12/01/2026
‘आर्मी बिहाइंड दी आर्मी’
‘आश्वस्त हॅपी अड्डा’ या उपक्रमांतर्गत आश्वस्तमधे नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने झाली.
आपल्याला सैन्याविषयी नेहमीच आपुलकी, आदर आणि कुतूहल असतं. पण, त्या विषयी जाणून घ्यायची संधि क्वचित मिळते, ती या अड्ड्याच्या निमित्ताने मिळाली. सैन्याधिकारी पत्नी सौ. सायली वर्तक यांच्या ‘आर्मी बिहाइंड दी आर्मी’ या मुलाखतीतून अड्ड्याच्या सदस्यांनी आर्मीच्या कुटुंबाचे विश्व समजून घेतले. सायली आश्वस्तच्या पुणे शाखेच्या ‘बिझिनेस हेड’ म्हणून सध्या कार्यरत आहेत.
गेली 17 वर्षे सायलीचे त्यांच्या यजमानांबरोबरच सैन्याशीही नाते जुळले आहे. हॅपी अड्ड्यामधे त्यांनी एका अधिकाऱ्याची पत्नी म्हणून, एक आई म्हणून आणि त्याहीपेक्षा तिथल्या शिपायांच्या कुटुंबांसाठी त्या काम करत असेलेले त्यांचे विविध अनुभव कथन केले.
दर 2-3 वर्षांनी होणारी बदली, नवीन जागेत रुळताना येणारी आव्हाने कशी सहजपणे कुठल्याही अधिकाऱ्याची पत्नी पेलते जे आपल्या सारख्या सर्वसामान्य, सिव्हिल मधले आयुष्य जगताना किती अवघड वाटते याचे फार सुंदर पद्धतीने त्यांनी कथन केले. इथे आपले नातेवाईक, आईवडील आपल्या जवळच असतात. पण तिथे मात्र अधिकाऱ्यांची कुटुंबेच त्यांचे कुटुंब असते. कित्येकांशी मग जवळच्या नात्यांपेक्षा जास्त जवळचे असे नाते बनून जाते.
काश्मीरमधे आलेले चांगले-वाईट अनुभव सांगताना त्या भावूक झाल्या. असे अनेक अनुभव ऐकताना प्रेक्षकही हेलावून गेले होते.
आश्वस्तमधे आता त्यांच्या कलागुणांचा, अनुभवाचा खूप उपयोग होतो असेही त्यांनी नमूद केले. आश्वस्तच्या सह-संस्थापिका प्रीति दामले यांनी मुलाखत रंजक परंतु संयत पद्धतीने रंगवली. आश्वस्तला सायली आणि वर्तक कुटुंबाचा अतिशय अभिमान आहे.
गुरुराज सोसायटी सभागृह उत्सुक ज्येष्ठ नागरिकांनी भरून गेले होते.
या वेळी सैनिक माता सुषमा वर्तक, सविता ओक व प्राची साठे यांचे सत्कार करण्यात आले.
आश्वस्त टीमतर्फे सायलीचे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