Swasthyarang ।। स्वास्थ्यरंग ।।

  • Home
  • India
  • Mumbai
  • Swasthyarang ।। स्वास्थ्यरंग ।।

Swasthyarang ।। स्वास्थ्यरंग ।। A forum initiated with the orientation of Health through Art and things of our own likelihood. Art o

30/06/2023
17/06/2023

*वारी जनातली, जनांच्या मनातली...... #सीझन ४*

*अभंग माऊलींचे......६*

*ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, शालिवाहन शक १९४५, दिनांक १७ जून २०२३*

*में दुरर्थि कर जोडु । तार्‍हे सेवा न जाणु ॥१॥*
*मन्हारे कान्हा मन्हारे कान्हा । देखी कां नेणारे मन्हा कान्हारे ॥२॥*
*तार्‍हा मराठा देश । मन्ही बागलाणी भाष ॥३॥*
*घटि पटि विजार । खंडे भाले तरवार ॥४॥*
*बापरखुमादेविवरु जाण । ऐसे मन्हा कान्हा ॥५॥*

ज्ञानेश्वरादी संतांच्या पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे. ज्ञानारायांनी ज्ञानेश्वरी लिहून या संप्रदायाला अधिष्ठान दिले. संत ज्ञानदेवांच्या समकालीन असलेले संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पार उत्तरेत नेली. संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी (मध्ययुगातील उत्तरेतील भाषा) भाषेत काही अभंग रचना केली. त्यातील काही अभंग नामदेवजीकी मुखबानी गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान येथे शीख बांधवांनी नामदेव महाराजांचे मंदिर उभारले आहे.

देशाच्या विविध भागात जाऊन भागवत धर्माचा प्रचार व प्रसार त्याकाळी होत होता. भागवत धर्माचा प्रसार व्हावा, लोकांना कळेल अशा सोप्या भाषेत धर्माची ओळख व्हावी हा उद्देश मनात ठेऊन, संतांनी अनेक बोली भाषांमध्ये आपली अभंग रचना केली.

*गौळणी ठकविल्या | गौळणी ठकविल्या | एक एक संगतीनें मराठी कानडिया |*
*एक मुसलमानी | कोंकणी | गुजरणी | अशा पांचीजणी गौळणी ठकविल्या ||*

नामदेव महाराजांची ही प्रसिद्ध गौळण यात कृष्ण लीला वर्णन करत असताना, गुजराती, कानडी, कोंकणी अशा निरनिराळ्या भाषेतले अनेक शब्द वापरले आहेत.

माऊली ज्ञानदेवांनी अतिशय तरल शब्दांत अभंगरचना केल्या आहेत. ज्ञानदेवांचे शब्द म्हणजे, जसे *‘अमृत कण कोवळे’* इतके नाजूक आहेत. अनेक समर्पक शब्द त्यांनी आपल्या अभंग रचनेत वापरले आहेत. त्या शब्दांचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की, सातशे वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी त्या अभंगांची गोडी तेवढीच अवीट आहे.
या संतांचा महिमा वर्णन करताना तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई म्हणतात.

*संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥*
*ज्ञानदेवें रचिला पाया । तुका झालासे कळस ॥*

वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या उभारणीमध्ये अनेक संतांच्या कामगिरीचे बहारदार रूपकात्मक वर्णन या अभंगात केले आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी या इमारतीची पायाभरणी केली आहे. इमारतीला भक्कम आधार त्याच्या भिंती व इमारत ज्यावर उभी असते ते खांब देत असतात. संत नामदेवांची भूमिका भिंतीच्या आधाराचे दगड तर एकनाथ महाराज या इमारतीचे खांब आहेत. मंदिराची शोभा त्याच्या कळसामूळे उठून दिसते. भागवत धर्माच्या या इमारतीवर आपल्या सहज सुंदर अभंग रचनेने संत तुकाराम महाराजांनी कळस चढवला आहे, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज हे मंदिराचा कळस अशी वारकरी संप्रदायाची थोर परंपरा संत बहिनाबाईंनी विशद केली आहे. संतकृपेची महती लोकमानसात सोप्या भाषेत बिंबवली आहे.

