15/01/2023
*तिळगुळ घ्या गोड गोड बोला..!!*
आज मकर संक्रांत..!!
सूर्याचे मकर राशीमध्ये प्रवेश करणे, थंडी कमी होऊन उन्हाळ्याची सुरुवात होणे अशी या मकर संक्रातीविषयी सर्वांना माहिती आहेच. भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक व्यक्ती ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जुने वैर, भांडणे विसरून जवळ येतो.
आज २१ व्या शतकात "गोड बोला" म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीला प्रिय किंवा चांगलं बोला कदाचित एवढाच अर्थ घेतला जातो. पण वाणी विषयी सांगताना संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज त्यांच्या ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात हे पाहिल्यावर "गोड बोला" चा खरोखर अर्थ उलगडतो.
*तैसे साच आणि मवाळ । मीतले आणि रसाळ ।
शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ।।* । अ.१३. ओ. २७०।
*विरोधु वादबळू । प्रणितापढाळू । उपाहास छळु । वर्मस्पर्शु ।।* । अ.१३. ओ. २७१।
*आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणू । हे संन्यासिले अवगुणु । जिया वाचा ।।* । अ.१३. ओ. २७२।
अर्थात, अमृताच्या लाटांप्रमाणे त्याच्या बोलण्यातील शब्द सत्य, मृदू, मर्यादित, सरळ असतात. 'विरोध, भांडणाला उत्तेजन देणारे, कोणत्याही प्राण्याला मानसिक दुःख होईल असे उग्र तेजाचे, थट्टा, फजिती, निर्भत्सना, निंदा करणारे, सतावून सोडणारे, हृदयाला झोंबणारे, दुराग्रह असलेले, उच्चारधर्म गळून जातील इतके वेगाचे, कपट व कृत्रिमपणा असलेले, खोट्या आश्वासनाने आशा उत्पन्न करणारे, शंका निर्माण करणारे, फसवणूक करणारे' असे जे बोलणे असते ते अवगुण युक्त असते.
हे बारा अवगुण ज्याच्या वाणीने टाकले त्या वाणीला माऊली दोषहीन अशी श्रेष्ठ वाणी म्हणतात.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित असे वाणीचे महत्व अधोरेखित करणारा आजचा दिवस नक्कीच असायला हवा. माऊलींना अपेक्षित गोड बोलणे हे तिळगुळाच्या निमित्ताने आपल्या आप्तांपर्यंत पोहोचवणे व या ओव्यांप्रमाणे कायम गोड बोलण्याचा प्रयत्न करीत राहणे ही आपली जबाबदारी नाही का ? आज च्या या मंगल दिनी या नव्या संकल्पाने आपण हा सण साजरा करूया..!!
*"आपणा सर्वांना व आपल्या परिवारास मकर संक्रांतनिमित्त अनेक अनेक शुभेच्छा"*