22/01/2026
मंदीर, मशीद, गुरूद्वारामध्ये जाणार्यांना आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवावी लागतात. पण चर्चमध्ये मात्र ती घालून आत गेलेलं चालते. 🤔
कारण उष्ण कटिबंधातील भारत व आखाती देशांत पूर्वी सगळीकडेच धूळ, मातीचे साम्राज्य होते. यामुळे स्वच्छता हेतु पादत्राणे बाहेरच काढत. याउलट युरोपीय देश बर्फाळ प्रदेशात येत असल्याने तेथे पायात कायम पादत्राणे घालणे, तेथील कडाक्याच्या थंडीमुळे गरजेचे असते. अन् महत्वाचे म्हणजे मंदिरे किंवा मशिदीत जमिनीवर बसून प्रार्थना करण्याची पद्धत आहे, त्यामुळे जमीन स्वच्छ असणे, ही धार्मिक गरज बनली. याउलट युरोपात जमिनीवर बसणे थंडीमुळे अशक्य होते म्हणून तिथे चर्चमध्ये बाकड्यांवर बसण्याची संकल्पना आली. 👈
हिंदू धर्मीय मृतदेह जाळतात (मूळची वैदिक परंपरा), मुस्लिम जमीनीत थेट दफन करतात, ख्रिश्चन ताबूतसह दफन करतात. अन् पारशी गिधाड सारख्या पक्ष्यांना खाण्यासाठी तो उंचावर ठेवतात. कारण भारतात पुरातन काळात अफाट जंगल असल्याने लाकूड सहज उपलब्ध होत असल्याने मृतदेह जाळणे, व्यवहार्य होते.. आखाती देशात मात्र सगळीकडे फक्त भूसभूशीत रेतच (मरुस्थळ ) असल्याने, जमॊन सहजतेने खोदून खोलवर मृतदेह गाडणे, सोयिस्कर होते.. युरोपीय देशातील थंड हवामान व जमीनीत ओलावा जास्त असल्यामुळे मृतदेहाला फक्त जमीनीत गाडणे पुरेसे नव्हते. यास्तव ते हवाबंद ताबूतसह मृतदेह गाडत. ज्यामुळे मृतदेह सडण्याच्या किंवा कुजण्याच्या प्रक्रियेतून (Decomposition) जास्त दुर्गंध न येता, अनकूल गती मिळते. अन् पारशी धर्माची जन्मस्थळी असलेल्या इराणमध्ये खडकाळ, मरुस्थळी जमीन आणि जंगलांचा सार्वत्रिक अभाव त्यांना पुण्यकर्म (पक्ष्यांचे खाद्य) म्हणत मृतदेह उंच जागेवर (टॉवर ऑफ सायलेंस) ठेवण्यास विवश करायचा.👈
तसेच 'हलाल' आणि 'झटका' या दोन पद्धतींमागे धार्मिक श्रद्धा नसून, त्या काळातील भौगोलिक परिस्थिती, अन्नाची साठवणूक करण्याची क्षमता आणि प्राण्याला होणाऱ्या वेदनांचे शास्त्र दडलेले आहे. 😔
हलाल पद्धतीत मानेची मुख्य रक्तवाहिनी (Jugular vein) कापली जाते, ज्यामुळे हृदय धडधडत राहते आणि शरीरातील जास्तीत जास्त रक्त बाहेर वाहून जाते. उष्ण हवामानात रक्त हे जीवाणूंच्या (Bacteria) वाढीसाठी उत्तम माध्यम असते. जर मांसामध्ये रक्त राहिले, तर मांस लवकर सडते. त्यामुळे ते जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी रक्ताचा पूर्ण निचरा होणे, गरजेचे होते. ( हळूहळू रक्त बाहेर गेल्यामुळे स्नायूंमधील ग्लायकोजेनचे रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होते, ज्यामुळे मांस मऊ राहण्यास मदत होते.).🙂↔️
याउलट झटका पद्धतीत प्राण्याचा मणका किंवा मान एका घावात तोडली जाते. यामुळे मेंदूचा शरीराशी असलेला संपर्क तुटतो आणि प्राण्याला वेदना जाणवण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो.. संशोधनांनुसार, प्राण्याला ठार मारताना जास्त वेळ लागतो, तेव्हा त्याच्या शरीरात 'कोर्टिसोल' आणि 'ॲड्रवरिन' सारखी स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात, ज्याचा परिणाम मांसाच्या गुणवत्तेवर होतो.👈
याचप्रमाणे वेशभूषेचा संबंध 'स्टाईल' पेक्षा 'सर्वाइव्हल' (अस्तित्व टिकवणे) याच्याशी आहे.. आखाती देशांमध्ये पूर्ण अंग झाकणारे पांढरे झगे (थौब/कंदुरा) घालणे, उष्ण हवामानामुळे योग्य असते. कारण वाळवंटी प्रदेशात दोन मुख्य आव्हाने असतात: प्रचंड उष्णता आणि धुळीची वादळे.. विज्ञाननुसार पांढरा रंग सूर्यप्रकाश आणि उष्णता शोषून न घेता परावर्तित (Reflect) करतो. यामुळे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा कमी राहण्यास मदत होते. अन् सैलसर झगे घातल्याने, जेव्हा वाळवंटात हवा वाहते, तेव्हा या कपड्यांमधून ती शरीरापर्यंत सहज पोहोचते. ज्यामुळे घाम लवकर सुकतो आणि नैसर्गिक 'एअर कंडिशनिंग' चा अनुभव मिळतो. तसेच वाळवंटातील कोरडी हवा आणि थेट सूर्यकिरणांमुळे त्वचा जळू शकते (Sunburn). यास्तव वाळूच्या वादळापासून डोळे, नाक आणि त्वचा वाचवण्यासाठी डोक्यावर 'गुत्रा' (रुमाल) आणि पूर्ण झगा आवश्यक ठरतो.
