18/08/2025
असंख्य सापांनी शरीरभर तांडव करावा, अनेक ढोल पाथकांनी एकत्र, एकाच वेळी डोक्यात practice करावी आणि इतका कल्लोळ आपल्याच शरीरात [मनात (डोक्यात)] चालू असताना आपण मात्र अवजड साखळदंडात जखडलेले असतो. आतल्या आत आपलाच होणारा अंत पाहत. हताश, निराश, दिशाहीन.. आता कुणावरही विश्वास उरलेला नसतो, कुणी आपलं नाहीच हे नक्की होत जातं आणि मग यातून जर बाहेर पडायचं असेल तर स्वतःला उभं करण्याशिवाय पर्याय नाही. एवढी एकच काय ती आशा... उरली असेल तर..
मग प्रश्न पडतो, कशाचा अंत होतोय.. काय संपत असतं अशावेळी? का इतकं खोलवर रुतायला लागलंय आता सगळंच. इथे संपत असते ती इतकी वर्षे निरर्थक जपलेली, कुजलेली आणि त्रासदायक आपलीच "विचार यंत्रणा". ज्यातून फक्त क्लेश वाट्याला आलेला असतो स्वतःच्या आणि इतरांच्याही. कितीही नाही म्हटलं तरी आपलं कोण आणि सोयीने आपल्याबरोबर कोण याचा होतोच न्यायनिवाडा. पण आता बदल आपल्यात गरजेचा आहे इतरांमध्ये नाही ही समज खूप महत्वाची ठरते.
ही खरंतर आपली कात टाकण्याची वेळ. जुन्या निरूपयोगी आणि घातक सवयींना, विचारांना मोडून काढण्याची संधी. आपल्या चुका सुधारण्याची इतरांच्या सोडून देण्याची, आपल्या क्षमता आजमावण्याची वेळ. कशात अडकून राहायचं आणि कशातून स्वतःला मोकळं करायचं याची मापदंड ठरवण्याचा काळ. चुकलेले निर्णय, माणसांची निवड, आता सगळं समजायला लागेल. भावनेच्या आहारी जाऊन नाही तर विचारपूर्वक घेतले जातील निर्णय. या transition कडे पाहण्याचे काही पर्याय असतात एकतर याच परिस्थितीत गटांगळ्या खात बसणं, स्वतः थांबणं किंवा योग्य ती मदत घेऊन त्यातून बाहेर पाडण्याचे मार्ग शोधणं..
अशावेळी दोनच गोष्टींवरचा विश्वास मदत करतो एक म्हणजे मदत मिळू शकते आणि मला स्वतःवर काम करायचं आहे. ज्याक्षणी या पर्यायाला आपण निवडतो आपलं निम्मं काम झालेलं असतं. यापुढचा सगळाच प्रवास आता आपण ठरवणार असतो. भावनांना समजून घेऊन आणि डोळसपणे विचार करून. प्रश्न पुढेही पडत राहतील पण आता त्याकडे पाहण्याचा नवा, सुदृढ असा आपला स्वतःचा दृष्टिकोन असणारे मदतीला.
आणि मग कदाचित सुधीर फडके यांचं "फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश.. दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश.." हे गाणं नव्याने ऐकू येईल.
PC: Gayatri Vaidya