून गप्पा मारायचा योग आला नाही.
तरी मी भाग्यवान मला तुमची पत्रे आली आणि तीनदा फोनवरून(एकदा नव्या फॅटच्या वास्तुशांतीला) प्रत्यक्ष बोलता आलं आणि तुमच्या प्रत्येक मैफिलीत भेटता आले तुमचा कुठेही लाइव प्रोग्राम असला तरी मी हजर असायचो. माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या तुम्ही स्वतः tweet करून माझे अभिनंदन केले होते. *याहुनी मागणे काय मोरया?*
दरवर्षी गणपतीत सुद्धा मी तुमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला यायचो. त्यावेळी आत कुठेतरी तुमच्या रूममध्ये तुम्ही प्रत्यक्ष आहात व कधीही बाहेर येऊ शकाल या कल्पनेनेच अंगावर रोमांच उठायचे व ज्या घरात लतादीदी श्वास घेतात तिथे आपण श्वास घेत आहोत या भाग्याने डोळे पाणवायचे. डाव्या बाजूलाच असलेल्या तुमच्या भव्य देवघरात दर्शन घेऊन निघताना *सरस्वती दर्शन झाले नाही* म्हणून नेहमी खंत वाटायची. आता आमची सरस्वतीच नसल्यामुळे यावर्षी जावेसेस वाटले नाही. मनातूनच नमस्कार केला
तुम्ही कधीही आजारी असलात तर मनाला नेहमी भीती वाटायची. बातम्या ऐकताना किंवा पेपर उघडताना मन व्याकुळ व्हायचं.
तुमच्या हॉस्पिटल मधील ऍडमिशनमध्येही डॉक्टरांच्या ओळखीने येण्याचे प्रयत्न केले होते पण करोना व इतर कारणांमुळे ते शक्य नव्हते. अनेक अफवा उठत होत्या पण तुमचे भाचे योगेश खेडीकर धीर देत होते.
प्रत्यक्ष तुमच्या निर्वाणाच्या दिवशी सकाळीच शिवसेना नेते श्री. शिशिर शिंदे यांनी ती वाईट बातमी कळविली. मनाची तयारी असून देखील मन बधीर झाले.लगेच प्रभु कुंजाकडे धाव घेतली पण अभूतपूर्व गर्दीमुळे व व्ही व्हीआयपी लोकांमुळे कोणालाच आत सोडत नव्हते. मागवून शिंदे साहेबांकडून कळले की त्यांच्याबरोबर मला सहज आतजाऊन अंत्यदर्शन घेता आले असते पण तो(ही) योग नव्हताच. *एवढाच आपला ऋणानुबंध होता.* खूप वाईट वाटले .मग संध्याकाळी शिवाजी पार्कवर तुमचे अंत्यदर्शन आमचे स्नेही श्रीपाद ठाकुरदेसाई यांच्या शिवाजी पार्क समोरील घरातून घेतले . शेवटी मैदानावर तुमचे अंत्यदर्शन केल्यावर,आपल्यातीलच काहीतरी मरून गेले ,कायमचे गेले अशी काहीतरी विचित्र जाणीव झाली. माझ्यापासून मोदींपर्यंत तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या याच भावना असाव्यात.
आज नेहमीप्रमाणे *मन की बात* लिहिताना तुमची असंख्य गाणी आठवत नाहीत पण बृहदारण्य उपनिषदातील एक *श्लोक* आठवतोय.
*ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।*
*पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥*
*ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥*
सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे आणि हे दृश्य जगत् सुद्धा पूर्णच आहे. जरी पूर्ण परब्रह्मातून हे पूर्ण जगत् व्यक्त स्थितीस आलेले असले तरीही ह्या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला बाधा येत नाही. ते आहे तसेच पूर्ण राहते. आमची लतादीदी अशीच पूर्ण होती.
आणि गेली तरी पूर्णच राहील.अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम ह्या सप्तचिरंजीवांप्रमाणे ती
*आठवी चिरंजीवनी* आहे. सप्तसुरांनंतरचा तो *आठवा* सूर आहे. हॅप्पी बर्थडे लता दीदी. *तुमचाच@विजय आठल्ये* २०२२.