
26/09/2024
*माईंडफुलनेसचा महिमा वर्णावा किती..!*
ते सिनेमा,सिरीयलच्या कोर्टरुम सीनमधे एक डायलॉग असतो बघा; *जो भी कहूँगा सच कहूँगा,सच के सिवा कुछ नही कहूँगा..*
अगदी त्याच धर्तीवर माझे माईंडफुलनेसबद्दलचे अनुभव सांगायचे आहेत..
अगदी जसं घडलं तस्सच..!
*इथे ना कोणी पक्षकार,*
*ना कोणता पक्ष..*
*इथे फक्त वर्तमानात लक्ष..!*
(उपरोक्त महत्वाच्या विषयाची व्याप्ती लक्षात घेता अनुभव कथन जरा दीर्घ होण्याची शक्यता नाकारता येत नाही..तेव्हा हा लेख वेळ काढून शांतपणे वाचावा असं मी सूचवेन..)
नमस्कार 🙏
मी डॉ. सुहास धनाजी वीर
एम.डी.आयुर्वेद (बालरोग)
मो.नं.97 665 665 97
तर कुठे होतो आपण??
अर्थातच वर्तमानात...😊
गेल्या वर्षभरापासून माईंडफुलनेसचा सराव करतोय..
तो एक दिवस आहे आणि आजचा एक दिवस आहे..
मागे वळून पाहतो तर काय..!??
*"कोण होतास तू ??* *काय झालास तू ???"*
*"तो मी नव्हेच !!!"*
हे *आरोहन* आहे बरं..
*अवरोहन* नव्हे...
😄
माईंडफुलनेसचा महिमा एका वाक्यात सांगायचा झाला तर,
*रोजच्या आयुष्यातील ताणतणावांना कृतीशीलपणे सामोरे जात अधिक व्यापक, अधिक समृद्ध आणि रसरसशीत आयुष्य जगायला शिकलोय,जगत आहे आणि कायम जगत राहणार !*😇
ज्यांच्यामुळे हे आयुष्य अधिक रसरशीत झालं अशा आदरणीय डॉ.यश वेलणकर सर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना
कोटी कोटी धन्यवाद..!
जेव्हा कधी सरांसोबत प्रत्यक्षात भेट होईल तेव्हा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करने बाकी आहेच.
🙌🙇🏻♂️
I mean it..!
तर माईंडफुलनेसची जोडलं जाण्याचं मुख्य कारण म्हणजे
*'एखाद्या गोष्टीचा अगदी खोलात जाऊन विचार करण्याची माझी सवय..'*
आणि
*'एखाद्या घटनेला तात्काळ साधक-बाधक प्रतिक्रिया देण्याची वृत्ती..'*
अशातच चार-पाच वर्षांपूर्वी मला माझ्या मूळ गावापासून दूर 250 km अंतरावर
छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद येथे सहकुटुंब स्थलांतरीत व्हावं लागलं..
तेही गावाकडील आयुर्वेद क्लिनिक,आयुर्वेद वनस्पती लागवड तसेच औषध निर्मिती सोडून.😞
स्थलांतरचं मुख्य कारण होतं,
माझ्या पत्नीची छत्रपती संभाजीनगर येथे नव्यानेच लागलेली नोकरी आणि त्यासोबतच माझं पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षण (आयुर्वेद एम.डी.)
पदवीनंतर तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर MD Entrance परीक्षा देऊन स्वतःच्या मेरिटवर पदव्युत्तर शिक्षणाला प्रवेश घेतला होता पठ्ठयाने..!😎
(State Merit Rank- *475.*
SEBC Rank- *79*.)
सन 2019 साली मराठा आरक्षण लागू होतं..
असो..
पदवी मिळाल्यावर दरम्यानच्या काळात आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरु केली होती गावाकडे..
झालं मग....🤦🏻♂️
नविन ठिकाण,नविन लोकं,नविन आव्हाने,नविन भूमिका..
त्यातच इन्कम सोर्स थेट निम्म्यावर आला..
शैक्षणिक कर्जासोबतच कौटुंबिक कुरबुरी आणि बरंच काही...
नविन आव्हानाला घाबरत होतो अशातला काही भाग नव्हता,
पण हळूहळू ताला-सुरात ठेका धरु लागेलेल्या आयुर्वेद प्रॅक्टिसची भैरवी करणं मनाला जरा आर्त करुन जात होतं.😞
जात्याच जरा खोलात जाऊन विचार करण्याची सवय आणि त्यात ही अशी परिस्थिती...
म्हणजे आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला,हातात जळता टेम्भा आणि आजूबाजूला गवताच्या गंजी...!🫣
झाली ना राव होरपळ सुरु...
अशीच होरपळ पदव्युत्तर शिक्षणाच्या बाबतीतही कायम राहिली.
वाटलं होतं,पदव्युत्तर शिक्षणाचा ज्ञान यज्ञ सुरु झालाय.
त्याच्या तेजाने उजळून निघू..
पण कशाचं काय..!?
