14/10/2020
*पॅरामेडिकल जगतातील पॅथॉलॉजी शाखा व त्यातील रोजगाराच्या संधी*
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार!
पॅथॉलॉजी ही मेडिकल सायंसचीच एक शाखा आहे. या अंतर्गत आजाराची कारणे, विकास आणि प्रभावांचा अभ्यास केला जातो. शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून रोगाचे निदान करण्यासाठी या शाखेची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी वेळ निघून जाण्याआधी लक्षात येतात आणि रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होते. आजच्या काळात तर संसर्गजन्य व साथीच्या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या तपासण्या करून घेणं अत्यंत गरजेचं व महत्वाचं बनलं आहे.
सर्वसामान्यपणे रुग्ण व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांवर काम केले जाते. सर्वप्रथम लक्षणे घेऊन आलेल्या रुग्णाची शारीरिक तपासणी करणे व त्याचा आरोग्यविषयक त्याचा इतिहास जाणून घेऊन रोगाबाबत प्राथमिक निदान करणे. त्यानंतर गरजेनुसार विविध प्रकारच्या तपासण्या करून घेणं व एका निश्चित निदानापर्यंत पोहोचणं आणि मग सर्वांत शेवटी योग्य त्या उपचारांस त्वरित सुरुवात करणं. या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यावरील महत्वाची भूमिका पॅथॉलॉजी क्षेत्रात पार पाडली जाते. शरीरातील अस्वाभाविक बदलांची नोंद घेणारी ही शाखा एखाद्या बॅक ऑफिसप्रमाणे आपलं कार्य पार पडत असते. यामध्ये काम करणाऱ्या टेक्निशिअन्सना फार सजग असावे लागते. कारण शरीरातील रक्त, टिश्यूज, फ्लुइडस यांचे नमुने काळजीपूर्वक घेणं व साठवणूक करणे गरजेचे असते. हे नमुने जर चुकीच्या पद्धतीने घेतले गेले तर अर्थातच निदानदेखील चुकीचे होणार आणि म्हणूनच हे काम फक्त प्रशिक्षित टेक्निशियनमार्फतच पार पाडले जाते. या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित टेक्निशियन म्हणून करिअर करण्यासाठी डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट असे तीन प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. आरोग्य क्षेत्रात अविरतपणे काम करणाऱ्या डॉक्टरांना रोगाचे अचूक निदान करण्यास मदत करणारा हा एक असा अभ्यासक्रम आहे कि जो यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १००% रोजगाराच्या संधी लगेचच उपलब्ध आहेत.
प्रोफे. डॉ. पंजाब विनायकराव कथे
संस्थापक-अध्यक्ष
डॉ. कथे पॅरामेडिकल इन्स्टिटयूट नारायणगांव
संपर्क क्रमांक: ०२१३२-२४५९५०, ९१४६१९३७०९