21/01/2023
काय होतं की आपल्याला अंगाला हात लावून तपासणाऱ्या, आपल्या सवयी खोडी माहीत असल्यामुळे त्याबद्दल हक्काने कान टोचणाऱ्या, आपला त्रास समजतोय हे वागण्या बोलण्यातून दाखवणाऱ्या 'आपल्या आपल्या' डॉक्टरांची सवय असते. परदेशात आजारी पडलो की आधी आपल्या डॉक्टरांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आजारी पडलं की त्यांच्याकडे जायचं, स्वतःला अगदी सोपवून द्यायचं, हजार प्रश्न विचारायचे, अगदी रडू वगैरे आलं तरी बिनधास्त रडायचं, ते सांगतील ती औषधं मनात कोणतीही शंका न आणता घ्यायची आणि हळूहळू बरं व्हायचं! बहुतेक वेळा आपले डॉक्टर आपले कौन्सेलर, शिक्षक, पालक आणि ज्याचा अमाप आदर वाटावा असे मित्रही असतात. घरात ए सी बसवावा की नाही इथपासून मुलाची ऍडमिशन कुठं करावी इथपर्यंत वाट्टेल त्या गोष्टी त्यांच्याशी बोलता येतात. अशा आपल्या फॅमिली डॉक्टरांचं आपल्याला हवं तेव्हा उपलब्ध असणं आपण गृहीत धरलेलं असतं.
परदेशात आल्यावर या बाबतीतही स्वावलंबी होणं हा पहिला दणका असतो.
इथंही फॅमिली डॉक्टर असतात, इथंही बहुतेक सगळे तज्ञ असतात पण इथं 'आपण ' 'परदेशी' असतो. आणि त्यामुळे खूप खूप फरक पडतो.
काय झालं सांगते.
पंधरा एक वर्षं झाली. त्याला अचानक बारीक ताप येत होता. औषधं घेऊन कमी व्हायचा. एक दिवस चालताना धाप लागली. जीव थकून गेला. विश्रांती घेऊनही बरं वाटेना. हळूहळू धाप लागणं वाढलं. छातीत दुखू लागलं. जवळच जीपीकडे गेलो. तिने ताप कमी व्हायची औषधं दिली, लिक्विड डाएट सांगितलं आणि हायड्रेटेड राहण्यासाठी कोका कोला किंवा तत्सम गोष्टी पीत रहा असा सल्ला दिला. त्यात चार दिवस गेले. त्रास वाढतच होता.
एक दिवस उभं राहिलं तरी चक्कर यायला लागली. आम्ही इमर्जन्सी रूममध्ये पळालो. तिथं वाट बघण्याचा काळ होता 2 तास. मग नंबर लागला. फिजिशिअन म्हणे हार्ट प्रॉब्लेम वाटतोय. तासभर वाट बघितल्यावर हार्ट स्पेशालिस्ट बघून गेला. लक्षणं विचारली. हे काही हार्ट चं वाटत नाही म्हणून निघून गेला. मग लंग स्पेशालिस्ट आला. एक्स रे करून म्हणे याचं तर एकच फुफ्फुस काम करतंय. निदान काय ते कळण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतील. खोकला वगैरे नव्हताच. ऍडमिट होऊन रक्त वगैरे तपासण्या सुरु झाल्या. तोवर घरच्या डॉक्टरांनी टी बी आहे हे लक्षणं ऐकून सांगितलं होतं. धीर दिला होता. सहा महिने औषधं घ्यायची सांगितलं होतं. पण जोवर इथल्या डॉक्टरांना टेस्टमध्ये तसे पुरावे सापडत नाहीत तोवर फक्त ताप कमी व्हायचं औषध सुरु होतं. फुफ्फुसातलं दिवसाला लिटरभर पाणी काढण्यासाठी एक नळी लावली होती. ती लावण्यासाठी कापून स्क्रू वगैरे फिट करताना भूल हवी आहे का असा चॉईस विचारला होता!
नवऱ्याला डच यायचं नाही. आणि हॉस्पिटल स्टाफला इंग्रजी यायचं नाही.
घरचं अन्न खायला परवानगी नाही. पेशंट जवळ थांबायची वेळ दिवसातून चार तास. रात्री सोबत थांबणं वगैरे तर विषयच नाही. जेवणात मासे. मला डच बऱ्यापैकी यायचं. मी शाकाहारी म्हणजे काय सांगायची. स्टाफ ड्युटी बदलली की पुन्हा ताटात मासे! तब्येत अजून बिघडतच चालली होती. काय त्रास होतोय ते इंग्रजीत सांगितलेलं डॉक्टर सोडून कुणालाही कळायचं नाही. डॉक्टर दिवसातून तीन चार मिनिटं बघून जायचे. मी जाऊन हॉस्पिटलमधल्या सोशल वर्करला भेटले. तिने परिस्थिती समजून घेऊन मला दिवसभर थांबायची परवानगी दिली.
