
13/04/2025
देहदान महादान -
मरणोत्तर देहदान करु इच्छिणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
परंतु देहदान प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने अनेकांची शेवटची इच्छा अपूर्ण राहते.
चला आपण देहदाना बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
देहदानाचा कायदा 1976 (सुधारित) कलम 5 (ब) प्रमाणे कोणाही व्यक्तीने जिवंत असताना लेखी अथवा तोंडी देहदानाची इच्छा व्यक्त केली असेल किंवा व्यक्तीच्या निधनानंतर नातेवाईकांची इच्छा असेल तर मृत व्यक्तीचा देह अधिकृत वैद्यकीय संस्थेला दान करता येतो. त्याकरिता कोर्ट किंवा पोलीसांची परवानगी लागत नाही.
मृत देहाचा उपयोग वैद्यकीय महाविद्यालयास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी केला जातो.
देहदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीसाठी नियम
1) देहदनाचे इच्छापत्र दोन प्रतित भरणे आवश्यक असते. फार्म व्यवस्थित भरुन एक प्रत जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात समक्ष सादर करावी किंवा पोस्टाने पाठवून द्यावी आणि दुसरी प्रत माहितीसाठी आपल्या नातेवाईकांकडे सुपूर्द करावी.
2) इच्छापत्र हे नातेवाईकावर नैतिकरित्या बंधनकारक आहे.
3) इच्छापत्र भरलेले नसेल तरीसुध्दा देहदान करता येते. पण नातेवाईकांना आपली इच्छा लेखी कळावी म्हणून इच्छापत्र भरावे.
4) आपल्या श्रध्देनुसार धार्मिक विधी करुनही आपण देहदान करु शकता.
5) देहदान रुढीविरोधी आहे पण अधार्मिक नाही.
6) एखाद्या व्यक्तीने इच्छापत्र भरुन देहदानाची इच्छा जरी व्यक्त केली असेल तरी खालील कारणे असले तर देहदान स्विकारले जात नाही.
1)आत्महत्या
2) अपघाती मृत्यू
3) खून
4) HIV Positive (AIDS) असल्यास
5) रक्ताची कावीळ असल्यास
6) 18 वर्षाखालील व्यक्ती व नवजात बालक
7) कॅन्सर ग्रस्त रुग्णाचे ही देहदान स्विकारले जात नाही.
निधनानंतर मृताच्या नातेवाईकांचे कर्तव्य -
1) मृत व्यक्तीने इच्छापत्र भरले असेल व तुमचा विरोध असेल तरीही मृताची अंतिम इच्छा पूर्ण करा.
2) निधनानंतर ताबडतोब डॉक्टरांकडून नैसर्गिक मृत्यूचा दाखला घ्यावा. त्याची एक प्रत देहदानाच्या वेळेस वैद्यकीय महाविद्यालयास सादर करावी.
3) मृतदेह दिवसा वा रात्री केव्हाही स्वीकारला जातो.
4) शक्य तो रात्री मृतदेह नेवू नये.
तथापी रात्र असल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्याय वैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक मेडिसीन) विभागाच्या शीतगृहात पार्थिव देह सुरक्षित ठेवून सकाळी शरीररचनाशास्त्र विभागास सुपूर्द करता येतो.
5) मृत्यूनंतर शक्य तो लवकर 6 ते 8 तासात मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात न्यावा कारण उशीर झाल्यास मृतदेह कुजण्यास सुरुवात होते व त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे असा मृतदेह स्विकारला जात नाही.
6) बाहेर गावाहून मृतदेह आणण्यासाठी शासकीय नियमानुसार त्यांच्या नातेवाईकांस वाहतूक खर्च दिला जातो.
7) मृतदेह ठेवताना किंवा उतरवताना कर्मचाऱ्यांना मदत करा. तीच तुमची शेवटची सेवा समजा.
8) देहदानानंतर आपणास देहदान केल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
आपल्याला देहदाना बद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा फॉर्म भरायचा असेल तर निःसंकोचपणे आमच्याशी संपर्क करा.
डॉ.दिलीप कदम
अक्षर मानव जन आरोग्य केंद्र
सुलाखे हायस्कुल रोड, बार्शी
मो.नं. 9423066330