05/02/2025
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर चा ११ वा वार्षिक उत्सव
दि. २ फेब्रुवारी २०२५
स्थळ – बुटीबोरी-उमरेड रोडवरील खापरी (डव्हा) गावातील शाळेजवळील पटांगण
वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यन्त
रविवार, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेचा ११ वा वार्षिक उत्सव दरवर्षी प्रमाणे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व पूर्व सरकार्यवाह, मा. भैय्याजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर ग्रामीण मधील ६५ गावातील किमान १३०० गावकरी व नागपूर शहरातील २०० नागरिकांच्या उपस्थितीत बुटीबोरी-उमरेड रोडवरील खापरी (डव्हा) गावातील शाळेजवळील पटांगणावर संपन्न झाला.
सर्वप्रथम सकाळी १० वाजता निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सायकी शेतावर मा. भैय्याजींचे आगमन झाले व त्यांचे हस्ते प्रथम भारतमातेचे पूजन करण्यात आले. गावकऱ्यांच्या पाऊल भजनाच्या गजरात, संस्थेच्या सचिव डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी औक्षण करून भैय्याजींचे स्वागत केले. नंतर निरामय संस्थेच्या हितचिंतकांनी आपला परिचय मा. भैय्याजींना करून दिला तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीही आपला परिचय करून देऊन आपापल्या भूमिका व जबाबदाऱ्यांची ओळख करून देऊन कामाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ग्राम विकास समितीच्या सदस्यांशी संवाद साधला, समितीच्या कार्याविषयी जाणून घेऊन पुढील यशस्वी कार्याबद्दल आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा. भैय्याजींनी कृषीकुंभ शेतकरी उत्पादन संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीकरिता मार्गदर्शन केले.
तदनंतर या उत्सवासाठी खापरी (डव्हा) या गावातील शाळेजवळील प्रांगणात उभारलेल्या सुशोभीत भव्य मंडपात मा. भैय्याजींचे आगमन झाले. तेथे आसपासच्या गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी निरामय च्या सहकार्याने सुरु केलेल्या लघु उद्योगाच्या उत्पादनांचे, रानभाजी व पौष्टिक खाद्य पदार्थांचे स्टॉल्स इत्यादींचे प्रदर्शन भरविले होते. गावातील महिलांनी लावलेल्या या प्रदर्शनातील रानभाजी स्टॉल्स ची स्पर्धा देखील संस्थेने आयोजित केली होती. मा. परीक्षकांनी निकाल जाहिर केला व कार्यक्रमाच्या शेवटी महिलांना बक्षिसे देण्यात आली.
लघुउद्योजकांच्या उत्पादनांमध्ये पंचगव्यापासून बनवलेल्या शॅम्पू, हेअर कंडिशनर, तेल, साबण, फेस पॅक, फिनाईल, धूपबत्ती, इत्यादी उत्पादनांचा समावेश होता. तसेच कापडी पर्सेस, बॅग्ज् इत्यादींचाही समावेश होता. मा. भैय्याजींनी या प्रदर्शनाला भेट देऊन सर्व महिलांचे भरभरून कौतुक केले. तसेच खापरी(डव्हा) येथे निरामय संस्थेचा जो दवाखाना चालतो त्या दवाखान्यात इ.पी.एच.सी.(टेलीमेडिसीन) मशीन बसाविण्यात आली त्या मशीनचे उदघाटन मा. भैयाजींच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे आसपासच्या २५ गावांमध्ये जे अभ्यास केंद्र चालतात त्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट, नागपूर चे माजी संचालक मा. श्री जी एस नटराजन यांच्या हस्ते करण्यात आले. संस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलामुलींनी भक्तिगीतांवरील नृत्ये, भजन, देशभक्तीगीतांवरील वरील नृत्ये, गीते व भाषणे सादर केली.
यानंतर भैय्याजी व इतर प्रमुख अतिथि व संस्थेचे पदाधिकारी मंचावर स्थानापन्न झाले. निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सचिव डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी संस्थेच्या मागील वर्षभराच्या विकास कार्याच्या अहवालाचे वाचन केले. किशोरी विकास व सखी केंद्र सुकळीच्या कु. हर्षा तलांडे यांनी संस्थेच्या कार्यामुळे आसपासच्या गावातील आरोग्याविषयक स्थितीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. त्यानंतर चिमणाझरी गावाच्या श्रीमती वंदना तुमडाम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या प्रयत्नामुळे गावातील महिलांना लघुउद्योगाचे महत्व समजून एम् गिरी, वर्धा सारख्या संस्थेतून प्रशिक्षण मिळाल्याने महिला आत्मविश्वासाने लघुऊद्योगाकडे वाटचाल करीत आहे असे त्यांनी सांगितले. गावांमध्ये मागील अकरा वर्षांपासून सुरु असलेल्या अभ्यास केंद्राचा विध्यार्थी, राजेंद्र सहस्त्रबुद्धे याने अभ्यास केंद्रातील संस्कारांमुळे त्याच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे विश्लेषण आपल्या मनोगतात व्यक्त केले.
मंचावर उपस्थित खापरी (डव्हा) गावचे सरपंच श्री विजय कुंभरे यांनी गावाच्या ग्रामविकासाच्या कार्याचा आढावा घेतला व त्यात निरामय संस्थेचा मोलाचा वाटा आहे हे व्यक्त केले.
त्यानंतर एम गिरी वर्धा या संस्थेचे संचालक मा. डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी गावकऱ्यांना लघु उदयोग व ग्रामोद्योगाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच गावातील लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन लघुउदयोगाद्वारे स्वावलंबी होण्यास प्रोत्सहीत केले व भविष्यातील सहकार्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात मा. भैयाजींनी संस्थेच्या प्रगतीचे भरभरून कौतुक केले तसेच महिला उद्योजिकांनी नवीन कौशल्ये शिकून घेऊन स्वावलंबनाच्या मार्गावरील त्यांच्या वाटचालीची वाखाणणी केली. त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना असे म्हंटले की, आजही भारताची बहुसंख्य जनता ग्रामीण भागात वसत असल्याने ग्रामीण भारत खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून आपापसातील भेदाभेद विसरून; एकोप्याने राहून; आपली संस्कृति, परंपरा व संस्कारांचे जतन करावे व त्याद्वारे गावांची सर्वंकष स्थिति अधिकाधिक मजबूत करीत आपल्या भारत देशाच्या सशक्तीकरणामध्ये बहुमोल हातभार लावावा. तसेच ग्रामविकासासाठी आवश्यक संघटन, पर्यावरण संरक्षण, जैविक शेती, समरसता इत्यादींचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे संचलन श्रीमती रश्मि देशपांडे व श्री. विलास खनगन यांनी केले. निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.