मग टेस्ट रिपोर्टसाठी मागे लागणे,ते ट्रान्सलेट करून भारतात पाठवणे, भारतातल्या आणि इकडच्या डॉक्टरांचं फोनवर बोलणं करून देणे असं काय काय सुरु राहिलं. धीर देणं सोडा पण इथले डॉक्टर मलाही हा प्रकार संसर्गजन्य असू शकतो तर तू इथं बसायचं की नाही ठरव असं म्हणायचे.मोठ मोठ्या सुयानी पोटात इंजेक्शन द्यायला एकजण आला. त्याला विचारलं हे का घ्यायचं आहे, म्हणे तू झोपून आहेस म्हणून. घ्यायलाच हवं का? यावर थंड उत्तर - तुझी बॉडी. तू ठरव!!!
फायनली 11 दिवसांनी भारतातल्या डॉक्टरांचं निदान बरोबर आहे ही आनंदाची बातमी मला तिथल्या डॉक्टरांनी दिली. वीस पंचवीस गोळ्या लिहून दिल्या. घरी सोडलं. जाता जाता म्हणे यातल्या काही औषधाचा डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर तुम्ही आय स्पेशालिस्टला दाखवून घ्या. म्हटलं बरं. अपॉइंटमेंटसाठी फोन केला तर म्हणे लवकरात लवकरची अपॉइंटमेंट अजून 9 आठवड्यानी आहे!
एकूणच आम्ही दोघे इतके शिणलो होतो की सगळं गुंडाळून सरळ भारतात आलो. 24 तासांच्या आत भारतातली ट्रीटमेंट सुरु झाली होती. आम्ही आपल्या माणसात आहोत या गोष्टीचा प्रचंड सकारात्मक परिणाम तब्येतीवर दिसत होता.
गोष्ट अशी होती की तोवर त्या डच डॉक्टरने या प्रकारची टी बी ची केस क्वचितच बघितली होती म्हणे. 30-32 वर्षांच्या त्याच्या अनुभवात भारतीय पेशन्ट्स फार तर 10 आले असतील असं स्वतःच सांगत होते ते. शिवाय संपूर्ण निर्व्यसनी असलेल्या माणसाला भारतातल्या अनहायजीनिक परिस्थितीमुळे टी बी झाला अशी टिप्पणी पण त्यांनी केली. ( त्या आधी वर्षभर सलग आम्ही तिथेच होतो हे सांगूनही )
पेशंटला खोटी आशा दाखवायची नाही, प्रोटोकॉल सोडून ट्रेंटमेन्ट द्यायची नाही, पेशंट पासून काहीही लपवायचं नाही वगैरे नियम चांगलेच आहेत. पण यात एम्पथी, माणूस म्हणून वागणूक या गोष्टी फार कमी वेळा अनुभवाला येतात.
अजून काही अनुभव सांगते.
वय वर्षं चार. सतत ताप सर्दी. डॉक्टर कोणत्याही extra तपासण्या करायला तयार नाही. शेवटी ते मूल थकून खेळेना खाईनासं झाल्यावर आईबापानी हट्टच केल्यावर टेस्ट केल्या. आणि न्यूमोनियाचं निदान सांगितलं. ते सांगताना आपण आधीच लक्ष द्यायला हवं होतं वगैरे भाव सुद्धा नाही.
मैत्रिणीला खूप त्रास होत होता म्हणून दोन आठवडे मागे लागल्यावर सोनोग्राफीला पाठवलं. रिपोर्ट देताना म्हणे गर्भाशयात काहीतरी दिसतंय, कॅन्सरही असेल किंवा साधे फायब्रॉइडही असतील! काय ते तुझी गायनॅक सांगेलच. गायनॅकची अपॉइंटमेंट दोन आठवड्यानंतरची! तोवर पेशंट आणि घरचे गॅसवर! गायनॅक म्हणे फायब्रॉइडस आहेत, ते सर्जरी करून काढायचे की नाही तू सांग!!!!
मित्राचं पोट दुखत होतं. जी पी फक्त पेनकीलर लिहून देत होते. त्याला वेगळीच भीती वाटत होती. नॉशिया, ताप, पोट दुखी अशा अवस्थेत त्याने स्पेशालिस्टकडे जायचा हट्टच धरला तेव्हा दोन महिन्यानंतरची वेळ मिळाली. तोवर याने भारतातल्या डॉक्टरांशी बोलून आहारात बदल करून, औषधं घेतली आणि बराही झाला. स्पेशालिस्ट त्याच्यावर उगाच वेळ खाल्ला म्हणून वैतागला!!!!
