08/04/2023
हे केले तर लागणार नाही उन्हाळी!
वातावरणातील उष्मा किंवा ज्याला आपण तापमान, उन्हाळा वाढला असे म्हणतो, त्यावेळी काही आजार हमखास डोकं वर काढतात. अर्थात ऋतूमानात होणाऱ्या बदलास स्वीकारण्यास शरीर लगेचच तयार नसते. त्यासोबतच शरीराला आवश्यक असणारे बदल करण्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळे हे आजार होत असतात. यात घोमोळे, कांजण्या, नाक फुटणे वगैरे, अतिसार आणि बहुतेक जणांची तक्रार असते तो म्हणजे उन्हाळी लागणे. मी नेहमीच सांगते त्याप्रमाणे सर्व आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी किंवा आजार बरा करण्यासाठीही योग्य, समतोल आहार घेणे आवश्यक आहे.
आज आपण उन्हाळी लागल्यावर काय करायचे हे पाहणार आहोत. उन्हाळा सुरु झाला की घामाचे प्रमाण व शरीरातील उष्णता अधिक होते. हळूहळू मूत्र प्रवृत्ती पिवळ्या रंगाची व लघवी करताना आग/दाह होतो. ओटीपोटात कळ येणे. मूत्रेंद्रियाची आग होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे यात दिसतात. कधी कधी रक्ताच्या रंगांची लघवी होणे. शरीरात ताप, कणकण देखील जाणवते. लघवीच्या चाचणी केल्यास इंन्फेक्शन, अॅसिडीक यूरीन किंवा पस सेल वाढलेले दिसतात.
उन्हाळी लागण्याची कारणे कोणती!
वातावरणातील उष्णता, पाणी कमी पिणे, उष्माघात, चहासारखी उष्णपेयाचे अतिसेवन, अग्निजवळ जास्त काळ उभे राहणे. उन्हात जास्त वेळ काम करणे, तंबाखू , धूम्रपान, मद्यपान करणे. आहारात तिखट मसालेदार पदार्थाचे सतत सेवन, अति क्रोध, रात्री जागरण, जीन्स कृत्रिम धागेयुक्त कपडे सतत व जास्त वेळ घालणे. अशा कारणांमुळे उन्हाळी लागते. लहान मुलांमध्येही अनेकदा हा त्रास जाणवतो.
उन्हाळी लागण्याचा त्रास टाळण्यासाठी
१. पहिल्यांदा शरीराचे तापमान कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उन्हाळ्याच्या दिवसांत १० ते १५ ग्लास पाणी प्यावे. शक्यतो माठातील पाणी प्यावे. त्यामध्ये तुळस, पुदिना, मोगरा हे टाकल्यास ते थंडावा देते.
२. पाण्यासोबत पाणीदार फळांचे सेवन करावे. यामध्ये द्राक्षे, कलिंगड, टरबूज, काकडी, संत्री, मोसंबी, डाळिंब इत्यादी घ्यावे. मधुमेहीनी द्राक्षे, कलिंगड टाळावीत
३. सरबते, लिंबू, कोकम, आवळा, कैरीचे पन्हे, उसाचा रस, नारळपाणी यामधील अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत करतात. तसेच मूतखडा, लघवीचा त्रास कमी होतो. थकवा, डोकेदुखी कमी होते. मधुमेहीनी हे कमी गोड घ्यावीत
४. या दिवसांत भूक मंदावते. ॲसिडीटी, उलट्या, मळमळ होणे हा त्रास होतो. त्यामुळे पचायला हलका, साधा सकस आहार घ्यावा.
5. कांद्याचे सेवन करावे. कांदा तापमान कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्याकडे या दिवसात पांढरे कांदे मिळतात ते खाल्ल्यानेही बराच फायदा होतो .
हे टाळावे
१. तेलकट पदार्थ, तळलेले, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, नॉनव्हेज, हॉटेलचे चमचमीत पदार्थ टाळावेत.
२. आईस्क्रीम, कोल्डक्रिम, कोल्डड्रिंक्स, चहा, कॉफी, अल्कोहोल टाळावे.
३. रस्त्यावर विकली जाणारी थंड पेयं, बर्फ शक्यतो टाळावा. याऐवजी घरी बनविलेले ताजे अन्न घ्यावे.
उन्हाळीचा त्रास जास्त होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार करावा. तसेच वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. आपला आहार पाणी पिण्याचे प्रमाण हे ऋतूमानानुसार बदलायला हवे, हे पक्के लक्षात ठेवा.