13/11/2025
आज 13 नोव्हेंबर
आज World Kindness Day.
कधी कधी दयाळूपणाचा एक साधा क्षण…
एखाद्याचं आयुष्य बदलतो,
आणि नकळत आपलंही.........
सरस्वतीबाईंचं वय साठच्या पुढे.....
घरात सगळ्यांची धावपळ, जबाबदाऱ्या, न थांबणारी कामं…
आणि मधेच डॉक्टरांचे शब्द...
“शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल सांभाळा. स्वतःकडे लक्ष द्या.”
पण त्या स्वतःला विचारायच्या,
“माझ्याकडे वेळ कुठे आहे?”😢
त्या स्वतःसाठी थोडंसुद्धा थांबल्या नव्हत्या.
वर्षानुवर्षे.
त्या दिवशी बाजारात गेल्यावर त्यांनी पाहिलं
नेहमीचा आनंदी, गप्पाष्टक करणारा रामू
आज अगदी शांतपणे कोपऱ्यात बसला होता.
डोळ्यात थकवा, चेहऱ्यावर चिंता,
सरस्वतीबाई जवळ गेल्या.
“रामू, काय झालं? आज तू असा शांत का?”
रामूने मान खाली घालत हसण्याचा प्रयत्न केला,
“मुलगी एका दिवसापासून तापात आहे ताई…
हॉस्पिटलला घेऊन गेलो.
म्हणून सकाळभर दुकान लावू शकलो नाही.
उशिरा बसलो, म्हणून ग्राहकही नाहीत.”
त्याच्या आवाजातली असहायता
सरस्वतीबाईंना जास्तच टोचून गेली.
क्षणभरही न विचार करता त्यांनी
त्याच्याकडची संपूर्ण ताजी भाजी घेतली.
त्या म्हणाल्या,
“रामू, आज मी तुझ्यावर कृपा नाही करत…
आज माझ्या अंतःकरणाला हलकं करतीय.
चल, आजचा दिवस तरी तुझा हसरा होऊ दे.”
रामूच्या डोळ्यात पाणी तरळलं
तो म्हणाला,
“ताई… देव नेहमी तुमच्या पाठीशी राहो.”
घरी आल्यावर सरस्वतीबाईंनी
भाज्या स्वयंपाकघरात ठेवल्या…
आणि अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच
त्या स्वतःसाठी असा स्वयंपाक बनवायला बसल्या.
ताजी सलाड, हलकं सूप, आठवणींनी मऊ कढईतली भाजी…
आणि स्वतःशी विचार केला
“दयाळूपणा दुसऱ्यांसाठी करावाच
आणि स्वतःसाठी?
आरोग्य सांभाळण हा दयाळूपणा स्वतःसाठीच आहे आणि घरातील इतरांसाठी सुद्धा....
आणि आरोग्य म्हणजे केवळ शरीरावरच प्रेम असण नाही तर स्वतःचे मन देखील शुद्ध असणं
आपण कोणासाठी चांगलं करायचा विचार केला तर आपल्यालाही भरभरून मिळतच
दुसऱ्यांसाठी देखील आपल्याला चांगलं होता येण हे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही लाभेल असे सगळे विचार त्यांच्या मनात आले 😍
त्या दिवसापासून
फळं, भाज्या, कमी मीठ, कमी तेल, पुरेसं पाणी
अशा छोट्या पण काळजीवाहू सवयी
त्यांच्या आयुष्यात रुजू लागल्या.
आणि आश्चर्य म्हणजे
रामूला केलेली एक छोटी कृपा,
आणि स्वतःकडे केलेली एक प्रेमाची कृती,
दोन्ही मिळून
सरस्वतीबाईंच्या पुढच्या दिवसांना
आरोग्य दायी, शांत, आणि आनंदी करून गेल्या.
अर्चना रायरीकर