30/10/2024
पुण्यात आता थोडी थंडी पडायला लागली असली तरी कडक थंडी नाही, उलट सध्या माझ्याकडे तरी सर्दी खोकला ताप पेशंट वाढले आहेत. यात विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यायला हवी. त्यामुळेच दिवाळीच्या आधी आरोग्य सांभाळायला उपयोगी कदाचित थोडी बझ किल करणारी मागच्याच वर्षीची पोस्ट परत एकदा..😛
१. दिवाळीला अपेक्षित थंडी सध्या परत गायब झाल्याने भूक लागली नसता नाश्ता टाळावा. गेट टुगेदर साठी एका मागे एक सारखे खाणे होणार नाही पण भेटायला वेळ मिळेल अशा स्वरूपाचा ब्रंचचा पर्याय चांगला राहतो.
२. फराळाचे अगदी चार पदार्थ का असेना चांगल्या कच्च्या मालापासून बनवलेले असावे. विकतचे असतील तर ताजे आणि चांगल्या विश्वासू ठिकाणी बनवलेले घ्यावेत. घरी करताना तेल filtered आणि तूप वापरावे.
३. दिवाळीचे चार दिवस कितीही नाही म्हटले तरी तेलकट तळकट खाणे होतेच. सलग एका मागे एक थोड्या थोड्या वेळाने खाऊ नये(चरत राहू नये). खाण्याच्या वेळांना जे असेल ते खावे.
४. सणासुदीला थोडे इकडचे तिकडचे खाणे हे साहजिक असते. परंतु ब्रेड(पाव भाजी/मिसळ) मिरची, तिखट असे पदार्थ सलग सलग होऊ नयेत यासाठी थोडी काळजी घ्यावी. हिरवी मिरची शक्य तितकी टाळावी. पोटाचे बरेचसे त्रास याने टळतात. दुपारच्या जेवणात तरी ताकाचा समावेश असावा.
५. बेसन लाडूचा त्रास ज्यांना होतो त्यांना पौष्टिक लाडू,
खजूर लाडू, रवा नारळ लाडू हे पर्याय आहेत.
६. सर्दी खोकला असताना एकमेकांकडे जाणे टाळावे, फटाक्यांच्या धूरापासून संरक्षण करावे. मास्कचा वापर करता येईल. बाहेर खायला जायची वेळ असल्यास डासांपासून संरक्षण करावे.
७. तेल आणि उटणे याचा वापर दिवाळीमध्ये सुरू करून कायमच हा दिनक्रमाचा भाग म्हणून सुरू ठेवावा.
८. "हे एवढं तरी झालंच पाहिजे " हा अट्टाहास ठेवून गृहिणी/घर सांभाळणाऱ्या व्यक्तीने सर्वच्या सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊ नये. दिवाळी हा सण आनंदाचा आहे, त्यात थकून भागून चिडचिड/त्रागा करत घरातली कामे केली तर कोणालाच त्यातून आनंद मिळत नाही. स्वतःचे वय, नोकरी व्यवसायाच्या कामातून मिळणार वेळ, आणि आपण केलेल्या गोष्टींमुळे आपल्याला मिळणारा आनंद याचा समतोल सांभाळून दिवाळी साजरी करावी.
शुभ दीपावली!
©वैद्य स्वराली शेंड्ये
यशप्रभा आयुर्वेद