19/12/2023
"उत्तर अनलॉक करा"
"स्वतः हून अभ्यासाला बसायचं नाही.आम्ही अभ्यास कर-अभ्यास कर म्हणून मागं लागलेलं आवडत नाही.आपलं महत्त्वाचं वर्ष आहे,आपणच रोजच्या रोज लिखाण वाचन पाठांतर केलं पाहिजे,असं हिला वाटतच नाही.जिवाला शिस्त म्हणून नाही.आजतागायत चहाचा कप उचललेला नाही की,जेवणाची पानं घेतलेली नाहीत.मी आधीपासून ह्यांच्या कानीकपाळी ओरडत होते,पण माझं कोण ऐकतंय?आईला कुठं अक्कल असते का?" समोरची मायमाऊली तावातावानं अन् खरं सांगायचं तर,हतबल होऊन रडत रडत बोलत होती. मी शांतपणे ऐकत होतो आणि पुन्हा पुन्हा माझ्या दहावीच्या दिवसांच्या फायली उघडू पाहणाऱ्या माझ्या आठवणींना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो.
" त्या इंस्टाग्राम नं तर सगळं बरबाद करुन ठेवलं आहे. मुली त्या इंस्टाग्राम मध्ये नांदायला गेल्यासारख्याच असतात. एवढं काय असतं हो त्या इंस्टाग्राम मध्ये? सगळ्या जगाची माहिती असते म्हणे त्यात.पण दहावीच्या मुलांनी आता बाकी सगळे वेळ वाया घालवणारे उद्योग बाजूला ठेवून अभ्यास करावा,असं ते इंस्टाग्राम सांगत नाही का? ऑनलाईन ऑनलाईन च्या नावाखाली मोबाईल फोन मुलांच्या हातात द्यायला लावला, कोविड संपला तरी त्याचे परिणाम भोगतोय आम्ही.."
पु लं च्या 'असा मी असामी' मधली चंद्रिका सुरु झाल्याची जाणीव मला झाली. आता टाळ्या तरी पडल्या पाहिजेत किंवा पडदा तरी पडला पाहिजे, त्याशिवाय ही चंद्रिकेची गिरणी थांबणार नाही,असं वाटायला लागलं. समोर ती दहावीतली मुलगी निमूटपणे बसली होती. आईचा आवाज तर असा काही तापला होता की,त्याला थर्मामीटर लावला असता तर पाऱ्याचा फुगा फुटून त्याच्या ठिकऱ्या उडाल्या असत्या.
"पण आत्ता इतकं तापण्यासारखं काही घडलंय का?" मी चक्रव्यूहात शिरण्याचा प्रयत्न करत होतो. आता जे सुरु होईल, तो तोफखाना डेंजर असणार, याची जाणीव असूनसुध्दा..
" सर, दहावी बारावीच्या मुलामुलींचा ना, अभ्यासक्रम सरकारला बदलायला सांगा. आरसा, फेसबुक, इंस्टाग्राम असे पेपर ठेवायला सांगा. रिल्स कसे करावेत आणि आई वडिलांना मूर्खात कसं काढावं, ह्याची प्रॅक्टिकल्स ठेवा. मी तुम्हाला पक्कं सांगते,आमची मुलगी राज्यात पहिली येईल." आईचा नुसता संताप संताप होत होता.
"पण आत्ता नेमकं काय झालंय?" मी विचारलं.
"चार दिवसांपूर्वी सहामाही परीक्षेचा निकाल हातात आला. एकाही विषयात निम्म्यापेक्षा जास्त मार्क नाहीत. तीन विषयांमध्ये जेमतेम पास. शाळेतले शिक्षक म्हणतात, 'आता तिचं तिनं करायला हवं.' क्लासचे शिक्षक म्हणतात, 'पालकांनी मुलांना वेळ देणं गरजेचं आहे,आम्ही कुठं कुठं बघणार?' आता तुम्हीच काय करायचं ते सांगा सर.. इथं दहावी पास होण्याची लक्षणं दिसत नाहीयेत अन् हिनं आम्हाला अकरावीच्या क्लासचे पैसे भरायला लावलेत पन्नास हजार रुपये.." असं म्हणून आई रडायलाच लागली.
