27/01/2022
डॉक्टर, मला वारंवार पित्त होते, माझे पोट साफ होत नाही अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या मंडळीची चौकशी केल्यावर समजते ही मंडळी गेली अनेक वर्षे सकाळी उठल्या उठल्या 1 लीटर / 1 तांब्या पाणी पीत असतात. कोणीतरी सांगितलेले असते / कुठेतरी वाचलेले असते सकाळी उठल्या उठल्या पाणी प्या पहा पोट कसे साफ होते!
अहो आपले पोट म्हणजे काय गटार आहे कां वरून ओतले की खालून बाहेर येईल!!आजकाल नवीन फ्याड निघालं आहे लोकं दिवसांतून 3-4 लिटर पाणी पीतात आणि त्यासाठी पाणी पिण्याची आठवण करून देणारा स्मार्ट गजर स्मार्ट फोन मध्ये असतो!!
आयुर्वेद सांगतो - "ऋते शरदनिदाघाभ्याम् पिबेत् स्वस्थोSपि चाल्पश : |"
अर्थात शरद आणि ग्रीष्म ऋतू सोडून इतर ऋतू मध्ये स्वस्थ माणसाने देखील थोडेच पाणी प्यावे.
आपण जे खातो ते पचवायला जशी शक्ती लागते तशी पाणी पचवण्यासाठी शरीरातील शक्ती खर्च होते, आणि ती शक्ती म्हणजे आपला अग्नी - 'जाठराग्नी'. जसा प्रकृती मधला अग्नी तसाच शरीरातला हा जाठराग्नी! बाहेरच्या आगीवर पाणी ओतले की तो विझतो तसाच आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायले की जाठराग्नी विझतो, मंद होतो. अग्नी मंद झाला की अन्न पचत नाही, भूक लागत नाही आणि सर्व शरीर क्रिया बिघडतात.
पाणी पिण्याचे काही नियम सांगितले आहेत.
$ पाणी कोणी पिऊ नये?-
मंदाग्नी (अग्नी मंद असताना ), गुल्म, पांडु, उदर, अतिसार, अर्श, ग्रहणी, शोथ हे आजार असताना पाणी अजिबात पिऊ नये. तहान सहनच झाली नाही तर अत्यंत थोडे पाणी प्यावे.
$ गरम पाणी कधी प्यावे?-
गरम पाणी दिपन-पाचन करणारे, कंठाला हितकर, पचायला हलके, उष्ण, बस्ती शोधन करणारे, उचकी, पोटात गुबारा धरणे, ताप, खोकला, जुनाट सर्दी, दमा, अजीर्ण ह्या आजरांमध्ये उपयुक्त आहे.
$ तहान लागली असताना पाणी नक्की प्यायले पाहिजे. तहान लागली असताना पाणी प्यायले नाही तर शोष, अंगसाद, बाधीर्य, मोह, भ्रम हे आजार होतात.
$ पाणी किती आणि कधी प्यावे?-
ह्यासाठी व्यवहारात सोप्पा नियम आहे. जेव्हा तहान लागेल तेव्हा आणि जितकी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे.
- वैद्य गौरी जोशी परांजपे
संजीवनी आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय