22/05/2023
'कोलेस्टेरॉल: मित्र की शत्रू?' .
शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या आवरणाचा कोलेस्टेरॉल हा महत्त्वाचा घटक असतो. पेशीच्या वेशीतून अनेक पोषक पदार्थ, उत्पादनं ये-जा करतात. विजेचे आणि रासायनिक संदेश वेशीपार जातात. ते सगळं दळणवळण सुरळीत पार पडायला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. पित्तरसातलं आम्ल, त्वचेखाली बनणारं ड-जीवनसत्त्व, थायरॉइडपासून इस्ट्रोजेनपर्यंत अनेक हॉर्मोन्स कोलेस्टेरॉलपासूनच बनतात. इतपत कोलेस्टेरॉलची आपल्या शरीराला ‘नितांत गरज’ असते; पण म्हणून ताळतंत्र सोडून पिझ्झा-चीझ-लोणी चापायचं नसतं.
दूधदुभतं, मांस, अंडी या आहारातल्या प्राणिज पदार्थातून तयार कोलेस्टेरॉल आणि शिवाय स्निग्धाम्लं हा कोलेस्टेरॉल बनवायचा शिधाही मिळतो. काजू-शेंगदाणे-बदाम-पिस्ते, गोडं तेल, तिळेल वगैरे खाद्यतेलं यांच्याकडूनही लिव्हरला स्निग्धाम्लांचा शिधा मिळतो. २०० मिलिग्रॅम तयार कोलेस्टेरॉल शरीरात गेलं की त्याला पूरक म्हणून लिव्हर ८०० मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल बनवतं. आहारातून अधिक कोलेस्टेरॉल आलं तर लिव्हरचं उत्पादन आपसूकच कमी होतं. लिव्हरनं बनवलेली ती तेलकट रसद प्रथिनांच्या बासनात गुंडाळून पेशींकडे पोचते. त्या गाठोडय़ांची नावं लांबलचक आहेत. त्यांना थोडक्यात ‘व्हीएलडीएल’ आणि ‘एलडीएल’ म्हणतात. ती पेशींकडचं कोलेस्टेरॉल आणि त्याचे दुष्परिणाम वाढवतात म्हणून त्यांना दुष्ट कोलेस्टेरॉल म्हणतात. पेशी त्या गाठोडय़ांतून आपल्याला हवं तेवढं कोलेस्टेरॉल काढून घेतात आणि उरलेलं कोलेस्टेरॉल (एचडीएल) उलटटपाली लिव्हरकडे पाठवतात. तिथून ते पित्ताम्लांच्या रूपाने आतडय़ांतून बाहेर जातं. अधिकचं कोलेस्टेरॉल शरीराबाहेर पाठवतं म्हणून एचडीएल गुणी! ते जेवढं अधिक तेवढं बरं.
शरीरात कुठल्याही गोष्टीची अडगळ व्हायला लागली की लढाऊ पेशींना सफाई कामगार म्हणून पाठवलं जातं. रक्तवाहिन्यांत, लिव्हरमध्येही लढाऊ पेशी साचलेल्या कोलेस्टेरॉलची युद्धपातळीवर सफाई करतात. त्या हाणामारीत रक्तवाहिन्या आणि लिव्हर दोघांनाही इजा होते. रक्तवाहिन्यांच्या व्रणांत कोलेस्टेरॉलचा साका (प्लाक्स) बसतो. तशी इजा चालूच राहिली तर हृदय/मेंदूकडे रक्त पोहोचवणाऱ्या वाहिन्या साक्याने चिंबतात. रक्तदाब वाढतो, हार्ट ॲटॅक, अर्धाग, बुद्धिभ्रंश संभवतात. लिव्हरला इजेमुळे सूज येते (नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपॅटायटिस), कॅन्सर होऊ शकतो. इतर अवयवांतही रक्तवाहिन्यांना सूज येते, इजा होते. संपृक्त स्निग्धाम्लं लिव्हरला अधिक कोलेस्टेरॉल बनवायला प्रोत्साहन देतात. दुष्ट कोलेस्टेरॉल (एलडीएल) वाढवतात. तूप बनवताना लोणी फार तापवावं लागतं. त्याने कोलेस्टेरॉलचा प्राणवायूशी संयोग होतो. हे ऑक्सिडाइज्ड कोलेस्टेरॉल जास्त अपायकारक.
कोलेस्टेरॉल अत्यावश्यकही आहे आणि अपायकारकही आहे. मग प्रकृती सांभाळायला काय करायचं?
आहारातलं कोलेस्टेरॉल रोज २०० मिलिग्रॅमहून कमीच (रोजच्या कॅलरीजच्या १० टक्के हिश्शाहून कमी) ठेवावं. तेल-तूप-चरबी भरपूर असलेले पनीर-पिझ्झा-पेढय़ासारखे बाजारी पदार्थ टाळले तर संपृक्त आणि ट्रान्स स्निग्धाम्लं टळतील. रोजच्या कॅलरीजचा ५ ते ११ टक्के भाग गोडय़ा तेलासारखी न गोठणारी तेलं, काजू-शेंगदाणे, काळय़ा पाठीच्या माशांचा तेलकट भाग वगैरेंमधून मिळवावा. (प्रत्येकाची कॅलरीजची गरज वेगवेगळी असते. तिच्यासाठी सल्ला घ्यावा.) शुद्ध साखरगुळाचाही आहारातला हिस्सा कमीत कमी ठेवावा. सोबत अ-सडिक धान्यं, सालीसह कडधान्यं, पालेभाज्या आहारात घ्याव्या. त्यांनी साखर, कोलेस्टेरॉल रक्तात कमी पोहोचतात. रोज नियमित १०००० पावलं चाललं तर फायदा होतो. इतकंच पाळलं तरी दुष्ट कोलेस्टेरॉल घटतं, गुणी कोलेस्टेरॉल वाढतं. थोडक्यात काय तर, कोलेस्टेरॉलला सन्मानाने वागवावं, पण हृदयात थारा देऊ नये.
– उज्वला दळवी लिखित लेखातून
#आरोग्यमित्र