27/11/2025
केवळ दोन जीव वाचावे म्हणून…
कामा हॉस्पिटलमधील परिचारिका अंजली कुलथे यांनी सांगितली मुंबई हल्ल्याची कहाणी
२६/११ची रात्र आणि हॉस्पिटल झाले युद्धभूमी
“मी त्या रात्री ड्युटीवर होते. अचानक बातमी आली, सिएसटीवर फायरिंग. आम्ही emergency सज्ज ठेवले.
पण क्षणभरातच गोष्टी हाताबाहेर गेल्या.
गोळ्यांच्या फैरी इतक्या जवळून ऐकू येऊ लागल्या की अंगावर शहारे उठावेत.
मी कॉरिडॉरमध्ये गेले… आणि समोरच दृष्य भयंकर होते.
दहशतवादी हॉस्पिटलमध्ये घुसले होते.
गोळ्या, काचांचे तुकडे, धूर… क्षणातच आमचं कामा हॉस्पिटल युद्धभूमी झालं होतं.”
“माझ्या वॉर्डमध्ये २० गर्भवती होत्या… आणि त्यांना लपवण्यासाठी फक्त एक पँट्री.”
“मी वॉर्डमध्ये धाव घेतली. माझं पहिलं काम होतं २० गर्भवतींना सुरक्षित ठेवायचं.
आम्ही सगळ्या महिलांना एका 10x10 च्या पँट्रीत नेलं.
अंधार केला. मोबाईल बंद.
फक्त श्वासांचे आवाज…
आणि बाहेर सततचा गोळीबार.”
“या भयंकर स्थितीत एका गर्भवतीला प्रसव वेदना सुरू झाल्या”
“ती सिव्हिअर हायपरटेंशनची रुग्ण होती.
तीची अवस्था बिघडू शकत होती.
लेबर रूम वरच्या मजल्यावर होते… तो कॉरिडॉर ओलांडून जायला लागणारं होतं.
आणि बाहेर पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार अजूनही सुरूच होता.
त्या क्षणाला दोन जीव वाचवणं माझं कर्तव्य होतं.
माझी भीती, माझा जीव, यापेक्षा ते दोन जीव मोठे होते.”
“तिचा हात घट्ट पकडला… आणि पुढे निघाले”
“मी तुला काहीही होऊ देणार नाही,” इतकंच तिला सांगितलं.
भिंतीला टेकून-टेकून आम्ही पुढे निघालो.
कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकत होतं.
पण मनात एकच ध्येय होतं...
हे दोन जीव वाचले पाहिजेत.”
“सकाळ झाली…”
“थरार, भीती, प्रार्थना…
ही रात्र कधी संपली मला कळलंच नाही.
सकाळी साडेसात वाजता आम्ही उसासा टाकला.
सर्व २० गर्भवती सुरक्षित होत्या.
मी लेबर रूममध्ये घेऊन गेलेली गर्भवतीही सुरक्षित होती.”
“त्या क्षणी मला जाणवलं…
युनिफॉर्म फक्त कपडा नसतो.
ते आपलं बळ असते.”
“कसाबची ओळख परेड...”
“हल्ल्यानंतर काही दिवसांनी कसाबची ओळख परेड होती.
मी पुन्हा गणवेशात गेले.
आणि त्याला ओळखलं.
माझ्या डोळ्यासमोर अजूनही ती रात्र, तो कॉरिडॉर, तो आवाज…
तेच माझं बळ ठरलं.”
........
#तिचेधाडसतिचीकहाणी