25/12/2025
गर्भाशयाच्या मुखाचा (cervix)कॅन्सर आणि त्यावर प्रभावी लस(HPV vaccination)
"डॉक्टर तुम्ही माझ्या गर्भाशयाच्या तोंडावर जखम आहे असं सांगितलं होतं गेल्यावर्षी..एक तपासणी पण सांगितली होती पण मला यायलाच झालं नाही परत तपासणी साठी..आता परत खूप त्रास होतोय..भीती वाटतेय.."
ही पेशंट खरंतर प्रातिनिधिक आहे.अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना स्त्रीरोगतज्ञ गर्भपिशवीच्या तोंडाचा म्हणजे सर्विक्स(cervical cancer) चा कॅन्सर नाहीये ना हे बघण्यासाठीची तपासणी करून घ्या म्हणून वारंवार सांगतात आणि स्त्रिया वर्षानुवर्षे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
खरंतर ही तपासणी स्त्रीचे लैंगिक जीवन सुरू झाल्यापासून दरवर्षी करणं गरजेचं आहे.पाश्चात्य देशांमध्ये जवळजवळ प्रत्येक स्त्रीची ती केलीच जाते.आपल्या देशात गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त आहे तरीही भारतीय स्त्रिया ही तपासणी करून घ्यायला टाळाटाळ करतात.
एकदा डिलिव्हरी झाली की शक्यतो स्त्रीरोगतज्ञांकडे फिरकायचेच नाही अशी वृत्ती बहुतेक महिलांमध्ये दिसून येते.
आता गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर का होतो आणि त्याचे लौकर निदान कसे करता येते ते पाहूया.
गर्भाशयाच्या मुखापाशी गर्भाशयाच्या आतल्या आणि बाहेरच्या अशा दोन प्रकारच्या पेशींचा संगम होतो.त्याला transition झोन असं म्हणतात.या भागात जखमेसारखे वण तयार होतात.योनीमार्गात सगळ्या प्रकारचे जीवजंतू असल्यामुळे हे वणांमध्ये जंतुसंसर्ग लगेच होतो.आणि मग पेशंट ला खाज,जळजळ,आग,पांढरे जाणे असे त्रास सुरू होतात.यासाठी योनीमार्गात सरकवण्याच्या गोळ्यांचा कोर्स दिला जातो तो व्यवस्थित पूर्ण करणे अतिशय गरजेचे असते अथवा हा जंतुसंसर्ग परत परत होत राहतो.
कधी कधी योनीमार्गाचे जंतुसंसर्ग वारंवार होऊ लागतात तेव्हा पेशंट आणि तिचा नवरा या दोघांनाही औषधे दिली जातात कारण हा जंतुसंसर्ग लैगिक संबंधांमधून पसरू शकतो.बऱ्याच वेळा पुरुषांना काही त्रास होत नाही पण ते जंतुसंसर्गाचे कॅरीयर असतात त्यामुळे त्यांना औषधे दिल्याशिवाय त्यांच्या बायकांना बरं वाटत नाही.काही पुरुष अशावेळी औषधे घ्यायला तयार नसतात ,त्यांना खूप समजावून सांगावे लागते.
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा..गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा योनीमार्गात असलेल्या ह्यूमन पापीलोमा वायरस (human papilloma virus)या विषाणू मुळे होतो.ह्या विषाणू ची लागण गर्भपिशवीच्या मुखाला आहे की नाही हे बघण्यासाठी आणि या भागातल्या पेशींची कॅन्सर तपासणी करण्यासाठी HPV +LBC ही तपासणी उपलब्ध आहे.ही तपासणी एकदा केली असता आणि निगेटिव्ह आली तर पाच वर्षापर्यंत पुन्हा करावी लागत नाही.HPV या विषाणूची लागण स्त्रियांमध्ये लैगिक संबंध सुरू झाल्यावरच होऊ शकते.त्यामुळे परदेशात लैगिक संबंध सुरू झाल्यावर pap smear ही तपासणी अतिशय नियमित केली जाते.HPV +LBC ही तपासणी याच प्रकारची पण जास्त अचूक आहे .
कमी वयात लग्न,लगेच मुलं,कमी अंतराने झालेली अनेक बाळंतपणं या सगळ्या गोष्टींमुळे गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सर चे प्रमाण वाढते.या स्त्रियांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आरोग्याबद्दल असलेली अनास्था आणि बेफिकिरी ही सुद्धा हा कॅन्सर वेळेवर निदान न होण्यास कारणीभूत आहे.यासाठी सरकारी दवाखान्यात येणाऱ्या स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
बऱ्याच स्त्रिया खूप वर्षं पिशवीच्या तोंडावर असलेल्या (cervical erosions) जखमांसाठी स्त्रीरोगतज्ञांकडे येत राहतात पण तपासणी सांगितली की टाळाटाळ करतात.ही तपासणी वेळेवर केली तर पुढचा खूप मनस्ताप वाचू शकतो.
