17/10/2022
अनेक दोष आपल्या हातून नित्य घडत असतात ,दोष म्हणजे सामान्यतः पापकर्मे . या दोषांमध्ये अनेक दोष असे आहेत जे आपल्या हातून घडत असताना नकळत वा अनवधानाने घडत असतात . त्याची जाणीव होत नाही . यातील सर्वात मोठा दोष आहे कृतघ्नत्वाचा दोष . कृतघ्न अर्थात केलेले उपकार विसरणारा . हे उपकार कोणते आणि ते कोणी कधी केले जे आपण नित्य विसरत आहोत .
दत्त माहात्म्यात गर्भवासाचे वर्णन करताना थोरल्या महाराजांनी याला नरक लोकांहून अत्यंत कष्टप्रद अशी उपमा दिली आहे यावरून गर्भावस्थेत असलेल्या कष्टांचे वास्तव लक्षात यावे . या गर्भवासात अनेक पीडा एकत्र येत जीवाला यातना देत असतात . अवाङ्मुख अर्थात उलट अशा देहावस्थेत असताना या यातनांना कंटाळून जीव हा परमात्म्याचे स्मरण करून म्हणतो ,
दुर्गंधीने कंटाळलो l जठराग्नीने पोळलो l ह्या नरकात लोळलो l
शिणलों आता सोडवी मज ll (द मा ११/२१)
या यातनांनी प्रत्येक जीव हा या ईश्वराला इथून सोडव ,यापुढे तुझ्या भजनात कसूर करणार नाही हे वचन अवश्य देतो . पण जीव हा देहावस्थेत जन्म घेताच या मायेच्या पाशात असा गुरफटतो कि तुझे भजन करेन असं कधी बरं म्हटलं होत ? विचार करून देखील आठवत नाही .
आठवायला तशी पूर्वजन्माची कर्मे लागतात त्याशिवाय आठवण होत नाही. आधीच एक तृतीयांश आयुष्य निद्रेत ,उरलेल्यात पहिली दहा बारा वर्षे आसपास काय होतंय याच्या समजण्यात अर्थात जगाची जगरहाटी कळण्यात . मग हाती कितीसे आयुष्य राहिले . सामाजिक प्रश्नांवर नित्य सतर्क असतो पण आपल्या स्वतःच्या आयुष्याचा प्रश्न कधीही आपल्याला भेडसावत नाही हा कलियुगाचा महिमा आहे . अनेकांना दिलेली वचने पाळण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दत्त महाराजांना गर्भावस्थेत दिलेले वचन विसरू नका . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य