04/12/2025
*महाराष्ट्र फार्मसीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न*
महाराष्ट्र फार्मसी, निलंगा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी रेणुका ब्लड बँक, धाराशिव येथील श्री. शिंदे संजय, श्री योगेश मगर तसेच एचडीएफसी बँकेचे मॅनेजर श्री शैलेश काळे व श्री सचिन पाटील, सौ. दुर्गा गरड, सौ. स्वाती तांबोळी, सौ. श्रुती देशपांडे यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, डॉ. सिद्धेश्वर पाटील प्रमुख उपस्थित होते.
महाविद्यालयातील रेड रिबन क्लब, बर्थडे ब्लड डोनेशन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. मानवी जीवन वाचविण्यासाठी रक्तदान ही सर्वात श्रेष्ठ समाजसेवा असून गरजू रुग्णांना नवीन जीवनदान देण्याची ही पवित्र कृती आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ यांनी केले.
रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर एक मानवी कर्तव्य आहे. एका थेंब रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात, ही जाणीव प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे असे मत डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी व्यक्त केले.
समाजातील रक्ताच्या गरजेसंदर्भात जनजागृती करणे आणि रुग्णसेवेसाठी योगदान देणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.
या वेळी प्रा.अविनाश मुळदकर, प्रा संजय दुधमल, विलास कारभारी, प्रा.चंद्रवधन पांचाळ, प्रा.माधव शेटकार, रविराज मोरे, नामदेव माने यांची उपस्थिती होती.
दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित या शिबिरात एकूण ४१ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .अमोल घोडके तर आभार प्रदर्शन डॉ. सुनील गरड यांनी मांडले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील स्वयंसेवक, शिक्षक व विद्यार्थ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.