जास्त प्रमाणात पांढरे जाणे,लैगिक संबंधांनंतर लालसर जाणे,दोन पाळ्यांच्यामध्ये लाल स्त्राव दिसणे हे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात.पाळी थांबल्यानंतरही दरवर्षी किमान एकदा स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घेणे अनिवार्य आहे आणि ही तपासणी वेळप्रसंगी तुमचा जीव वाचवू शकते .पाळी एकदा थांबली की स्त्रिया स्त्रीरोगतज्ञांकडे पूर्णपणे पाठ फिरवतात . गर्भाशय,त्याचे मुख,ओव्हरी या अवयवांच्या कॅन्सरचे वेळेवर निदान होण्यासाठी नियमित तपासणी आणि सोनोग्राफी अत्यावश्यक आहे.
काही वेळा HPV +LBC ही तपासणी नॉर्मल असते पण तिथल्या जखमेला वरवर जंतुसंसर्ग होऊन स्त्रीला त्रास होत राहतो.अशावेळी ही जखम भूल देऊन जाळून टाकली जाते(cervical cryo or thermal cautery) या उपचारपद्धती नंतर बऱ्याच स्त्रियांचा त्रास कायमस्वरूपी कमी होतो.
HPV +LBC ही तपासणी पोझीटीव्ह आली याचा अर्थ कॅन्सर आहे असा नसून,गर्भाशयमुखाकडे जास्त बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे असा होतो.मग त्या भागाची बायोप्सी घेऊन आणि वारंवार तपासणी करून लक्ष ठेवले जाते.
भारतात स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (cervical cancer) कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त आहे.सुदैवाने हा कॅन्सर रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात लस (vaccine) विकसित झाली आहे आणि ती सर्वत्र उपलब्ध आहे.कॅन्सर रोखण्यासाठी लस कशी काम करते याबद्दल खूप जणांच्या मनात शंका असू शकते.त्याचे उत्तर असे की लैंगिक संबंध आल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाला HPV नावाच्या व्हायरस चा संसर्ग होऊ शकतो.हा संसर्ग बरीच वर्षे टिकून राहिला तर त्याचे कॅन्सर मध्ये रुपांतर होऊ शकते.त्यामुळे HPV vaccine म्हणजे लस ह्या संसर्गापासून स्त्रीचे रक्षण करते.साहजिकच कोणताही लैंगिक संबंध येण्याआधी ही लस दिल्यास ती सर्वात जास्त प्रभावी ठरते.त्यामुळे मुली वयात आल्यावर सोळा ते अठरा वर्षे वयाआधी ही लस देण्यात यावी.पंधरा वर्षे वयाआधी ही लस दिल्यास दोन डोस द्यावे लागतात आणि त्यानंतर तीन डोस द्यावे लागतात.0,1,4 महिने असे या लशीचे वेळापत्रक असते.
ही लस सध्या भारतात आयात केली जाते ,त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे.त्यामुळे ज्या मागास सामाजिक व आर्थिक समाजात या लशीची खूप आवश्यकता आहे त्या वर्गाला ती परवडू शकत नाही पण आता बाजारात स्वदेशी बनावटीची लस(cervavax) सिरम इन्स्टिट्यूट तर्फे आली आहे.त्यामुळे ही लस कमी किमतीला उपलब्ध आहे .सर्व मुलींच्या पालकांनी याचा लाभ घेऊन आपापल्या मुलींना ही लस जरूर द्यायला हवी.
ह्या लशीचा फायदा पुरुषांमध्ये सुद्धा आहे. त्यांना तोंडांचे,घशाचे काही कॅन्सर,लैंगिक अवयव, गुदद्वार इथले कॅन्सर यापासून या लशीमुळे संरक्षण मिळू शकते. त्यामुळे काही देशांमध्ये वयात आलेल्या मुलांनाही ही लस द्यायला सुरुवात केली आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीचे लसीकरण झाले असले तरीही नियमित तपासणी अत्यावश्यक आहेच.आणि दुसरे म्हणजे लग्न झालेल्या अथवा लैंगिक संबंध आधीच आलेल्या स्त्रियाही HPV vaccine घेऊ शकतात पण त्याचा पूर्ण फायदा त्यांना मिळू शकत नाही आणि नियमित तपासणी महत्त्वाची ठरते.
तर मैत्रीणींनो अश्या अगदी साध्या तपासण्या आणि वेळेवर लसीकरण केले तर खूप मोठे आजार तुम्ही टाळू शकाल.तुमच्या मुली क,बहिणी,आया ,सासवा यांच्याशी या विषयावर जरूर बोला.
जीवलगांशी असं हितगुज जास्त महत्त्वाचं..हो ना?
डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ञ
कोथरूड
पुणे