याउलट युरोपमध्ये आव्हान उष्णतेचे नसून कडाक्याच्या थंडीचे आणि आर्द्रतेचे (Moisture) असते. यामुळे शरिराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी (Insulation) लोकरीचे कपडे घालणे योग्य असते. लोकरीचे तंतू शरीराची नैसर्गिक उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत. ते हवेला अडवून ठेवतात, ती उष्णता रोधक (Insulator) म्हणून काम करते. तसेच युरोपीय कपडे शरीराला चिकटून किंवा फिटिंगमध्ये असतात. याचे कारण असे की, शरीराच्या जवळ असलेली गरम हवा बाहेरच्या थंड हवेने विस्थापित होऊ नये. अन् कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी त्यांना एकावर एक कपडे घालावे लागतात.
आपल्या भारतातील 'साडी' किंवा 'धोतर' हे देखील आपल्या उष्ण आणि दमट हवामानासाठी डिझाइन केलेले 'Unstitched' (न शिवलेले) कपडे योग्य आहेत. जे हवा खेळती ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहेत, तरीही अक्कल गहाण ठेवून अंध नक्कल करत, अगदी देशातील न्यायालय व संसदेतील अति हुशार समजले जाणारे सुध्दा, बारा महिने कोट घालतात, जे ब्रिटिशांच्या थंड हवामानानुसार योग्य होते.
उत्तर भारतातील गंगा-यमुना आणि पंजाबचा प्रदेश हा जगातील सर्वात सुपीक मैदानी प्रदेशांपैकी एक असल्याने मुबलक पाणी आणि सुपीक मृदेमुळे इथे वर्षभर पिके घेणे शक्य होते. जेव्हा मानवाला शेतीतून पुरेशी कर्बोदके (Carbohydrates) आणि प्रथिने (डाळींमधून) मिळू लागली, तेव्हा शिकारीवर अवलंबून राहण्याची जोखीम कमी झाली. यामुळे मुख्यतः जैन आणि बौद्ध धर्माने 'अहिंसा' हे सर्वोच्च मूल्य मानून दैनंदिन जीवनात शाकाहाराला अति महत्व देत, मांसाहारावर मर्यादा आणल्या किंवा तो पूर्णपणे वर्ज्य केला. याउलट आखातातील वाळवंटी प्रदेशात शेतीसाठी मर्यादा होत्या. तिथे 'खजूर' आणि थोड्या प्रमाणात मिळणाऱ्या धान्याव्यतिरिक्त अन्नाचा मुख्य स्रोत 'पशुपालन' (शेळ्या, मेंढ्या, उंट) हाच होता. त्यात वाळवंटात फिरस्ती जीवन जगताना (Nomadic life) प्राणी सोबत बाळगणे आणि अन्नासाठी त्यांचा वापर करणे ही त्यांची भौगोलिक गरज होती. तसेच अत्यंत थंड हवामानात शरीराचे तापमान राखण्यासाठी उच्च उर्जा देणाऱ्या अन्नाची गरज असते, जी मांसाहार आणि चरबीयुक्त पदार्थातून मिळत असल्याने व बारामाही शेती होत नसल्याने मांसाहाराला इस्लाम प्रमाणे ख्रिस्ती धर्मात धार्मिक मान्यता मिळाली.😳
वाळवंटातील प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण (Dehydration) लवकर कमी होत असते. त्यात भर पडून मद्यप्राशनामुळे लघवीचे प्रमाण वाढून शरीर अधिक निर्जलित होते, जे अशा हवामानात जीवघेणे ठरू शकते. यामुळे अब्राहमिक धर्माचा भाग असतानाही म्हणजेच यहूदी व ख्रिस्ती धर्मीय मान्यतेच्या विरूध्द जाऊन इस्लाममध्ये मद्याला 'हराम' मानण्यामागे सामाजिक कारणांसोबतच हे नैसर्गिक आरोग्य विषयक कारण आहे. याउलट युरोपात थंडीच्या दिवसात नद्या आणि तलाव अनेकदा गोठतात. उन्हाळ्यात जेव्हा बर्फ वितळतो, तेव्हा सभोवतालच्या जमिनीवरील कचरा, प्राण्यांची विष्ठा आणि इतर घाण वाहून थेट पाण्याच्या स्त्रोतात येऊन मिळाल्यावर जीवाणूंची वाढ होणे. तसेच काही घातक सूक्ष्मजीव (उदा. Cryptosporidium किंवा Giardia) थंड पाण्यातही जिवंत राहू शकतात. यामुळे पाणी अनेकदा दूषित व्हायचे. यास्तव फळांचा रस किंवा धान्यापासून बनवलेली वाईन/बीअर ही किण्वन (Fermentation) प्रक्रियेमुळे जंतूमुक्त आणि सुरक्षित मानली जात असे. तसेच, मद्य रक्ताभिसरण वाढवून थंडीत उब देण्यास मदत करते म्हणून ख्रिस्ती धर्मात त्याला धार्मिक आणि सामाजिक मान्यता मिळाली.😔
थोडक्यात अशा अनेक धार्मिक प्रथा- परंपरा, आचरण मागे धार्मिक नव्हेतर भौगोलिक परस्थिती कारणीभूत आहे !
रुपालीताई गिरनारे यांनी शब्दांकन
केलेली पोस्ट खुप चिंतनिय आहे
नक्कीच वाचा प्रतिक्रिया कमेंट्स मधून कळवा.🙏