दरवर्षी दिवाळी झाली की,रोज असं किमान एक तरी कुटुंब माझ्यासमोर असतंच. आपलं नेमकं चुकतंय काय, हे पालकांना कळत नसतं आणि मी कसा वागल्यानं यात बदल होणार आहे, हे मुलांना समजत नसतं.समस्या तर समोर दिसत असते,पण नेमका मार्ग कसा काढायचा,हेच समजत नसतं. परिक्षेचा बाऊ करु नका असं कितीही म्हटलं तरी,दहावी बारावीच्या निकालांच्या नंतरची प्रवेश प्रक्रियेची परिस्थिती तशी नाही. "प्रवेश मिळवण्यासाठी लागणारं मेरिट" हा खरोखरच पालकांच्या मनातला फार चिंतेचा मुद्दा आहे. जून महिन्यात इतर मुलामुलींचे नव्वद टक्के, पंच्याण्णव टक्के मार्क मिळाल्याचे पेढे हातात घेताना,त्याच शाळेत त्याच वर्गात शिकणाऱ्या आपल्या मुलाला किंवा मुलीला टक्क्यांची पासष्ठी सुध्दा ओलांडता आलेली नाही, ह्याचं दुःख खोटं नसतं. आपण मुलांसाठी जे जे चांगलं करणं शक्य होतं, ते ते सगळं केलं, पण तरीही असं कसं झालं, याचंही नैराश्य येतंच.
बरं, मुलांना काहीही बोलायला किंवा सुचवायला गेलं की, "तुम्हाला यातलं काही कळत नाही ना,मग तुम्ही यात पडू नका. तुम्हाला नव्वद टक्के मार्क मिळवून दाखवल्याशी कारण." असं ऐकून घ्यावं लागतं. उलट उत्तरं ऐकून घेताना त्यांच्या गालांवर आपली पाचही बोटं उमटवावीत असं वाटत असतं. पण रोजच्या मिडीयातल्या मुलामुलींच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचून मनात त्याचीही धास्ती बसलेली असते. वेताच्या छडीनं फोडून काढणारे पालक आता जवळपास नामशेष होण्याच्या बेतात आहेत. पण मुलांच्या अभ्यासाचे आणि मेरिटचे प्रश्न खरोखरच बिकट होत चालले आहेत, हेही खरं आहे.
"आमच्यावेळी असं होतं अन् तुमच्यावेळी असं आहे" अशी तुलना करण्यानं काय साध्य होणार,ह्याचा विचार नको का करायला? आपण आपल्या मुलांचं संपूर्ण भवितव्य पुस्तकी शिक्षण व्यवस्था आणि मार्कलिस्ट वरचे टक्के यांच्यावर विसंबून असणाऱ्या मार्गातले झालेले आहोत, हे तर सत्यच आहे ना? उद्या एखाद्या वडापाव विकणाऱ्या तरुणाला महिन्याला पाच लाख रुपये मिळत असले तरीही आपल्या मुलांनी तो मार्ग निवडावा असं मनापासून वाटणारा पालक माझ्यात आहे का?
आपला मुलगा कोण व्हावा किंवा आपली मुलगी कोण व्हावी, याविषयीच्या पालकांच्या काही निश्चित आणि ठाम अपेक्षा असतात. "रोज चार तास नियमित अभ्यास करुन हा नापास झाला ना, तर तेही मान्य करीन मी. पण अभ्यासच न करता नापास व्हायचं हे मला पटणार नाही" असं म्हणणाऱ्या कित्येक पालकांना मी भेटतो. अभ्यास न करतासुध्दा आपला मुलगा पास होतोच कसा,याचं त्यांना विलक्षण आश्चर्य वाटत असतं. पण तो अभ्यास का करत नाही, याचा शोध घेतला पाहिजे,असं का कुणास ठाऊक,पण त्यांना वाटतच नाही..!
मुलांच्या अभ्यास न करण्याची खरी कारणं शोधली पाहिजेत. मुलं अभ्यास का करत नाहीत यावर काथ्याकूट करत बसण्यापेक्षा ती आनंदानं अभ्यास कशी करतील,यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत.
खरं तर,मुलांची विचारपूस करावी की त्यांची उलटतपासणी करावी, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण 'विचारपूस करावी' असंच देईल.पण प्रत्यक्षात होतं काय? अभ्यास न करणाऱ्या मुलांशी मोकळेपणानं चर्चा झालेलीच नसते, हे अनेक मुलांशी बोलताना समजतं.