तीन वर्षाची मुलगी शाळेत मिसळत नाही, बोलत नाही म्हणून तिला चाईल्ड सायकीअट्रिस्तकडे रेफर केलं गेलंय. भारतातून नुकतीच आलेली, आईचा हात कधीही न सोडलेली ती चिमुकली केवळ बुजल्यामुळे असुरक्षित वाटून तसं वागतेय हे लक्षातही घेतलं नाही.
बॉर्डर लाईन ऑटिजम असं निदान झाल्यावर स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट मिळायला 8 महिने लागलेत अशी केस नुकतीच बघितली. त्या काळात त्या बाळाच्या पालकांचे काउंसेलिंग वगैरे दूरची गोष्ट!
इथं थेट उठून हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होता येत नाही. तुम्हाला तुमच्या घराजवळच्या स्थानिक जी पी कडे रजिस्टर करावे लागते. तिथेच जायचं. त्यांना वाटलं तर ते स्पेशालिस्टकडे रेफर करणार.
अचानक काही झालं तर इमर्जन्सीत जायचं. तिथं तुम्हाला डॉक्टर येऊन बघेपर्यंत 1 तास ते 4 तास लागू शकतात.
अगदीच आणीबाणी असताना आंब्युलन्स बोलावता येते. पण त्याची खरंच गरज होती का हे हेल्थ इन्शयूरन्सवाले ठरवतात. त्यांनी नाही म्हणलं तर साधारण हजार स्विस फ्रॅंक एवढा भुर्दंड खिशातून द्यावा लागतो.
कोणतीही आरोग्य सेवा मोफत नाही. हेल्थ इन्शुरन्स सक्तीचा आहे. गरजू लोकांना सबसिडीज आहेत पण मोफत काहीही नाही.
डेंटिस्ट, फिजिओथेरपीस्ट, आय स्पेशालिस्ट यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन जाता येतं. पण जी पी कडून रेफरन्स नसेल तर त्याला किती काळ लागेल सांगता येत नाही.
किरकोळ औषधं सोडली तर कोणतीही औषधं विदाउट प्रिस्क्रिप्शन मिळत नाहीत. अँटीबायोटिक तर फार्मसीस्ट तयार करून देतात आणि प्रिस्क्रिप्शन ठेऊन घेतात. नेहमीची थायरॉईड वगैरे औषधंही प्रत्येकवेळी प्रिस्क्रिप्शन देऊनच घ्यावी लागतात. अर्थात त्यासाठी प्रत्येक वेळी जी पी ची भेट घेणं आलंच.
पंधरा मिनिटांच्या कन्सलटेशनची इथली फी 130 chf पासून सुरु होते. बिलाच्या पावतीत पेशंटने काय शंका विचारल्या, नेमकी काय तपासणी झाली, कोणती औषधं दिली ते सविस्तर लिहिलेलं असतं.
इथंही माझी जीपी मला आजी सारखी वाटते. पाठ दुखतेय, भूक लागत नाही अशा शंका विचारल्यावर जरा शेकून बघतेस का, जरा संत्री खाऊन बघतेस का असं कन्सल्टेशन बरेचदा देते. अर्थात सोबत पेनकीलर आणि श्रद्धा सबुरी आलीच!
हे अनुभव वेगळे म्हणून लिहितेय. या अनुभवांमुळे भारतीय आरोग्य व्यवस्था, आपले डॉक्टर्स याबद्दल कृतज्ञता आणि आदर वाढतच गेलाय. इतकी लोकसंख्या, इतके पेशंट्स, अपुऱ्या व्यवस्था, कामाच्या तासांची गणती नाही अशा परिस्थितीत स्वतःचे मोराल टिकवून वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करत राहणारे सगळेच माझ्या दृष्टीने सुपर हिरो आहेत.
अर्थात माझे अनुभव काही फार जास्त आहेत, महत्वाचे आहेत असं नाही. सर्वसामान्य पेशंट म्हणून तीन वेगवेगळ्या देशात आलेले हे अनुभव.
यात कोणत्याही दोन देशांची तुलना करायची नाही तरी ते शंभर टक्के जमत नाही.
आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती या आणि अशा असंख्य घटकांमधील भिन्नतेचा फार मोठा प्रभाव त्या त्या देशातल्या सिस्टीम्सवर पडत असणार त्यामुळे तुलना करणं योग्यही नाही.
त्यात जगात सगळीकडे चांगले वाईट लोक असतात त्यात डॉक्टर्सही असणारच. सुदैवाने माझ्या वाट्याला फार चांगले डॉक्टर्स आलेत. आपल्याला चांगलं वाटतं ते आपण सांगावं म्हणून सांगतेय, भारतीय आरोग्य व्यवस्था आणि भारतीय डॉक्टर्स ही कृतज्ञता वाटण्याची गोष्ट आहे.
माया ज्ञानेश.
स्वित्झर्लंड