26/02/2025
गोत्रमेलन पाहण्याचे महत्त्व किती?
गोत्रमेलन पाहावे की नाही, याबद्दल मतांतरे आढळतात. परंतु ज्योतिषांनी पोथीनिष्ठ न राहता आपल्या स्वत:च्या संशोधनाने शास्त्रात भर घालावी, या मताचा मी आहे.
नुकतेच माझ्याकडे वधूवरांचे गुणमेलन तपासण्यासाठी एक जातक आले होते. त्यांनी मी करून दिलेल्या वैयक्तिक गुणमेलन कोष्टकानुसार त्यांच्या कन्येची पत्रिका एका स्थळाशी जुळत होती. स्थळ ओळखीचे होते. परंतु गोत्रे एकच होती. अशा परिस्थितीत त्या दोघांच्या पत्रिका पाहून विवाह करण्यास हरकत नाही ना, हे तुमच्या शास्त्रानुसार सांगावे अशी मला पृच्छा करण्यात आली.
याला उत्तरादाखल मी कळविले की, शास्त्र माझे नाही. संशोधन माझे आहे. त्यानुसार सगोत्र किंवा न जुळणाऱ्या गोत्रांमध्येे जर सोयरीक जोडली गेली तर लक्षणीय प्रमाणात संततीमधे वैगुण्य येते, हा अनुभव आहे. निर्णय समजूतदारीनेे घ्यावा. अर्थातच स्थळ माहितीतले असल्याने जातकाचा अपेक्षाभंग झाला. त्याला माझाही इलाज नव्हता.
विवाहाचे वेळी गोत्र पाहावे का, याबद्दल पूर्वी विवरण केले आहे. परंतु परत एकदा येथे देत आहे. गोत्रांच्या नावांचे निरीक्षण केले तर हे लक्षात येते की, ती सर्व ऋषींची नावे आहेत. यावरून असा बोध होतो की ऋषीच्या शिष्यसमुदायास गोत्र म्हणत असावेत. त्या शिष्यांमध्ये बहीणभावाचे नाते मानले जात असे. म्हणून सोयरीक जोडत नसत. म्हणजेच गोत्राचा जन्मवेळेशी काहीही संबंध नाही. आता ते ऋषीही हयात नाहीत आणि त्यांचा शिष्यसमुदायही शिल्लक नाही. त्यामुळे विवाह जमविताना गोत्र विचारात घेऊ नये, असा एक मतप्रवाह आहे.
दुसरी एक विचारसरणी अशी आहे, जी अनुभवाधिष्ठित आहे. सगोत्रांचे तसेच न जुळणाऱ्या गोत्रांचे अनेक विवाह झालेले आहेत. अशा जोडप्यांच्या बाबतीत एक अनुभव लक्षणीय प्रमाणात असा आहे की, त्यांच्या संततीत वैगुण्य आलेले आहे. अर्थात हा अनुभव 100 % उदाहरणात अनुभवायला मिळत नसला, तरी लक्षणीय प्रमाणात अनुभवास येतो, ही वस्तुस्थिती आहे.
आता हे असे का होते, याची कारणमीमांसा ग्रंथांमधून सापडत नाही. म्हणजे ते सध्यातरी ज्ञात शास्त्राच्या कक्षेबाहेर आहे. अशी परिस्थिती प्रत्येक शास्त्राच्या बाबतीत असतेच. शास्त्राला परिपूर्णता कधीच नसते.
शिवाय सर्व शास्त्रे शक्यताच वर्तवितात. खात्री देत नाहीत. जसे मेडिकल सायन्स सांगते की, धूम्रपान करण्याने कॅन्सर होतो.
आता प्रत्यक्षात धूम्रपान करणाऱ्या सर्वांना कॅन्सर होतो का? सर्वांना होत नाही म्हणून धूम्रपान करण्यास मोकळीक आहे, असा अर्थ घ्यायचा का? तसेच गोत्राचे आहे. संततीत वैगुण्य असण्याचे प्रमाण लक्षणीय आहे म्हणून या मुद्द्याचा विचार करणे भाग आहे.
ज्या पती-पत्नींच्या वैयक्तिक पत्रिकांमधे संततीसंबंधी काहीही दोष नाही, ज्या पती-पत्नींच्या पत्रिकांच्या समन्वयात पंचमस्थान विषयक संबंधात दोष नाही, तरीही संततीत वैगुण्य आले आहे; अशा उदाहरणात संशोधनाची सुई अन्य कारणांकडे वळते. अन्य कारणांपैकी एक कारण म्हणून गोत्रांकडे वळते. अशी स्वच्छ उदाहरणे माझ्या प्रबंधात अभ्यासलेली आहेत. त्यात हा दोष सापडला आहे. म्हणून असे संबंध जोडण्यापासून चार हात दूर राहणेच शहाणपणाचे आहे, असा निष्कर्ष निघतो.
वरील दोन्ही विचारप्रवाहांचा परामर्श घेतल्यास या निर्णयाप्रत आपण येतो की, अज्ञानामुळे नुकसान होण्यापेक्षा विषाची परीक्षा न घेणेच शहाणपणाचे. वधूवरांचा विवाह ठरतो आहे. परंतु सगोत्र किंवा न जुळणारी गोत्रे आहेत हा अडथळा आहे. अशा वेळेस दोघांपैकी एकास मामाच्या मांडीवर देऊन किंवा दत्तक देऊन गोत्र बदलणे साफ चुकीचे असते. ‘गोत्र' हे पुरुषप्रधान आणि आनुवंशिक असते. त्यामुळे दत्तक देण्याच्या रूढीने गोत्र कधीही बदलत नसते. ही अनिष्ट रूढी पाळू नये.
थोडक्यात, ज्योतिषाच्या भूमिकेतून माझे असे स्पष्ट मत आहे की, विवाह जमविताना गेोत्राचा विचार अवश्य करावा.
धन्यवाद.
ज्योतिषपंडित
डॉ. सुधीर दाते
मो. 94230 09652
***