22/05/2022
अजातशत्रुच्या आजारावर जीवकाचा उपचार आणि तिसऱ्यांदा 'वैद्यकाचा राजा' किताबाने गौरव.
सदर कथा ही फक्त तिबेटी साहित्यात (१९२५, १०७-१०८) आढळते. देवदत्ताने आपला जीवलग मित्र राजपुत्र अजातशत्रू यास आपल्या पित्याचा वध करून स्वतः राजा होण्यासाठी प्रेरित केले. दुर्दैवाने अजातशत्रूने आपल्या पित्याचा खून घडवून आणला; परंतु आपल्या न्यायप्रिय वडिलांचा खून केल्याचे त्याला नेहमी बोचत राहिले. तो भ्रमिष्टासारखा वागू लागला. त्याने अनेक वैद्यकांना औषधोपचार करण्याची विनंती केली. परंतु सर्वांकडून त्याला एकच उत्तर मिळाले. 'राजा, तुझा बंधू , 'वैद्यकांचा राजा' जीवक इथे उपलब्ध असतांना आम्ही तुझ्यावर काय उपचार करणार ?'
शेवटी अजातशत्रूने आपल्या मंत्र्यांकरवी जीवकास निरोप पाठविला. जीवक त्याप्रमाणे राजा अजातशत्रू पुढे येऊन उभा राहिला. आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी अजातशत्रुने जीवकास विनंती केली. जीवकाच्या लक्षात आले की, 'राजा अजातशत्रूला बरे करायचे तर त्याला दुःखाच्या खाईत लोटणाऱ्या अथवा आनंदाच्या शिखरावर पोहचविणाऱ्या प्रसंगातून एकदा जायला पाहिजे. अजातशत्रूसारख्या पापी माणसात आनंदातिरेकी प्रसंग निर्माण करणे शक्य नाही. त्यापेक्षा अत्यंत दुःखद प्रसंग त्याच्यासाठी उचित ठरेल. 'मनाचा निग्रह करून जीवक राजास म्हणाला, “महाराज आपण बरं होण्यासाठी फक्त एकच उपाय मला सूचतो. तो म्हणजे राजपुत्र उदयभद्र याचे मांस भक्षण.” हे ऐकून राजा आगेने तीळपापड झाला. जीवकाकडे पाहत अक्षरश: ओरडला,
'फार छान ! मी माझ्या पित्याचा वध केला आणि राजा झालो. आता तू मला राजपुत्र उदयभद्र यास यमसदनी पाठवायचे सांगतोस. म्हणजे मी या त्रासातून मुक्त होण्याऐवजी तुला स्वत:ला राजा व्हायचा मार्ग मोकळा करतो आहेस. ''मी सांगितलेला एवढा एकच उपायाचा पर्याय माझ्याकडे आहे महाराज, दुसरा मला अजिबात सुचत नाही. जीवक उत्तरला.
शेवटी राजाने धैर्य करून जीवकास उपचारासाठी परवानगी दिली. त्यानंतर जीवकाने राजपुत्र उदयभद्र यांस राजेशाही वस्त्राने नटविले आणि राज उभा करीत त्यास बोलला, 'अहो राजे! राजपुत्र उदयभद्र यांस डोळा भरून पाहण्याचे कष्ट करा, कारण यानंतर तो तुम्हास कधीच दिसणार नाही".
त्या नंतर जीवक राजपुत्र उदयभद्र यास घेऊन बाहेर पडला. त्यास आपल्या घरी आणले व लपवून ठेवण्याचे सांगून तो बाहेर पडला. जीवक स्मशानभूमीत आला. प्रेतांची कमी नव्हती. त्याने एका प्रेतातून थोडे मांस बाहेर काढले व घरी पोहचला. घरी पोहचल्यानंतर आणलेल्या मांसापासून त्याने खमंग असा पदार्थ तयार केला. सायंकाळच्या जेवणाच्या वेळी त्याने राजास आमंत्रण दिले व तयार केलेला पदार्थ वाढला. राजा घास घेणार एवढ्यात जीवक उद्गारला, 'पापी माणसा ! आधी पित्याचा वध केलास आणि आता आपल्या पुत्राचे मांस खाण्यास तू तयार झाला आहेस. 'हे ऐकून राजा अत्यंत दुःखपूर्ण स्थितीत आला. तेवढ्यात जीवकाने त्याच्या डोक्यावर हलका प्रहार केला . या सर्वांमुळे राजास तीव्र दुःखावेग झाला व तो बेशुद्ध पडला. थोड्या वेळानंतर जीवकाने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले व राजास शुद्धीवर आणले. तो पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर जीवकाने त्याच्या आंघोळीची तयारी करण्यास सांगितले. नंतर त्यास पौष्टिक भोजन दिले. त्या नंतर राजा अगदी पूर्ववत झाला. काही वेळा नंतर जीवकाने राजकुमार उदयभद्र यास राजेशाही वस्त्रे घालून राजासमोर उभे केले. राजाचे चरणस्पर्श करीत उदगारला, 'राजा, हा राजकुमार उदयभद्र तुमच्या समोर उभा आहे. मी आयुष्यात मुंगीलाही मारले नाही. त्यात राजकुमार उदयभद्र यास कसा मारेन?; परंतु तुमचा प्राण वाचविण्यासाठी हे सर्व करणे अपरिहार्य आणि अनिवार्य होते. म्हणून मी ते केले. क्षमा असावी.
जीवकाच्या अचाट बुद्धीची कल्पना राजा अजातशत्रूस आली आणि त्याने ताबडतोब आपल्या मंत्रीगणास बोलावून जीवकास 'वैद्यकांचा राजा' हा किताब जाहीर करण्यासाठी व्यवस्था करण्याचे फर्मान काढले. हत्तीवर बसून जीवकाची मिरवणूक काढण्यात आली. त्यास 'वैद्यकांचा राजा' हा किताब बहाल करण्यात आला.
ही गोष्ट जीवकाच्या मनोविज्ञान, मनोविकार आणि त्यावर उपचार या बाबीवर प्रकाश टाकते. ही कथा तिबेटी साहित्यातच आढळते. त्याचा संदर्भ इतरत्र कुठे नाही. परंतु गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेतले तर जीवकाचे ज्ञान किती उच्च कोटीचे होते, या बाबत संशय राहू नये. शल्यचिकित्सा, औषधवैद्यकशास्त्रीय उपचार तसेच मनोविकारावर साजेशी उपचार पद्धती जीवकाने आत्मसात केली होती. म्हणूनच त्यास तिसऱ्यांदा 'वैद्यकाचा राजा' हा किताब बहाल करण्यात आला, तो केवळ त्याच्या कर्तबगारीमुळे.
अजातशत्रू यास जडलेल्या मनोविकाराचे चर्चात्मक विश्लेशण दीघ निकाय मध्ये सविस्तरपणे दिले आहे. जीवक अजातशत्रूस भगवान बुद्धाकडे घेऊन जातो. त्या वेळी अजातशत्रूच्या डोक्यात शंका - कुशंकांचे काहूर माजलेले असते. त्यावर जीवक समाधानकारक उत्तरे देतो. भगवान बुद्धाच्या प्रवचनानंतर अजातशत्रूच्या वागण्यात आमूलाग्र फरक होतो, असे वर्णन दीघनिकायमध्ये दिलेले आहे.
संदर्भ: प्राचीन वैद्यक जीवक
डॉ.अनिलकुमार रॉय(एम.डी.पीएचडी.)