
20/06/2025
वारी ऑफ RA वॉरियर्स: वेदना, वारी आणि पांडुरंग
रामकृष्ण हरी 🙏🏼
मी स्वतः वारी अनुभवलेली नाही, पण गेल्या काही वर्षांत माझ्या रुग्णांकडून तिच्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि दरवेळी थक्क व्हायला होतं.
गेल्या आठवड्यात अनेक आमवात (rheumatoid arthritis) असलेल्या पेशंट्सनी लवकर फॉलोअपसाठी भेट दिली.
खरंतर ते स्वतः आले नव्हते, त्यांच्या काळजी करणाऱ्या कुटुंबियांनी त्यांना आणलं कारण ते आळंदी ते पंढरपूर वारीसाठी निघणार आहेत.
सर्वांमध्ये एक गोष्ट समान — आत्मविश्वास आणि श्रद्धा.
“मला काही होणार नाही, पांडुरंग आहे आपल्यासोबत!” असं ते हसून सांगतात.
गेल्या ८ वर्षांपासून नियमितपणे येणारे एक वयोवृद्ध शेतकरी (प्राउडली मॅट्रिक पास),
दरवर्षीप्रमाणे यंदाही क्लिनिकमधून जाताना हसून म्हणाले:
“डाकटर , डोन्ट वरी… आय गोइंग वारी!” 😄
गेल्यावर्षीही असंच अनेक रुग्ण फक्त मुलांच्या आग्रहाखातर आले, आणि वारी करून परतले, तेही पेनकिलर आणि SOS औषधांचा बॉक्स न उघडता!
ना कोणती खास तयारी, ना डायेट प्लान.
त्यांचं बळ प्रोटीन शेकमधून नाही, ते पांडुरंगावरच्या अढळ श्रद्धेतून येतं.
कधी कधी शेक नव्हे, ही ‘अन्शेकेबल’ श्रद्धाच जास्त ताकदवान ठरते.
हे आमवाताचे रुग्ण दररोज वेदनेशी झुंज देतात. पण वारीत ते ३०० किमी चालतात -अशा ताकदीने, जी औषधांनीही समजावता येत नाही.
ही श्रद्धा, हे ध्येय, आणि आजाराच्या पलीकडे जाण्याची मानवी क्षमता- यातच दडलेलं असतं खरं बळ!
डॉ. प्रविण पाटील
संधिवात तज्ञ, पुणे