14/05/2023
नमस्कार,
आज आपण आकाश महाभूताबद्दल थोडी माहिती घेऊया. आकाश महाभूत म्हणजे पोकळी, अवकाश. निसर्गात आपण आकाश पाहतो… आपल्याला वाटतं तेवढेच आकाश आहे पण तसं नाहीये जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे आकाश महाभूत असते.
आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते असं आपण सगळेजण जाणतो. पण त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात आकाश महाभूत असते हे आपल्याला माहिती आहे का? बहुतेकांना हे माहिती नसावं.
एक उदाहरण देऊन मी समजावते,
आपण तोंडात घास घेतो. तोंडात पोकळी नसेल तर तो घास तोंडात जाईल का हो? तिथून पुढे पोकळी नसेल तर तो घास पुढे पुढे जात राहील का? आलं लक्षात? हे फक्त पचनसंस्थेबद्दल सांगितलं मी.
अशाच प्रकारे फुफ्फुसे, रक्तवाहिन्या, हाडे, सर्व नसा, हृदय, यकृत, प्लिहा, मूत्रपिंड अशा सर्व ठिकाणी पोकळी असते…. आकाश महाभूत असते आणि म्हणूनच या सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित चालते.
त्यात बिघाड झाला म्हणजे काय होते हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ.
बीपी…ब्लड प्रेशर हा शब्द आता सगळ्यांच्या परिचयाचा आहे. या आजारात रक्तवाहिन्यांच्या आत फॅट साठते आणि त्यामुळे ब्लड प्रेशर हा आजार निर्माण होतो. आता इथे लक्षात आलं का तुमच्या की त्या रक्तवाहिनीच्या आत फॅट साठल्यामुळे तिची पोकळी…आतले आकाश महाभूत कमी झाले आणि त्यामुळे तिथले जे व्यवस्थित चालणारे कार्य होते त्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला.
अशाच प्रकारे ज्यावेळी आपल्या फुफुसांमध्ये कफ साठतो त्यावेळी तिथले आकाश महाभूत कमी होते आणि त्यामुळे दमा हा आजार उत्पन्न होतो.
ही काही उदाहरणे आपण पाहिली.
यावरून एक लक्षात आले का तुमच्या, की शरीरातील आकाश महाभूत प्राकृत ठेवणे म्हणजेच आरोग्य आणि आकाश महाभूताची प्राकृत स्थिती बिघडणे म्हणजे आजार निर्माण होणे.
एक पांचभौतिक चिकित्सक म्हणून रुग्णचिकित्सा करताना आम्ही यासाठीच औषधे देतो आणि रुग्ण बरा होतो.
अर्थात वेगवेगळ्या सिस्टीम साठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करून वेगवेगळी चिकित्सा ठरवावी लागते.
डॉ अमरजा गाडगीळ,
9422002587/9359095463
श्री गुरुदेव आयुर्वेद दवाखाना,
Shop no 5, Runwal Sankalp building,
Near Badhai chowk, Kothrud, Pune 38