06/01/2025
# Classapartindia
SC14082024
Metapnemovirus
भारतात केस एवढ्या लवकर सापडली कशी?
#साथ_समजून_घेताना
कोणत्याही देशामध्ये एखाद्या आजाराबद्दल जेव्हा अलर्ट जाहीर होते (चीनने अजूनही अधिकृतरित्या अलर्ट दिलेले नाही कारण परिस्थिती नेहमीसारखीच जशी थंडीमध्ये अपेक्षित असते तशी असावी), त्यावेळी अपेक्षित असते की जगभरातील इतर देशांनी देखील त्या आजाराबाबत तपासण्या वाढवाव्यात जेणेकरून योग्य परिस्थिती काय आहे हे समजून येईल.
जसे एम पॉक्स बाबत जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जाहीर केले त्यानंतर जगभरातील देशांमध्ये या आजाराच्या तपासण्या वाढल्या आणि विविध देशांमध्ये अचानक रुग्ण सापडू लागले. तत्पूर्वी या आजाराच्या तपासण्या नियमितपणे होत नव्हत्या. मात्र रुग्ण आधीच बाधित झाले होते. तपासण्या वाढल्या की रुग्णही एकदम वाढू लागले.
HMPV हा 50-60 वर्षे जुना विषाणू आहे. तसेच याबद्दलची माहिती 2001 पासून आपल्याला आहे . गेल्या 25 वर्षात याविषयी खूप सारे संशोधन झालेले आहे . ज्यामुळे या आजाराच्या गंभीरपणाबाबत आपल्याला कल्पना आहे.
लहान मुलांमध्ये श्वसन संस्थेचे आजार हे सहसा एखाद्या विषाणूमुळे झालेले असतात. त्या सर्वांची लक्षणे व उपचार हे सहसा एक सारखे असल्याने नक्की कोणत्या विषाणू मुळे मुलांना संसर्ग झालाय याविषयी तपासणी सहसा केली जात नाही. विषाणू कोणताही असला तरी उपाय हे सारखेच आहेत.
तरी फ्लू सारख्या आजारांबाबत बऱ्याचदा तपासणी होते कारण हे विषाणू जास्त प्रमाणात दिसून येतात आणि त्यांचे सर्वेक्षण सुरू असल्याने याबाबत रिपोर्टिंग देखील करावे लागते.
किंवा कधीकधी एकच वेळी दोन किंवा अधिक विषाणूंची बाधा आहे का हे तपासण्यासाठीही टेस्ट केल्या जातात कारण अश्या वेळी रुग्ण गंभीर होण्याची शक्यता खूप वाढते.
आता जेव्हा एका ट्विट नंतर सर्वत्र HMPV विषाणूची चर्चा सुरू आहे तर आता शक्यता आहे की काही रुग्णालये ही HMPV ची तपासणी स्वतःहून वाढवतील आणि जेव्हा एखादी तपासणी वाढवली जाते त्यावेळेला जे रुग्ण आधीच आहेत ते रुग्ण सापडायला सुरुवात होते आणि अचानक आपल्याला संख्या जास्त आहे असा भास होऊ शकतो.
जेव्हा आजार नवा असतो तेव्हा तो देशात येताना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांमध्येच आढळतो किंवा जे लोक प्रवाश्यांच्या संपर्कामध्ये आले त्यांच्यामध्ये आढळतो.
बेंगलोर मधील आठ महिन्याचे जे बाळ आहे ते बाळ कधीही प्रवासाला गेलेले नाही तसेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या संपर्कातही ते आलेले नाही.
म्हणजेच ही केस भारतातच निर्माण झालेली केस असू शकते.
जो आजार / जो विषाणू गेली 50-60 वर्षे जगभरामध्ये आहे तो सर्व देशांमध्ये रुग्ण निर्माण करतच असणार आहे म्हणूनच तर तो पन्नास-साठ वर्षे टिकला आहे. त्याची वेगळी तपासणी करण्याएवढा तो खास गंभीर नसल्याने त्याची रुग्णसंख्या आपल्याला माहित नसते.
आता तपासण्या वाढवल्यावर हे रुग्ण सापडतील आणि मग रुग्ण वाढताना दिसले म्हणून विनाकारण भीती वाढेल.
त्यामुळे ही रुग्णसंख्या रिपोर्ट करताना त्याबद्दल काळजी घ्यायला हवी. एखाद्या आजाराचे रुग्ण खरेच वाढतायेत का की आता अलर्टमुळे तपासणी केल्याने वाढताना दिसतात यातील फरक समजून घ्यायला हवा.
जोपर्यंत एखाद्या आजाराचे अलर्ट ऑफिशिअली जाहीर होत नाही तोपर्यंत त्याविषयी चिंता करू नका.
भारत सरकारने देखील हा आजार जुना असल्याने आणि सरकारकडून नियमित सर्वेक्षण सुरू असल्याने याविषयी चिंता करू नये अशा पद्धतीचे परिपत्रक जाहीर केलेले आहे.
फक्त आणि फक्त ऑफिशियल परिपत्रकांमध्ये जे सांगितले आहे त्याकडे लक्ष द्या.
केवळ चीनचे नाव आहे म्हणून घाबरून जाऊ नका. गेल्यावर्षी (२०२३) पण चीनमध्ये निमोनिया वाढला होता कारण थंडीमध्ये निमोनिया वाढतातच. (माझ्या २०२३ च्या जुन्या पोस्टची लिंक कमेंट मध्ये देते)
हातांची स्वच्छता, सर्दी खोकल्याने आजारी असताना मास्क वापरणे , आजारी असताना मुलांजवळ न जाणे, मुल आजारी असताना इतर मुलांसोबत खेळायला न पाठवणे हे असे साधे उपाय आपण करत राहिलो तर आपल्याला श्वसन संस्थेच्या कोणत्याही विषाणूपासून सुरक्षा मिळू शकते.
माहिती मिळवण्यासाठी खात्रीशीर स्त्रोत शोधून ठेवा आणि इतर ठिकाणच्या भीती वाढवणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा. जुन्या विषाणूमुळे महासाथ येण्याची शक्यता खूप खूप खूप कमी असते. HMPV जुना विषाणू आहे हे विसरायचे नाही.