20/05/2025
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग, मातंग व इतर घटक समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय मिळावा, यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार, विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली असताना, महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी “मातंग समाज पहिल्यापासून महायुतीसोबत राहिलेला आहे,” असे स्पष्ट केले.
या वेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसंदर्भात येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी याची संपूर्ण जबाबदारी घेतो,” असे ठाम आश्वासन दिले.
या आंदोलनात सकल मातंग समाजातर्फे विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग आणि त्यातील उपजातींना शिक्षण, नोकरी आदी क्षेत्रात आरक्षणाची तरतूद करणे, वैद्यकीय व तंत्रशिक्षण यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये वर्गीकरणानुसार प्रवेश व सवलती देणे, आंध्र प्रदेशातील मादिगा समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणारे मॉडेल स्वीकारणे आणि अनुसूचित जातीसाठी राखीव निधीच्या सुरक्षेसाठी तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करण्याच्या मागण्या समाविष्ट होत्या.
या मोर्चात आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री रमेश बागवे, लक्ष्मण ढोबळे, दिलीप कांबळे, माजी आमदार अविनाश घाटे, ससाणे, सुधाकर भालेराव, गुंडिले, थोरात, राजू आवळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद गुंडले, श्री. विष्णूभाऊ कसबे, ॲड. राम चव्हाण, श्री. मारुती वाडेकर, श्री. सुधार धूपे, श्री. पंडित सूर्यवंशी, श्री. मुखेडकर आदी मान्यवर व समाजनेते उपस्थित होते.
सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने साद घातल्यानंतर एक लाखांहून अधिक समाजबांधवांची उपस्थिती आझाद मैदानात दिसून आली.
Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे MLA Sunil Kamble Jitesh Raosaheb Antapurkar
#जनआक्रोशआंदोलन
#उपवर्गीकरण #जनआक्रोशआंदोलन #20मेआंदोलन #समाजहक्क #आरक्षणासाठीलढा