19/03/2025
" सप्तपदी- तप्तपदी"
"REAL LIFE HERO"
कल्पेश ला (नाव बदलले आहे) समुपदेशनाला यायचे म्हणून त्यांनी दुपारची वेळ घेतली होती .त्याला समुपदेशनाला यायची घाई झाली होती.
कल्पेश हा आंध्र मधून अतिशय गरीब घरातून आलेला तरुण. त्याचं शालेय शिक्षण नवोदय विद्यालय मध्ये राहून झालं. आई-वडिलांची शेतात एक लहान झोपडी आहे, त्यात ते, व कल्पेश चे दोन भाऊ व एक लहान बहिण राहायचे .जरा मोठे झाल्यावर तीनही भावांची रवानगी शिक्षणाकरता नवोदय विद्यालयात झाली. बहीण तिथल्या सरकारी शाळेत शिकली.
नवोदय विद्यालय मध्ये त्यांचे वसतीगृह असतं व राहण्याची व खाण्या-पिण्याची योग्य सोय असते. त्यामुळे मुलांना शिक्षण आणि खाणे- पिणे मिळते, म्हणून पालक पण खुश असतात .
त्या विद्यालयात मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देतात. तिथल्या विद्यार्थ्यांना नियमितपणे खेळणे, व्यायाम करणे हे अनिवार्य होते.
कल्पेश शाळेच्या फुटबॉल आणि बास्केटबॉल च्या चमू मध्ये होता. त्यांच्या इंटर- नवोदय विद्यालय स्पर्धा होत. कल्पेश ची नेहमी शाळेच्या चमू मध्ये निवड व्हायची. एखाद्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा व्हायची. त्यांचे सर टीम्स घेऊन जायचे, असंच एकदा स्पर्धेला गेले असताना सरांनी त्याला बोलावले आणि child s*x abuse घडले ,पण आपण कुणाला सांगितलं तर शिक्षण सोडावं लागेल ,म्हणून कल्पेशने gay रिलेशनशिप सहन केली. आणि सहन करत राहिला. साधारण आठवीत असताना सुरू झालेलं हे प्रकरण बारावीपर्यंत अधून मधून सुरू होतं .सरांबरोबरच इतरही त्यांच्या एक -दोन मित्रांबरोबरही सुरू होतं. त्याला अतिशय मानसिक त्रास होत होता तरीही त्यानी या प्रकरणाचा स्वतःचा अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही.
बारावीनंतर तो आंध्र प्रदेश मधूनच आयटी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नोकरीकरता पुण्यात आला. नोकरी लागून तीन- चार वर्षे झाली ,आई -वडील लग्नाकरता खूप मागे लागले आहेत आणि त्याला असं वाटतं की मी लग्न करू का? आणि केलं तर बायकोला नाही फसवू शकत .
कसं काय लग्न करावं त्यामुळे तो समुपदेशनाला आला.
त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्या जोगा होता. त्याला त्यातून निघायचं होतं पण त्याची gay रिलेशनशिप ही गरज बनली होती आणि आताही ते सगळं सुरू होतं.
समुपदेशनामध्ये त्याला gay रिलेशनशिप बद्दल काय वाटतं ?खरंच आवडतं की सवयीचा गुलाम म्हणून सुरू आहे? त्याला मुलींच अट्रॅक्शन वाटतं की नाही ?हा मुख्य मुद्दा आहे .. यावर भरपूर वेळा बोलणं झालं.
झालेल्या सर्व प्रकरणाचा मानसिक त्रास त्याला होतच होता .तो कमी करायला REBT ची मदत घेतली. त्याने आठवीपासून सुरू झालेला कोंडमारा सेल्फ टॉक मध्ये लिहून काढला .आपण किती त्रास सहन केला आहे सगळं सांगताना तो अनेकदा गहिवरला आणि रडला.
आईला काय आणि कसं समजायचं हा प्रश्न मोठा होता, कारण ती एक शेतमजूर स्त्री होती आणि आता त्या झोपडीतून जरा बऱ्या घरात राहायला आली होती .सगळीच मुलं मार्गी लागली होती ,म्हणून खुश होती .स्थिर होती. त्यामुळे कल्पेश च्या मागे लग्नाचा तिचा ससेमीरा सुरू होता.
इतके वर्ष झालेल्या त्रासातून निघण्याकरता आरबीटीच्या मार्गाने समुपदेशन केले .त्याने नियमितपणे self talk लिहिला आणि जे झाले त्यातून बाहेर निघायला तो शिकला.
त्यानंतर तो खरच gay आहे का ? की gay पण त्याच्यावर जबरदस्ती केल्यामुळे स्वीकारलेल आहे ,यावर त्याला लिहायला सांगितलं. जवळपास एक ते दीड वर्षा तो स्वतःला शोधत होता. मनातलं खूप सारे लिहत होता. वाचत होता. gay रिलेशनशिप पासून दूर रहायला हळूहळू शिकू लागला. मानसिक आणि भावनिक दृष्टीने स्वतःला सावरलं . त्याने आईला दोन-तीन वर्षाचा वेळ मागितला आणि मागे नको लागू म्हणून समजावलं. त्याला सांगितलं की तू आता psychiatrist चे sessions घे आणि त्यातील मुद्दे पण समजावून घे.
हे सगळं नियमितपणे करून हळूहळू कल्पेश gay रिलेशनशिप मधून बाहेर पडायला लागला आणि मग बाहेर पडला तरीही त्याने लग्नाचा निर्णय घ्यायला अजून एक दीड वर्ष घेतलं .
एका गरीब आणि अनाथ मुलीला सगळं सांगून त्याने तिच्याशी लग्न केलं. मी ह्यात पुन्हा पडणार नाही हे तिला वचन दिलं. त्याच्या लग्नाला आता दोन वर्षे झालीत . हे एक प्रामाणिकपणा ,स्वत: बदलण्याची आणि परिस्थितीतून बाहेर निघण्याची तयारी ,त्याकरता चिकाटीचे केलेले सतत प्रयत्न आणि स्वतःचे मन समजून घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन, समुपदेशनामध्ये पूर्ण सहकार्य करून स्वतःचे आयुष्य नीट घडवल्याचे एक अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. खरंच कल्पेश च कौतुक वाटतं.
हे कौतुक खूप ठळकपणे वाटतं कारण अतिशय चांगल्या घरातले मुलं इतक्या चिकाटीने समुपदेशन पूर्ण करत नाहीत.
अपर्णा ठकार
मानसशास्त्रीय समुपदेशक.
पाषाण, पुणे.