तिथेही मनस्वास्थ्याच्या समिधा टाकून प्रचंड होरपळच नशिबाला आली..!
(पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आलेल्या *तिखट जाळ*
अनुभवावर एक वेगळाच शोधप्रबंध लिहिला जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे..
पण ते म्हणतात ना,
*You are not suppose to be wash your Dirty Lenin in public..*🤫)
प्राप्त परिस्थितीचे चटके बसूच नयेत अशा बाळबोध समजूतीचा मी नव्हतो बरं..!
किंबहुना नसलचं पाहिजे..
पण चटके बसणे आणि होरपळ होणे यात गुणात्मक फरक आहेच ना ओ..!
मग ही बाह्याभ्यांतर झालेली होरपळ थांबली ती आदरणीय डॉ.यश वेलणकर सरांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या ध्यान सरावाने..
होरपळ नुसतीच थांबली नाही तर त्यामुळे झालेले व्रण सुद्धा हळूहळू कमी होऊन नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या गुलाबी त्वचेप्रमाणे बाह्य आणि अंतरंग दिसू लागलं..
*तो मी नव्हेच...*😄
सरांच्या App मधील ऑडिओ तसेच रविवारच्या ध्यान सरावामुळे बऱ्याचशा गोष्टी समजू लागल्या.
त्या अंमलात आणू लागलो.
मला जी अतिरिक्त विचार करण्याची सवय होती.
तसेच तात्काळ प्रतिक्रिया देण्याची वृत्ती होती...
या दोन्हीही गोष्टी खूप कमी झाल्या..
*विचार येणं आणि त्यावर आपण विचार करत राहणं यातील अत्यंत महत्वाचा फरक समजला.*
विचार येणं आपल्या हातात नाही पण त्या विचारांवर विचार न करणं,त्यांना महत्व न देणं हे मात्र आपल्याच हातात आहे याची सुस्पष्ट जाणीव झाली.
विचार आणि कृतीमध्ये ठरवून अंतर ठेवता येऊ लागलं.
प्रत्येक घटनेला प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असंही काही नाही..
आणि प्रतिक्रिया द्यायची आवश्यकताच असेल तर विचार भावना स्थिर ठेवून प्रतिक्रिया देता येतेच की..!
या गोष्टीच भान अजून चांगल्या पद्धतीने विकसित झालं..
*आता दुसऱ्या बाजूला खोलात जाऊन विचार करण्याच्या माझ्या या सवयीचा एक आयुर्वेद चिकित्सक म्हणून मला प्रचंड फायदाच व्हायचा बरं..*
म्हणजे असं बघा...
रुग्णाचा आजार नेमका कोणत्या कारणाने म्हणजे नेमकं काय खाल्ल्याने,काय केल्याने झाला असावा?
तो आजार लवकर बरा करण्यासाठी कमीतकमी कोणती बरे औषधं देता येतील?
ती औषध कशासोबत (अनुपान) देता येतील?
रुग्णाला सहज पाळता येणारं पथ्य कसं सांगता येईल?
या अशा अनेक गोष्टी बाबतीत कोणत्याही आयुर्वेद चिकित्सकाला आपलं विचारचक्र वेगाने फिरवावच लागतं...
यशस्वी आयुर्वेद चिकित्सेच गमक आहे ते..!
*उपरोक्त बाबतीत एक आयुर्वेद चिकित्सक म्हणून माझी ही अतिविचार करण्याची सवय वरदान ठरत होती..😇*
*पण इतरवेळी अन्य संदर्भाने मी वेगळ्या भूमिकेत शिरल्यावर हेच विचारचक्र मला गरागरा फिरवून चिंता,भीती,निराशेच्या गर्तेत लोटून देत होतं..*
*साक्षी ध्यान*
*मीचं गाठोडं*
*विचारांच्या प्रवाहातून वेगळं होण्याची तंत्रे*
*सजग कृती*
इत्यादीमुळे माझ्या मनात येणाऱ्यां असंख्य विचारांवर »
विचार करणाऱ्या चक्राची गती माझ्या नियंत्रणात आली..
मनात येणारे विचार हे नेमकं कोणत्या मी च्या संदर्भात आहेत.?
याचं भान विकसित होऊ लागलं..
*आयुर्वेद डॉक्टर मी..*
*पदव्युत्तर शिक्षण घेणारा विद्यार्थी मी....*
*प्राप्त परिस्थितीत होरपळलेला मी..*
असे अनेक मी.
यासोबतच ते विचार भूतकाळातील की भविष्यकाळातील?
त्या विचारांच्या मूळाशी कोणती भावना आहे?
इत्यादी गोष्टी अगदी लख्खपणे समजू लागल्या.
ध्यान सरावाच्या वेळी येणाऱ्या विचारांची,उत्पन्न भावनांची फक्त नोंद घेऊ लागलो..
