08/03/2023
या पेज वर वेळोवेळी साधारण नियम, स्त्रीला होणारे विविध शरीर मानस त्रास, उपाय याबाबत लिहीत आले आहेच, पण आजच्या दिवसाचे औचित्य साधून काही महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे:
• Superwoman syndrome हा बाकीच्यांना "awe"some वाटला तरी तो आपल्याला किती स्तरांवर त्रास देत आहे याचा विचार करायला हवा. सर्व डगरींवर पाय ठेवण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा काही ठिकाणी फ्रंट फूट आणि काही ठिकाणी बॅक फूट वर राहून आरोग्य सांभाळणे श्रेयस्कर. पाळीच्या दिवसात १५० किलोमीटर सायकल चालवणे, बाकी दिवसांइतकाच व्यायाम करत राहणे हे वात वाढीचे मोठे कारण ठरते. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम असला तरीही खूप जास्त प्रमाणात सतत केला असता विशेषतः स्त्रियांमध्ये उष्णता वाढवताना दिसतो. त्याचे परिणाम सरक्त मूळव्याध, bleeding जास्त होणे, पुटकुळ्या, गळू अशा पद्धतीत बाहेर येऊ शकतात.
• बाळंतीण झाल्यावर लगेच वजन कमी होण्यासाठी प्रयत्न करणे त्रासदायक ठरू शकते. बाळंतीण असताना शेक शेगडी नीट करावी. अंगाला तेल लावणे, अंगात उबदार कपडे हे वात वाढायला प्रतिबंध करतात. या वेळी लक्ष दिली नसता नंतर आमवात संधिवात सारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
• जास्त प्रमाणात चहा, घाई आणि मनस्ताप बऱ्याच स्त्रियांना मध्यवयात होणाऱ्या अम्लपित्ताचे मूळ कारण ठरते.
शिळे, फ्रीज मधले खाणे, दिवसा झोपणे या गोष्टी टाळणे तसेच मनाचा विचार करणे उपयुक्त ठरते.
• वेळेवर लग्न आणि वेळेवर मूल हे स्त्रीच्या नंतरच्या आरोग्य सांभाळायच्या आणि घरच्या management च्या दृष्टीने खूप आवश्यक. बाळंतपण झाल्यावर साधारण २ महिन्यांनी हळू हळू व्यायाम, पोश्चर कडे लक्ष आणि वार्षिक बस्ती उपक्रम करून आपल्या हाडांची आणि सांध्यांची काळजी घ्यावी. आर्थिक निकड, जास्त वेळची/प्रवासाची नोकरी कुटुंब आणि आरोग्य यामध्ये तारतम्याने प्रायोरिटी वेळीच ठरावाव्यात.
• शरीरसंबंध विषयी नाराजी असल्यास, त्रास होत असल्यास त्यावर बोलणे न टाळता तज्ञांचा सल्ला घ्यावा. योनीमार्ग व मूत्रमार्ग स्वच्छता, तिथे संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी.
स्त्री जन्मापासून मृत्यूपर्यंत नैसर्गिकरीत्या अनेक स्थित्यंतरांना सामोरे जाणे ही सोपी गोष्ट नाही. यातील प्रत्येक वळणावर "नॉर्मल" म्हणून स्वीकारलेल्या अनेक लक्षणांवर आयुर्वेदामध्ये कायमस्वरूपी उपाय आहेत. वेळीच आळा घातला असता आयुर्वेदाच्या साहाय्याने आरोग्यपूर्ण आयुष्य नक्कीच मिळवता येईल. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
©वैद्य स्वराली शेंड्ये
यशप्रभा आयुर्वेद