
18/08/2025
समतोल fitness म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी लेख. माझे लेख खालील लिंक वर उपलब्ध आहेत. मराठी, इंग्लिश आणि हिन्दी या तिन्ही भाषांमधे लेख उपलब्ध आहेत.
https://amrutasfitnessstudio-marathi.blogspot.com/.../blo...
https://amrutasfitnessstudio.blogspot.com/.../5-aspects...
https://amrutasfitnessstudio-hindi.blogspot.com/.../blog...
परिपूर्ण फिटनेस चे ५ पैलू .
तुम्ही व्यायाम म्हणून फक्त चालणं, फक्त योगासन किंवा फक्त weight lifting करत आहात का? जेव्हा आपण असा एकाच प्रकारचा व्यायाम करत राहतो तेव्हा फिटनेसचे काही पैलू सुधारतात पण सर्वांगीण फिटनेस मिळत नाही. तेव्हा संपूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी आपल्या व्यायामात आणखी कुठले घटक आले पाहिजेत ते पाहूया. मात्र या लेखामधे मी फक्त 'आरोग्यासाठी आवश्यक' अशा फिटनेस विषयी बोलणार आहे.
आता आरोग्यासाठी आवश्यक फिटनेस म्हणजे काय? शारीरिक फिटनेस चे वेगवेगळे प्रकार असतात का? व्यायाम करताना आपल्या सर्वांचीच आरोग्य आणि वजन दोन्ही सांभाळलं जावं अशीच अपेक्षा असते ना? हे अगदी खरं आहे की आपल्या सर्वाना व्यायाम करून बांधेसूद शरीर आणि उत्तम आरोग्य कमवायचं असतं. पण नक्की किती आणि कोणता व्यायाम करायचा हे मात्र आपल्या वैयक्तिक गरजांवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूला आपला खेळ सुधारायचा असेल तर तिला भरपूर, अगदी कस लागणारा व्यायाम करावा लागेल. तिचा व्यायाम सामान्य माणसापेक्षा खूपच जास्त असेल. त्याचप्रमाणे खेळासाठी लागणाऱ्या फिटनेसच्या इतर घटकांवरदेखील तिला भरपूर काम करावं लागेल जसे muscle power, चपळता, संतुलन इत्यादि. पण आपण सर्वसामान्य माणसं आरोग्यासाठी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासाठी व्यायाम करत असतो. आपले रोजचे आयुष्य उत्साहानी, न दमता जगता यावे हे आपले ध्येय असते. त्यामुळे आपला व्यायाम खेळाडूंपेक्षा वेगळा होतो.
तर आता हे 'आरोग्यासाठी आवश्यक ' असे फिटनेसचे घटक पाहुयात. सर्वांगीण फिटनेस चे ५ घटक आहेत जे आपल्या व्यायामात असले पाहिजेत.
१] दमसांस (Cardiovascular Endurance)- दमसांस म्हणजे आपल्या हृदयाची, फुफ्फुसांची आणि रक्ताभिसरण संस्थेची, काम करणाऱ्या स्नायूंना पुरेसे रक्त पुरवण्याची क्षमता. म्हणजे स्नायू जास्त काम करायला लागले तर जास्त रक्त पुरवता यायला पाहिजे. यालाच आपण stamina म्हणतो. हा घटक सुधारण्यासाठी आपण चालणे, पळणे, नृत्य, पोहोणे असे व्यायाम करू शकतो.
२] स्नायूंची ताकद (muscular strength) - स्नायूंची ताकद म्हणजे आपला एखादा स्नायू जास्तीतजास्त किती वजन उचलू शकतो याची क्षमता. म्हणजेच तो स्नायू जास्तीतजास्त किती जोर निर्माण करू शकतो ही क्षमता. स्नायूंची ताकद चांगली असेल तर आपली हाडे मजबूत राहतील, शरीराचा आकार सुधारेल तसेच आवश्यक त्या ठिकाणचा घेर कमी होईल. Fitness चा हा पैलू सुधारण्यासाठी आपण नियमित वजने उचलण्याचा तसेच योगासानांचा व्यायाम करू शकतो.
३] स्नायूंची तग धरण्याची क्षमता (muscular endurance) - स्नायूंची तग धरण्याची क्षमता म्हणजे न थांबता आकुंचन प्रसरण करत राहण्याची क्षमता. हा पैलू तपासल्याने एखादा स्नायू न दमता किती वेळ व्यायाम करत राहू शकतो हे आपल्याला कळते. हा देखील एक प्रकारचा दमसासच आहे. स्नायूंची टिकाव धरून राहण्याची ताकद वाढली की शरीराचा थकवा कमी होतो. हा पैलू सुधारण्यासाठी आपण नियमित weight training तसेच योगासाने करू शकतो.
४] लवचिकता (flexibility)- चांगली लवचिकता असणे म्हणजे सांधे त्यांची संपूर्ण हालचाल करू शकणे. म्हणजेच सांध्यांना आपली पूर्ण range of motion वापरता येणे. यावरून, रोजच्या हालचाली करताना सांधे आणि स्नायू किती वळू शकतात, ताणले जाऊ शकतात ते कळून येते. शरीराला इजा टाळण्यासाठी, स्नायूत पेटके येणे टाळण्यासाठी चांगली लवचिकता असणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित योगासने तसेच stretching करता येतील.
५] शरीराची जडणघडण (Body Composition)- शरीराची चांगली जडणघडण असणे म्हणजे शरीरात चरबी आणि इतर घटकांचा समतोल असणे. आपल्याला शरीरात lean body mass म्हणजे स्नायू, हाडे, इतर अवयव जास्त प्रमाणात हवे आहेत आणि चरबी कमी प्रमाणात हवी आहे. ही जडणघडण सुधारल्यामुळे शरीर बांधेसूद होते तसेच हृदयरोगाची शक्यतासुद्धा कमी होते. वरील सर्व घटक आपल्या workout मध्ये समाविष्ट करून तसेच योग्य आहार घेऊन आपण शरीराची चांगली जडणघडण राखू शकतो.
आपल्या workout मधे विविध प्रकारचे व्यायाम गुंफून आपण वरील सर्व पैलूंवर काम करू शकतो. जर आपला आपण व्यायाम करणार असू तर एखाद्या प्रशिक्षित Trainer चा सल्ला घ्यावा. व्यायामाचा एक आराखडा बनवून, शिकून घ्यावा. काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी तो गरजेनुसार बदलून घ्यावा. व्यायामाचे सर्व घटक विचारात घेतल्याने आरोग्याला प्राधान्य दिले जाते आणि फक्त वजनाला महत्व दिले जात नाही. एक सुदृढ, उत्साही शरीर घडविण्यासाठी वरील पाचही पैलूंवर प्रत्येक आठवड्याला काम करावे लागेल. आपण कोणत्याही वयाचे असलात तरीही, कारण आपल्याला रोजच्या आयुष्यात हे घटक वापरावे लागतात!
हा लेख संपवताना तुमच्यातील नियमित व्यायाम करणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करते. कुठल्याही प्रकारचा पण नियमित व्यायाम करणाऱ्यांचे अभिनंदन! मात्र नियमित व्यायाम करणाऱ्या आणि न करणाऱ्या सर्वांनी हा लेख नीट वाचून काढा, आपल्या व्यायामात योग्य ते बदल करा आणि व्यायाम करत रहा आणि माझा कानमंत्र लक्षात असू दया:
थोडा जरी असला तरी नियमित व्यायाम अतिशय आवश्यक आहे!