देवदर्शनामुळे देवाच्या प्रती मनात भक्तिचा भाव निर्माण होतो. भगवंताला नेहमीच शुद्ध भाव आवडतो. प्राकृत मराठी जाणणाऱ्या लोकांव्यतिरीक्त इतरही समाजाला भागवत धर्माचे ज्ञानामृत सहज प्राप्त व्हावे म्हणून संतांनी प्राकृत भाषेबरोबरच इतरही भाषेत अनेक रचना केल्या आहेत. ज्ञानदेवांनीही प्राकृत मराठी व्यतिरिक्त अभंग लिहिताना इतर भाषांचा उपयोग केला आहे. आजचा अभंग नाशिकच्या उत्तरेला बागलाण प्रांतातल्या बागलाणी भाषेत आहे.

*में दुरर्थि कर जोडु । तार्‍हे सेवा न जाणु ॥१॥*
*मन्हारे कान्हा मन्हारे कान्हा । देखी कां नेणारे मन्हा कान्हारे ॥२॥*

भक्ताला प्रत्येक वेळी आशंका असते की मी केलेली प्रार्थना देवाला आवडेल का? माझी पूजा त्याच्यापर्यंत पोहोचेल का? भक्ताला असे वाटण्यामागे अनेक कारणे असतात. त्यापैकी एक कारण म्हणजे आपली बोली भाषा, प्रत्येक ठिकाणच्या स्थान वैशिष्ठ्याने त्याठिकाणच्या चालीरीती बदलत असतात तसेच भाषाही बदलत असते. या अभंगातील या स्त्रीलाही हाच प्रश्न पडला आहे. ती म्हणते; अरे कान्हा, मला तुझी सेवा कशी करावी हे माहीत नाही. मी दोन्ही कर जोडून तुला प्रार्थना करते आहे. मी तुला शरण आले आहे. दिन रात माझ्या कान्हाला पहात रहावे असे वाटत रहाते. तुला कितीही डोळे भरून पाहिले तरीही माझ्या मनाचे समाधानच होत नाही. तुझे नाव कानी पडताच मला आंतरिक समाधान प्राप्त होते.

*तार्‍हा मराठा देश । मन्ही बागलाणी भाष ॥३॥*
*घटि पटि विजार । खंडे भाले तरवार ॥४॥*
*बापरखुमादेविवरु जाण । ऐसे मन्हा कान्हा ॥५॥*

बागलाणी भाषेत कान्हाचे गुणगान करून झाल्यानंतर मनातली खंत ती सांगते आहे. अरे तु तर मराठा देशातला आणि माझी भाषा मात्र बागलाणी. माझ्या या खेडवळ भाषेत आळवलेल्या शब्दांचे तुला आकलन होईल का? हे कान्हा या बागलाणी भाषेत मी तुला कसे आळवू? शास्त्रातील सगळ्या चालीरीतींना विसरून जाणे हेच श्रेयस्कर आहे. माझ्यासमोर केवळ एकच मार्ग आहे. नामस्मरणाचे अमोघ शस्त्र माझ्या हाती आहे. तुझ्या भक्तिच्या लढ्यात तेच माझी ढाल आहे आणि तीच तलवारही आहे. नामस्मरणाचे शस्त्र फारच परिणामकारक आहे आणि म्हणूनच मी तुझ्या नामस्मरणात बुडून जाणार आहे. हे माझ्या पित्यासमान देवा तुच रखुमादेवी वर आहेस अन् तुच माझा कान्हा आहेस.

*लेखक, संकलक* - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९)
*सुलेखन* - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१)

*या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”*

*आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.*

#वारी_जनातली_जनांच्या_मनातली
#वारी #वारकरी
#अभंग_माऊलींचे #माऊली_ज्ञानेश्वर # ashadhiekadashi #आषाढी_एकादशी
#संततुकाराम #पांडुरंग







*•| श्री पांडुरंग चरणार्पणमस्तु |•*

Address

Girgaum
Mumbai
400007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swasthyarang ।। स्वास्थ्यरंग ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Swasthyarang ।। स्वास्थ्यरंग ।।:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram