12/09/2024
महाभारतात श्रीकृष्ण लढण्याची हिंमत घालविलेल्या अर्जुनाला जो मार्ग दाखवतो ते एक प्रकारे समुपदेशन असत. खचलेल्या अर्जुनाला त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देणे व त्याला लढण्यासाठी प्रेरणा देणं हे सांगणारा कृष्ण आपल्या आयुष्यात हवा असे प्रत्येकाला वाटत.
"मॅडम, माझ्या बहिणीला खूप त्रास आहे, तुम्ही तिला काही मदत करू शकता का" ? असे विचारणारा भाऊ,
"माझ्या मुलाला मदतीची गरज आहे, त्याचे हाल बघवत नाही" अशी विनवणी करणारी आई,
"माझा सहकारी नीट काम करत नाही त्याला थोडे मार्गदर्शन करा मॅडम", अशी सूचना देणारी एखाद्या कंपनीतील मॅनेजर हे सर्व एक प्रकारे श्रीकृष्ण असतात.
वाट हरविलेल्या अर्जुनाचा रथाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करणारे, त्याची वाईट काळात साथ न सोडणारे.
जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक त्रासाचा सामना करायला सुरवात करते म्हणजे नेहमीच्या शांत व आनंदी जगण्यातून काहीतरी वेगळे वागते तेव्हा बऱ्याच लोकांना स्वतःच या गोष्टी लक्षात येऊन ते मदत मागायला येतात व अशी लोक लवकर सुरळीत होतात कारण त्यांची ती स्वतःची इच्छा असते. आपल्याला यातून बरे व्हायचे आहे हा निर्णय त्यांचा स्वतःचा असतो.
याउलट डिप्रेशन, व्यसन, चिंता, अश्या त्रासातून जाणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला काही त्रास आहे हे मान्यच करत नाही, त्यातून स्वतःहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही तो पर्यंत प्रत्यक्ष श्रीकृष्ण जरी त्याला उपदेश द्यायला आला, स्वतःचे विश्वरूप दाखविले तरी त्या व्यक्तीत फरक पडणार नाही. अर्थात हे वागणं त्या व्यक्तीच्या आत्मघाताची सुरवात असते.
खिन्न मानसिक स्थिती असताना आजूबाजूला असणारी हितचिंतक लोक दुश्मन वाटतात, त्यांचे सल्ले जे काळजीतून आले असले तरी उदास व्यक्तीला आवडत नाहीत. अश्या काळोखात पुढचे काहीच दिसत नसले तरी श्रीकृष्ण कोणत्यातरी रूपात आपल्याला आशेचा किरण दाखवत असतो.
अनेक वर्ष मानसिक त्रासातून गेल्यावर योग्य वेळी, कित्येक लोकांनी दिलेले सल्ले व मदत माझ्यासाठी जीवनदायी ठरले.
२०२० च्या सुरवातीला "तू मराठीतून लिही आणि लिखाण सोडू नकोस" असे सांगणारा अनाहूत सल्ला,
२०२० च्या शेवटी "मॅडम तुम्ही ट्विटरवर परत येऊन लिखाण करा, लोकांना चांगल वाचायला मिळेल" असा मोलाचा सल्ला,
२०२२ मध्ये आजारी असताना, कोणीतरी माझ्यावर दया करून मिळवून दिलेले लिखाणाचे काम,
अश्या ठिकाणी मला न मागता आवश्यक ती मदत मिळाली.
या सोबत कामाच्या ठिकाणी सांभाळून घेणारे काही सहृदय सहकारी, काही मित्र मैत्रिणी, कित्येक वेळा अनोळखी लोकांनी मदत केल्याने माझा खडतर काळ निभला.
आज मागे वळून पाहताना या सर्वांचे मी ऐकले नसते, गरज पडल्यास स्वतःहून मदत मागितली नसती तर काय झाले असते याची कल्पना करवत नाही.
आपल्याशी नीट बोलणारी, मदत करणारी लोक आपल्याकडून फायदा व्हावा म्हणून नाही तर त्यांना आपली काळजी आहे म्हणून मदत करत असतात,
त्यांचे न ऐकणे, मनाला येईल त्या गोष्टी करणे हे तुमचं नुकसान करतात, इतरांचे आयुष्य पुढे जाते, तुम्ही मात्र मागे राहता. मग यात दोष कोणाचा ?
तुम्ही ठरवलं तर तुमचे नुकसान कोणीच करू शकत नाही त्यामुळे मेंदूतील नकारात्मक विचारांना शरण न जाता त्यांच्याशी अर्जुनासारखे लढून मनातील काळोखावर विजय मिळवायला हवा.
या काळोख व प्रकाशाच्या लढाईत श्रीकृष्ण हा नेहमी तुमची साथ देईल😇
#मानसिक #मन
#सुख #आशा
#आयुष्याच्या_पुस्तकातून #आयुष्य #शुभसकाळ #प्रेम #आनंद #मराठी #महाराष्ट्र #भावना #मानसिकआघात #आघात #आरोग्य #मदत #गीता #श्रीकृष्ण #मार्गदर्शन