25/06/2025
इयत्ता पहिली ते सहावी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत होतो. परिस्थिती जेमतेम असलेल्यांना पालिकेची शाळा आधार होता. तिकडे शून्य खर्च असायचा. सगळं सरकारमार्फत मिळायचं. गणवेश, वह्या पुस्तकं, दप्तर, वॉटर बॉटल, डबा आणि जेवण सुद्धा. गणवेश म्हणजे निळा शर्ट आणि नेव्ही ब्लू चड्डी. नंतर तो बदलत गेला. आणि आता हा असा आहे. खर्च म्हणजे काय तर फक्त पेन्सिल वगैरे काही घ्यायची झाली तरच. सगळी पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहणारी झोपडपट्टीतली पोरं. नुसती उनाड. त्यात आमच्यासारखी कुणाशीही घेणं देणं नसलेली, शांत अशी फार अपवादात्मक.हे आठवण्याचं कारण अस की ही पोरं एक कागद घेऊन आली आणि डोनेशन डोनेशन म्हणून ओरडायला लागली. आम्हाला सुद्धा एक फॉर्म दिला जायचा आणि आर्मी साठी डोनेशन घेऊन या अस सांगितलं जायचं. मग कोण जास्त पैसे गोळा करतो याची शर्यत लागायची. त्यातले काही नमुने त्या फॉर्मचे कलर झेरॉक्स काढून पैसे जमवायचे आणि खिशात घालून कमाई करायचे. ओरिजनल फॉर्म थोडेफार पैसे भरून, नावं टाकून, सह्या करून शाळेत जमा करायचे. आम्हाला ही मंडळी थोर वाटायची. गेटवे जवळ असल्याने गर्दी असायची. तिकडे हे बऱ्यापैकी कमाई करायचे.
हे महिनाभर चालायचं. पण मला मात्र मूळ फॉर्म घेऊन जाताना सुद्धा लाज वाटायची. म्हणून घरातल्याच लोकांची नाव टाकून त्यापुढे दोन रुपये, पाच रुपये अस करून वीस पंचवीस चिल्लर शाळेत नेऊन द्यायचो. नंतर सातवीला बाजूलाच रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत ऍडमिशन मिळाली. मुंबईतली ही एकमेव रयतची शाळा. हजार बाराशे फी होती. पण ती सुद्धा फार वाटायची. तेव्हा तिकडे ऍडमिशन घ्यायला वेटींग असायची. शाळेची इमारत म्हणजे दोन - दोन बी एच के फ्लॅट होते. सकाळी पाचवी, सहावी, सातवी. दुपारी आठवी,नववी, दहावी अशी भरायची. एका बेंच वर तीन जणं बसायचो. तेव्हा आमचा पट बाहत्तर होता. पूर्णतः मराठी मध्यम. आता त्याची सेमी झाली आहे. पूर्ण शाळेत शंभर पोरं सुद्धा नाहीत. शिक्षक झोपडपट्टीत फिरून ऍडमिशन घ्या म्हणून प्रचार करत आहेत. आता फी सुद्धा नाही. आहे ती फक्त शाळा वाचवण्यासाठी चाललेली धडपड !
✍️बा. ल. ऋषि ❤️🌿
#रायतशिक्षणसंस्था #शाळा #मराठी