# अभ्यासाचा एकूण आवाका किती आहे, हेच लक्षात न येणं.
# काळ काम वेग यांचं गणितच न समजणं.
# वेळापत्रकाचा पार बट्ट्याबोळ झालेला असणं.
# अभ्यासाचा प्रचंड कंटाळा असणं.
# अभ्यासाविषयी सतत चालढकल करत राहणं आणि अगदी ऐनवेळी मात्र पार भंबेरी उडणं.
# अभ्यासाला बसलं की, मनात वेगवेगळे विचार येणं. सारखं जागेवरुन उठावंसं वाटणं,फोन पहावासा वाटणं, भलत्याच गोष्टी आठवणं.
# सतत झोप येणं.
# कितीही उत्साहानं अभ्यास सुरु केला तरीही पुढच्या काही मिनिटांमध्येच अस्वस्थ वाटणं.
# लिखाणाचा भयंकर कंटाळा येणं.
अशा काही समस्या ढोबळमानानं अनेक मुलामुलींमध्ये आढळतात. पण त्यात मुलांच्या सवयींचा दोष जास्त असतो,असं दिसतं. त्यामुळं,मुलांच्या सवयी बदलल्या की,त्यांच्या अभ्यास करण्यात लक्षणीय सुधारणा दिसून येते.पण आता तर परिक्षा अगदी समोर उभ्या ठाकल्या आहेत.अशा वेळी काय करावं?
अभ्यास आणि परिक्षा यांचा जाच वाटू न देता शेवटच्या पन्नास दिवसांमध्ये प्रभावी अभ्यास आणि उत्तम परिक्षा देण्यासाठी मुलांना सहज सोपं पण प्रत्यक्ष कृतियुक्त प्रशिक्षण हवं. त्यातूनच,अभ्यास,परिक्षा आणि परिक्षेतलं यश यांचा एकत्र सकारात्मक मेळ घालणं मुलांना शक्य होईल. अभ्यास आणि परिक्षा ही कटकट वाटण्याची मानसिकता बदलली जाईल. मार्कलिस्ट महत्त्वाची आहे की नाही? तर निश्चित महत्त्वाची आहे. पण, डोक्याला बंदूक लावल्यासारखा धमक्या देऊन, सतत तोंडाचा पट्टा चालवून, मुलांचा उठसूठ पाणउतारा करुन, मारहाण करुन, उपाशी ठेवून, भरल्या ताटावर त्यांचा अपमान करुन परिस्थिती बदलणार आहे का? याचाही विचार व्हायला हवा ना..
आपल्या मुलांची बोर्डाच्या परीक्षांसाठीची तयारी सुरू असली तरीही ती अपेक्षेनुसार नाही आणि जितकी चांगली असायला हवी तितकी नाही. आपली मुलं प्रयत्न करत असली तरीही ते प्रयत्न परिणामकारक ठरत नाहीयत, असं पालक म्हणून आपल्या लक्षात आलंय का? हे जास्त महत्त्वाचं आहे. मुलं त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात इतकी व्यस्त झाली आहेत की, त्यांना स्वतःचा विकास खरोखरच होतोय की नाही याचाही विचार करायला वेळ नाही. परिक्षा तोंडावर आली तरीही, अतिप्रमाणात केवळ वह्या पूर्ण करत बसण्याच्या मागे लागलेली मुलंमुली पाहिली की,यांचा खरा अभ्यास होणार तरी कधी? याची काळजी वाटते.
गेल्या काही वर्षांपासून बोर्डाच्या परीक्षांचं मेरिट बदलायला लागलं आहे आणि हा खरोखरच काळजीचा विषय आहे. मार्कलिस्ट वर दिसणारी गुणवत्ता कितपत खरी किंवा खोटी यावर आत्ता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. पण उत्तम मार्कलिस्ट घडवणं महत्वाचं आहे,कारण त्याशिवाय पुढे चांगल्या कोर्सला प्रवेश कसा मिळणार? ही काळजी आहेच. थोडक्यात काय,नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळाले तरी त्याचा आनंद घेताच येत नाही. कारण, भविष्याविषयीची अत्यंत अनिश्चितता गेल्या काही वर्षांत वाढली आहे.
पालक म्हणून आपल्याला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण नुसती काळजी करून काहीच साध्य होणार नाही. त्यासाठी आता हाती असलेल्या काळाचा योग्य उपयोग करून घेतला तर फायदा होईल.
गेली १७ वर्षं आम्ही या समस्येवर काम करत आहोत. आणि असं लक्षात आलं की, मुलांना ताण देण्यात काहीच अर्थ नाही.
