
05/05/2025
"दोन्ही हातांनी त्या शिवानंद स्वामीची दाढी धरून ती चांगली खसखसून उपटावी एवढा राग मला आला होता...!!!"
- स्वामी श्री शिवानंद -
१९३८ साली 'ज्वाला' हा मराठी चित्रपट प्रचंड तोट्यात गेल्यामुळे प्रसिद्ध नट आणि निर्माते बाबुराव पेंढारकर आणि मास्टर विनायक हे बंधू मोठ्या संकटात सापडले होते. अशा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे दुसरा एखादा हिट चित्रपट काढणे हाच असल्यामुळे ते तसं एखादं कथानक देण्याकरिता आचार्य अत्र्यांच्या मागे लागले होते. त्याच दरम्यान अत्रे यांच्या वाचनात 'ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हेच मरण !' हे स्वामी शिवानंद यांचं पुस्तक आलं होतं. त्याविषयी अत्रे लिहितात, "त्या पुस्तकातले चमत्कारिक विचार वाचून माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. "दोन्ही हातांनी त्या शिवानंद स्वामीची दाढी धरून ती चांगली खसखसून उपटावी एवढा राग मला आला होता!"
जेव्हा बाबुराव आणि विनायक अत्र्यांच्या घरी तगादा लावून बसले होते, तेव्हा अत्र्यांच्या डोक्यात त्या पुस्तकाचेच विचार घोळत होते. तसे ते घोळत असतानाच ते शौचालयात गेले आणि तिथे बसून विचार करता करता त्यांना 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कल्पना सुचली. त्यानंतर घडला तो इतिहास इथे सांगण्याची आवश्यकता नाही. ब्रह्मचारी चित्रपट तुफान यशस्वी ठरला आणि पेंढारकर बंधूंचं उखळ पांढरं झालं !
हे आठवण्याचं कारण म्हणजे त्यावेळी या घटनेला कारणीभूत असलेले ४२ वर्षांचे स्वामी शिवानंद काल दि. ४ मे २०२५ रोजी वयाच्या १२९ व्या वर्षी वाराणसीमधील आपल्या आश्रमात मरण पावले. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. बंगालमधील सिलहेट (सध्या बांगलादेशात) इथे गोस्वामी नामक आध्यात्मिक ब्राह्मण कुटुंबात १८९६ साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांचे आईवडील वारल्यावर स्वामी ओंकारानंद यांनी त्यांचा सांभाळ केला. आयुष्यभर त्यांनी 'व्याधीरहित मानवी जीवन' या विषयाला वाहून घेतलं होतं. त्यांचं सर्व लेखन आणि व्याख्याने त्याच विषयावर आहेत. १९२५ पासून पुढली जवळपास ३४ वर्षं ते इंग्लंडमध्ये होते. त्या काळात जगभर त्यांचे अनुयायी पसरले. त्यानंतर भारतात येऊन वाराणसीमधील कबीरनगर येथील आश्रमात ते स्थायिक झाले. "आम्हाला कोणतीही आर्थिक देणगी नको आहे. देणगी द्यायची असेल, तर ती शारीरिक, मानसिक आणि आत्मिक योगदानाच्या स्वरूपात द्यावी!" असं आवाहन ठळक अक्षरांत त्यांच्या वेबसाईटवर केलं आहे. यावरून त्यांची निस्पृह वृत्ती दिसते. मध्यंतरी पु. ना. गाडगीळ यांच्या एका कार्यक्रमात शिवानंद आले होते, तेव्हा ९७ वर्षांच्या दाजीकाका गाडगीळांनी "मला एरवी आशीर्वाद देण्याचं काम करावं लागतं. पण आज मी ज्याच्या पाया पडू शकेन असा माणूस इथे उपस्थित आहे !" असं म्हणून शिवानंद यांना साष्टांग नमस्कार घातला होता.
अशा या स्वामी शिवानंद यांचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान काँग्रेस सरकारने कधी केला नाही. मात्र २०२२ साली मोदी सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची थोडीफार पोच दिली होती. काल त्यांच्या मृत्यूनंतर मोदी आणि योगी यांनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली वाहत असताना मी एवढंच म्हणेन, की त्यांच्या विचारांची खिल्ली उडवणाऱ्या आचार्य अत्र्यांसारख्या अनेकांना पुरून उरून त्यांनी स्वतः व्याधीरहित दीर्घायुषी जीवन जगून दाखवलं आणि स्वतःचे विचार सिद्ध केले आहेत. असा क्रियाशील महात्मा दुर्मीळच !
*- हर्षद सरपोतदार*