12/08/2025
सेल्फ केअर आणि सेल्फ लव्ह
परवा काहीच प्रॉब्लेम नाहीये नावाचा चित्रपट पहिला त्यात स्पृहा जोशी तिच्या आत्याला सांगत असते 'अगं बघ तू कशी राहतेस, स्वतःकडे लक्ष तरी असतं का तुझं.. आपणच स्वतःकडे लक्ष दिलं नाही, आपणच स्वतःवर प्रेम केलं नाही तर बाकी कोणाला आपल्याकडे लक्ष द्यावसं का वाटेल??' याबद्दल एका मैत्रिणीशी बोलत असताना ती म्हणाली "पण हे काय अगं, आपणच आपल्यासाठीच करायचं? याला काय अर्थ आहे?? म्हणजे आपण सगळ्यांकरता काही न काही करत राहायचं आणि आपल्यासाठी कोणीच काहीच करत नाही म्हणून आपणच काळजी घ्यायची स्वतःची... this is not done....
मला नेहमी वाटायचं की स्वतःची काळजी घ्यायची स्वतःवर प्रेम करायचं यातून आपल्याला ऊर्जा मिळते. पण हा असा विचार याआधी कधीच मनात आला नव्हता....
पण म्हणजे आपण समोरच्यासाठी त्याला छान वाटावं म्हणून सगळं काही करायला तयार असतो आणि स्वतःसाठी काहीच नाही... का तर मी केलं पण तो माझ्यासाठी काहीच करत नाही.... म्हणजे मला माझ्यासाठी काहीच वाटत नाही. इतर कोणी माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून मीही करणार नाही हे कितपत योग्य आहे? आणि असं वागून आपल्याला काय मिळतं? ती समोरची व्यक्ती आपल्यासाठी सगळं करायला लागते? त्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन आपली काळजी घ्यायला लागते? नाही... यातलं काहीच होत नाही पण आपण मात्र वारंवार स्वतःकडे दुर्लक्ष करत राहतो... स्वतःच्या गरजा, आवडी निवडी नेहमीच बाजूला ठेवत राहतो. जे घडत नाहीये त्याकरता इतरांना आणि स्वतःलाही मनातल्या मनात कोसत राहतो... पण त्यासाठी काहीच केलं जातं नाही कारण त्यामागे तो समोरची व्यक्ती माझ्यासाठी काहीच करत नाही, तिला काहीच करावंसं वाटतं नाही. मी इतरांचे करून थकलो आहे/ थकले आहे. माझं पण मीच का करायचं हा विचार असतो...
पण याच विचाराचा वेगळा पैलू जर आपण बघायचा म्हणलं तर समोरच्या व्यक्तीसाठी काहीतरी करताना तुम्हाला काहीच मिळालं नाही का? आपल्याला त्याच्यासाठी एखादी गोष्ट करताना आनंद मिळाला नाही का? समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समाधान मिळालं नाही का? म्हणजे ही गोष्ट आपण जितकी त्यांच्याकरता केली तितकीच ती स्वतः करतादेखील केली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जर इतरांकरता एवढं सगळं करू शकते, इतरांवर प्रेम करू शकते, त्यांची काळजी घेऊ शकते... तर स्वतःकरता का नाही? मी माझ्याकरता महत्वाची का असू शकत नाही? मी जर इतरांना आधार देऊ शकते तर स्वतःलाही देऊ शकते त्यासाठी मी इतर कोणावर अवलंबून का राहावं? किंवा इतर कोणी माझ्यासाठी काही करत नाही म्हणून दुर्लक्ष का करावं? जर मी माझी आणि समोरच्या व्यक्तीची दोघांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे तर इतर कोणी माझी काळजी घेत नाही म्हणून कुढत राहायचं की स्वतःसाठी स्वतःकडे एक पाऊल पुढे टाकायचं....
मुळात स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे आपल्याला खूप काही वेगळं करायचं नाहीये. दिवसभराची सगळी कामं आटोपली की जो वेळ आपण फेसबुक, इंस्टा, युट्युब, वेबसेरिस , टीव्ही सेरिअल्स यामध्ये घालवतो त्यातला थोडासा वेळ स्वतःबरोबर घालवायचा. त्या वेळात फक्त आपण असायला हवं, नातेवाईक, कुटुंब, मुलं, अभ्यास, काम काही काही नको. त्या वेळात कोणत्याही स्क्रिन चा वापर न करता तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करू शकता... तुम्ही लहान असताना, शिकत असताना, जेव्हा टीव्ही, फोन नव्हते तेव्हा तुम्ही फावल्या वेळात जे काही करत होतात ते सगळं करू शकता... एखादं आवडतं पुस्तक वाचू शकता, खिडकीबाहेर पाऊस बघू शकता, निवांत कसलाही ताण न घेता लोळू शकता, तुमचा खूप दिवसापासून न आवरलेलं कपाट आवरू शकता, एखादं चित्र काढू शकता, जुन्या जमवलेल्या गोष्टी, पत्र काढून ते पाहू शकता, अगदी वेगवेगळ्या रंगांनी कागदावर नुसत्या रेघोट्या ओढू शकता... एखादी वही करून त्यात तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करू शकता, अशी कुठलीही गोष्ट करू शकता ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो आणि मिळायचा...
सेल्फ लव्ह सेल्फ केअर हे शब्द जरी खूप मोठे वाटतं असले तरी ते अगदी साध्या साध्या गोष्टीतून पण साध्य करता येऊ शकतात पण फक्त आपण आपल्याकडे त्या दृष्टीने पाहायला हवं....
मात्र हे सगळं करत असताना त्यातच म्हणजे स्वतःमध्ये गुंतून पडणं, इतरांची तमा न बाळगणं हे मात्र त्रासदायक ठरू शकतं, आता याच्यातला Balance कसा साधायचा याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन....तूर्तास इतकंच!!
नेहा किल्लेदार
मानसशास्त्रज्ञ, समुपदेश
Mindflow Mental Health Cares, Pune
MA in Clinical Psychology (SPPU)
PG Diploma in Clinical and Counselling Psychology (SPPU)
094052 62066