
15/08/2025
*सैनिकी क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र हे एका दृष्टीने एकाच तत्वावर काम करतात - कमांडर विनायक आगाशे*
देशभक्ती, समर्पण आणि कार्यतत्परता यांचा उत्तम मिलाफ लष्करात काम करणाऱ्या सैनिकांमध्ये असतो… शरीरात १४ गोळ्या घुसल्यानंतरसुद्धा शत्रूची छावणी उध्वस्त करणारा जवान आणि एका खिंडीत शत्रू सैन्याला माघार घ्यायला भाग पाडणारा जवान.. यांच्या देशनिष्ठेला सलाम, आज ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आयुष्य जगू शकतोय.. सैनिकी क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र हे एका दृष्टीने एकाच तत्वावर काम करतात.. त्यात निष्ठा, समर्पण आणि कार्यतत्परता हे समान सूत्र असते. ज्या प्रमाणे शत्रूला नामोहरम करण्यासाठी सैनिक अतूट निष्ठा, साहस आणि टीमवर्क दाखवतात, त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णाला आजारातून मुक्त करण्यासाठी आरोग्यसेवक एकजूट, समर्पण,कौशल्य याद्वारे टीमवर्क दाखवतात .दोन्ही क्षेत्रातील यश केवळ टीमवर्क या गुणामुळे साध्य होते, असे प्रतिपादन मा. कमांडर विनायक शंकर आगाशे यांनी केले. श्रीगुरुजी रुग्णालयात देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कमांडर श्री विनायक आगाशे यांनी त्यांच्या सर्व्हिस काळातील युद्धाचे अनुभव आणि गोष्टी सांगत उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. ते शेवटी असंही म्हणाले की डॉ. हेडगेवार यांनी बघितलेले एकसंघ आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न आपण लवकरच पूर्ण करू असा मला विश्वास वाटतो..
आपल्या अध्यक्षीय भाषणात रुग्णालयाचे अध्यक्ष श्री. प्रवीण बुरकुले म्हणाले की सैनिकी क्षेत्रातील प्रत्येकाचे त्यांच्या कामावरती असलेले प्रेम, निष्ठा, त्यागाची भावना, प्रसंगी प्राण पणाला लावण्याची तयारी हे त्यांचे गुण आपल्याला अंगीकारता येतील का हे शिकले पाहिजे. आता रुग्णालयाचे विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे, लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढते आहे. रुग्णालयाचे विस्तारीकरण होत असताना, आपल्या विभागाची प्रगती होत असताना, आपण सर्वांनी त्यात मी कुठे असेन याचा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आतापासूनच नियोजन केले पाहिजे.
प्रारंभी रुग्णालयाच्या *जिव्हाळा* या त्रैमासिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर नुकत्याच नव्याने रुजू झालेले ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. गौरव काळे व फिजिओथेरपीस्ट डॉ. कोमल देवरे यांचे पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर डॉ. प्रेमलता दारोळे व पूनम बेलगावकर ,डॉ. उमेश धारने आणि बाल कलाकार क्रिश बेद्रे यांनी विविध देशभक्तीपर गीते आपल्या सुंदर आवाजात सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्या अश्विनी चाकूरकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले तर आभार प्रदर्शन कार्यवाह श्री. प्रकाश भिडे यांनी केले.
कार्यक्रमास बहुसंख्येने हितचिंतक, डॉक्टर्स, वैद्यकीय स्टाफ, मॅनेजर्स उपस्थित होते.