04/11/2023
*येणाऱ्या दिवाळीनिमित्त सहज मनात आले म्हणून थोडक्यात साभार सादर...*
*उल्हासपूर्ण जीवन जगणे शिकविते आपली भारतीय सनातन संस्कृती*
आपल्या सनातन संस्कृतीमधील व्रते, सण आणि उत्सवाना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. सनातन धर्मात इतके अधिक उत्सव आणि सण आहेत की येथील दैनंदिन जीवनात एक म्हणच रुढ झाली आहे : 'सात वार अनेक सणवार' या अनेक उत्सव व सणांच्या रूपात आपल्या ऋषींनी जीवनाला रसमय आणि आनंदित बनविण्याची सुंदर व्यवस्था केली आहे. प्रत्येक सणाचे व उत्सवाचे एक विशेष महत्त्व आहे, जो विशेष विचार आणि उद्देश समोर ठेवून ठरविण्यात आला आहे.
हे उत्सव आणि सण मग कोणत्याही श्रेणीचे असोत आणि त्यांच बाह्यरूप कितीही वेगळे असो, परंतु त्यांची रचना करण्यामागे ऋषींचा उद्देश होता समाजाला भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे आणणे.
अंतर्मुख होऊन अंतर्यात्रा करणे हा भारतीय संस्कृतीचा मुख्य सिद्धांत आहे. बाह्य वस्तू कितीही आकर्षक वा भव्य असोत, परंतु त्यांच्याद्वारे आत्मकल्याण होऊ शकत नाही. कारण त्या वस्तू मनुष्याला परमार्थापासून दूर करून स्वार्थी बनवितात. म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्या जीवनाला अनेक उत्सव आणि सणांशी जोडून उत्तम ध्येयाकडे अग्रेसर होत राहण्याची व्यवस्था केलेली आहे.
मनुष्य आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार सदैव एका रसातच राहणे पसंत करीत नाही. जर वर्षभर तो आपल्या दैनंदिन कार्यामध्येच गुंतून राहिला तर तो उद्विग्न होईल. म्हणून त्याला मधून-मधून आरामही मिळत रहावा, जेणेकरून त्याला त्याच्या जीवनात काहीतरी नाविन्याचा व हर्षोल्हासाचा अनुभव करता यावा.
जे उत्सव एखाद्या महापुरुषाच्या अवतार किंवा जयंतीच्या रूपात साजरे केले जातात, त्यांच्याद्वारे समाजाला चारित्र्य, सेवा, नैतिकता, सद्भावना इ. ची शिकवण मिळते. कोणत्याही प्रकाशस्तंभ वा मार्गदर्शकाशिवाय जीवनात सफलतापूर्वक यात्रा करणे माणसाला शक्य नाही. म्हणून उन्नतीची अपेक्षा करणारे लोक आपल्या महान पूर्वजांचे स्मृतिउत्सव अतिशय गौरवाने साजरे करतात. ज्या व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनात महापुरुषांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ज्ञान-प्रकाश नाही, ती व्यक्ती किंवा तो समाज अधिक उद्विग्न, जटिल व अशांत असल्याचे दिसून येते. सनातन धर्मात सण म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस किंवा महापुरुषांची जयंतीच न समजता त्यांच्यापासून समाजाची खरी प्रगती आणि सर्वांगीण विकासाचा उद्देश सिद्ध केलेला आहे.
दीर्घकाळापासून अनेक समस्यांना तोंड देऊन, अनेक संकटांशी सामना करून व अनेक परिवर्तने झाल्यानंतरही आपली संस्कृती आजपर्यंत टिकून आहे तर याच्या मूळ कारणांमध्ये या सण व उत्सवांचेही मोठे योगदान लाभले आहे.