आणि आवश्यकतेनुसार त्या त्या विचार,भावनेच्या संदर्भात ध्यान सरावानंतर ठरवून विचार करु लागलो..🤔✅
*विचार🔁भावना🔁संवेदना इत्यादीमुळे शरीरात होणारे बदल समजू लागले..*
*उदा-छाती गच्च होणं,पोटात गोळा उठणं,हृदयगती वाढणं,कधी कधी कंठ दाटून येणं*
*या अशा बदलांचा प्रतिक्रिया न करता साक्षीभावाने स्वीकार करता येऊ लागला..*
मन उदास असेल किंवा उत्तेजित असेल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मनस्थितीला वजा-अधिक नंबर देता येऊ लागलं..
सतत वजा एक दोन अवस्थेत राहण्याचा कालावधी,त्याची वारंवारता खूप कमी झाली..
*करुणा ध्यानाच्या* नियमित सरावामुळे माझ्यातील क्षमता आणि कमतरता नव्याने समजल्या.कमतरतांचा स्वीकार केला.
क्षमतांचा विकास आणि कमतरतेच्या परिपूर्तीसाठी योग्य ती पावले उचलली जाऊ लागली...
परिणामी माझं अपडेटेड व्हर्जन मला रोज नव्याने मिळू लागलं..
इतरांप्रति करुणा भाव जागृत झाला..
ज्यांनी मला जाणतेपणी किंवा अजाणतेपणी त्रास दिला त्यांनाही माफ करायल जमलं..
नाहीतर याआधी त्रास देणाऱ्याला भाजू की भिजू घालू असं व्हायचं..😅😅
व्यावसायिक क्षमता कशी वाढली बघा
👇
*ठरवून विचार करण्याचं कौशल्य अधिक विकसित झाल्यामुळे* मी सहज उपलब्ध होणाऱ्या एकेरी आयुर्वेद वनस्पती बाबत जरा जास्तच खोलात जाऊन विचार करुन औषध म्हणून वेगवेगळ्या रुग्णांत,वेगवेगळया व्याधीत वापर करुन त्याचे भन्नाट रिझल्ट मिळवू लागलो..
*सजग कृतीमुळे* औषध निर्माणाच्या कृतीमध्ये निश्चितच अधिकचा सफाईदारपणा आला.उत्पादकता वाढली..
हे सर्व माईंडफुलनेसच फलित..!
अशी एक ना अनेक फायद्याची जंत्री आहे..पण विस्तार भयास्तव इथेच विराम घेतलेला इष्ट ठरेल.
आता सुजाण वाचकांच्या मनात साहजिकच प्रश्न आले असतील की हे सगळं फलित व्हायला किती दिवस लागले?
रोज किती मिनिट सराव करावा लागला..?
तर उत्तर आहे..
स्वतःशी प्रामाणिक राहून रोज 20 मिनिट नियमितपणे सराव सुरु केल्यापासून साधारणपणे एक-दिड महिन्यातच सकारात्मक बदल जाणवायला सुरुवात झाली..
पुढील दिडेक महिन्यात आणखी सुधारणा झाली..
त्यात सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रविवारचा ध्यान सराव आणि त्यानंतरची प्रश्नोत्तरे,चर्चा इत्यादीमुळे तर याला डबल इंजिन लागलं..😄
शेवटी समारोपाकडे येताना इतकंच सांगावसं वाटतं,
*माईंडफुलनेसचा सराव हा सर्वार्थाने समृद्ध जीवन जगण्याचा राजमार्ग आहे...*
पण त्यासाठी तुम्हाला माईंडफुलनेस कोचच्या मार्गदर्शनुसार स्वतः पुढाकार घेऊन ध्यान सराव करणं अत्यंत गरजेचं....
अहो,त्या क्रिकेट मॅचमध्ये नाही का; एक रन काढण्यासाठी दोघाही बॅट्समनला धावाव लागतं...
तसंच काहीसं माईंडफुलनेसच समजा हवं तर..
इथे स्ट्राइकवर डॉ.यश वेलणकर सर,अकल्पिता मॅडम,मंजिरी मॅडम तसेच अन्य सदस्य आहेत..
आणि नॉन स्ट्राईकवर तुम्ही,मी,आपण सर्वजणच सराव करणारे..
इथे काही काळ स्वतः कोचच बॅटिंग करतात.😄
समोर फास्ट बॉलर असताना,
टाइट फिल्डिंग मधून ते गॅप काढत आहेत..
तर आपल्याला फक्त पुढाकार घेऊन स्क्रीझ सोडून धावायचं आहे..एखाद दुसरी ओव्हर झाली की आपण स्वतःहून स्ट्राईकला येऊन भावनिक त्रासांच्या चेंडूना तंत्रशुद्ध पद्धतीने कधी डिफेन्स करत,तर कधी सोडून देत,तर कधी कधी सीमारेषेच्या बाहेर टोलवत आपल्याच मनस्वास्थ्याची मॅच जिंकायची आहे..!
मग कधी खेळताय मॅच..!?
I mean कधी करताय माईंडफुलनेसचा सराव !??
आज आत्ता ताबडतोब ना..!
द्वारा -
डॉ सुहास धनाजी वीर
एम.डी.आयुर्वेद (बालरोग)
मो.नं. 97 665 665 97