उलट -
१) त्यांना अभ्यासाची योग्य पद्धत शिकवणं गरजेचं आहे.
२) ती पद्धत त्यांच्या अंगवळणी पडणं आवश्यक आहे. आणि
3) त्याच पद्धतीनुसार त्यांचा दैनंदिन अभ्यास आणि सराव होणं आवश्यक आहे.
४) शाळा/ कॉलेज, घर, क्लास या चक्रातून बाहेर काढून त्यांचं नवं वेळापत्रक सेट करणं आवश्यक आहे.
5) शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांची "परीक्षा कौशल्ये" विकसित करण्याची गरज आहे.
6) केवळ एवढंच पुरेसं नाही. तर, यात कमालीचं सातत्य आणि शिस्त आणल्याशिवाय बदल होणार नाही.
मुलांना मदतीची नितांत गरज आहे, हे आपणच समजून घेण्याची वेळ आली आहे. निकाल लागल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती असते, पण त्याचा ताण आतापासूनच घेणं चुकीचं आहे. त्याहीपेक्षा अधिक आहे ते आताच मुलांना योग्य प्रकारे मदत करणं..
मुलांना सुद्धा आपलं काहीतरी कमी पडतंय हे जाणवतच असतं. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे मात्र त्यांना सुचत नसतं. नुसते धडे वाचून किंवा ऐकून शिकता येत नाही. त्यासाठी आणखीही काही गोष्टी कराव्या लागतात, हेच मुळात माहित नसतं. पालक म्हणून आपल्याला हे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि "परीक्षा कौशल्ये" हा विषय दुर्दैवानं कोणत्याही ट्युशन्स किंवा कोचिंग क्लासेस मध्ये फारसा महत्वाचा मानला जात नाही. केवळ भरपूर प्रश्नपत्रिका सोडवल्या की चांगला सराव होतो, हा मोठा गैरसमज आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे.
"साधना २०२३" हा निवासी कार्यक्रम त्यासाठीच आहे. गेली अनेक वर्षं आम्ही तो करतो आहोत. शहरापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात राहून, दिवसातून बारा तास अभ्यास करणं आणि अभ्यासाची योग्य तंत्रे शिकून घेणं हा "साधना" चा प्रमुख हेतू आहे.
दिनांक २७ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात हे निवासी अभ्यास शिबिर पुण्यात होणार आहे. शिबिर सशुल्क आहे. विद्यार्थ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था शिबिरातच आहे. चारही दिवस शिबिरात पूर्णवेळ राहायचं आहे.
चार दिवसांच्या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी दिवसभरात १५ तासांचे वेळापत्रक असेल. एकूण २३ सत्रे होणार असून, त्यापैकी एक विशेष सत्र पालकांसाठी असणार आहे. "मॅरेथॉन पद्धतीने अभ्यास आणि प्रशिक्षण" हेच या शिबिराचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
यंदा या शिबिराचे हे १८ वे वर्ष आहे. दरवर्षी केवळ २७ विद्यार्थ्यांसाठीच हे शिबिर होत असतं. त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. शिबिरात विद्यार्थ्यांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी असते. रोज ४ मोठी सेशन्स असतात आणि त्या बरोबरच व्यायाम,आहार,रिलॅक्सेशन अशी विविध सत्रे असतात.
तसेच,शिबिरातील सहभागी मुलामुलींच्या ३ मानसशास्त्रीय चाचण्या घेतल्या जातात. करिअरविषयक विविध संधी विषयीची सत्रे असतात. तसेच, शिबिरात सहभागी होणाऱ्या विदयार्थ्यांना पुढे परीक्षेपर्यंत व्यक्तिगत समुदेशनाची ५ ऑनलाईन सत्रे ५०% सवलत शुल्कात मिळतात.
एकूणच, "साधना" च्या माध्यमातून गेल्या सतरा वर्षांमध्ये योग्य विद्यार्थ्यांना, योग्य वेळी,योग्य मार्गदर्शन मिळत आलं आहे. आपल्यालाही "साधना" परिवाराचा भाग होता येईल. मात्र,अत्यंत मर्यादित विद्यार्थी संख्या असल्याने आपल्याला दिनांक २३ डिसेंबर,२०२३ पूर्वी नावनोंदणी करायला हवी.
इच्छुक पालकांनी 8769733771 या क्रमांकावर संपर्क साधावा.
©सौ.पूर्वा मयुरेश डंके
मानसतज्ज्ञ,संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.