07/07/2024
पावसाळा अर्थात वर्षा ऋतू - आयुर्वेदानुसार वात दोषाचा प्रकोपाचा काळ !!
संधीवात, सांधे दुखी, अपचन, पोटाचे / पचनाचे "विकार, वेगवेगळी इन्फेक्शन्स, सर्दी, खोकला ताप, डेंग्यू, चिकुन गुन्या आणि आता झिका व्हायरस इत्यादि. विकार डोके वर काढू लागले आहेत.
वर्षा ऋतू मधे सतत वातावरणात बदल होत असतात. कधी गरम होते खूप ऊन असते, तर कधी संततधार पाऊस. सततच्या या बदलांमुळे, साचलेल्या किंवा खराब पाण्यातून अनेक जीवाणू विषाणू वाढू लागतात. आयुर्वेद असे सांगतो की वर्षा ऋतू मध्ये आपल्या शरीरातला अग्नि मन्द असतो आणि पुढे सांगतो की "रोगाः सर्वेऽपि मन्देऽग्नौ ।" म्हणजे सगळेच आजार मन्द अग्नि मुळे होऊ शकतात.
अर्थात सोप्या भाषेत आपण असे समजू की आपली रोग प्रतिकार शक्ती या ऋतूत खूप कमी झालेली असते.
चुलीवर एखादा पदार्थ उत्तम शिजण्यासाठी काही घटकांची गरज असते. योग्य प्रमाणात अग्नि, त्यासाठी लागणारे पूर्ण कोरडे सरपण किंवा इंधन, योग्य प्रमाणात हवा (अग्नि शिलगविण्यासाठी) आणि काही स्निग्ध घटक जसे की तूप किंवा तेल, ज्यामुळे अग्नि दीर्घकाळ पेटून राहील.
याव्यतिरिक्त शिजवायचा पदार्थ जर कमी असेल किंवा तांदूळासारखा हलका असेल तर तो लगेच शिजेल, याउलट त्या पदार्थात जर पाण्याचे प्रमाण अधिक असेल किंवा कोणतेही मांस शिजवायचे असेल तर निश्चित वेळ जास्त लागणार व अग्निचा जोर देखील जास्त लागणार. अन्यथा ते अन्न कच्चेच राहील.
आपल्या शरीरातील जाठराग्नि हेच तर काम करत असतो. आणि आपले प्रयत्न यासाठीच असतात की कोणतेही अन्न अर्धवट पचलेले राहू नये व त्यासाठी लागणारा अग्नी पुरेसा वाढावा.
आता आपण असे आहारीय पदार्थ पाहू की जे तुमचा अग्नि मंद करु शकतात.
जसे की मांसाहार, ब्रेड बेकरी मैद्याचे पदार्थ, स्प्राऊटस् (कच्चे), कडधान्यं - (मटकी छोले, हरभरे, पावटा, मटार इ.) नवीन धान्य, आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, उत्तप्पा, मेदूवडा. मीठाचा जास्त वापर, नमकीन पदार्थ इ.
पाण्याचा अतिरेक, जेवल्या जेवल्या झोपणे किंवा आंघोळ, व्यायाम करणे.
रात्री खूप उशीरा जेवणे. भूक नसताना बळे-बळे जेवणे किंवा जेवण झाले असूनही हावरटपणाने पुन्हा खाणे. आणि सर्वात मोठी चूक की जेवणानंतर काहीही गोड खाणे आईसक्रीम, डेझर्टस् इत्यादी.
या सर्व प्रकारांमुळे तुमचा जाठराग्नि अजूनच मंद होतो. त्यामुळे आधीच अग्नी मंद असल्याने वर्षा ऋतूत वरील कोणतीही कुपथ्य करु नयेत.
याउलट अग्नि वाढवण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी हलका आहार घ्यावा. भूक असेल, तरच पूर्ण जेवण करावे अथवा २ घास कमीच बरे.. अन्न ताजे आणि गरम असावे. स्निग्ध पदार्थांचा पुरेपूर वापर असावा जसे साजूक तूप, तेल, दूध, ताक इत्यादि.
वेलवर्गीय फळभाज्या जसे दुधी, दोडका, पडवळ, भेंडी, तोंडली, घेवडा, गवार इत्यादी. भाज्या जास्त खाव्यात. पालेभाज्यांमधे द्रवांश असल्याने शक्यतो कमी खाव्यात. शक्य असल्यास नीट निवडून भाज्या शिजवाव्यात. सूर्यास्तापूर्वी सर्व प्रकारची फळे खाण्यास हरकत नाही.
आपल्या पारंपारिक पाक शास्त्रात वापरले जाणारे सगळे मसाल्याचे पदार्थ जसे हिंग, जीरे, ओवा, मिरी, पिंपळी, मोहरी, मेथी, लवंग, सुंठ, दालचिनी तसेच बऱ्याचश्या वाटणात लागणारे आले लसूण हे पदार्थ सुद्धा आपला जाठराग्नि चांगला ठेवायला आणि वाढवायला मदत करतात. त्यामुळे यांचा देखील योग्य पद्धतीत आपल्या आहारात नियमित करावा.
श्रावण महिन्यात अनेकांचे उपास सुरु होतील. उपास करणे म्हणजे खरे तर लंघन करणे किंवा पचायला हलका आहार घेणे हे अपेक्षित असते, म्हणूनच या प्रकारचे सण, व्रत-वैकल्य वर्षा ऋतूत असतात ; जेणेकरुन आपली प्रतिकारशक्ती चांगली रहावी आणि आपण निरोगी रहावे.
परंतु आपण उलट करतो, उपासाची थाळी खातो, कधी न मिळाल्यासारखी आणि पचायला अतीशय जड अश्या साबुदाण्याची खिचडी, बटाटे असे पदार्थ खातो. जे खाऊन लगेच गॅसेस, अपचन, अॅसिडिटी सगळंच जाणवायला सुरुवात होते.
मग दवाखान्याच्या वाऱ्या सुरु होतात. अँटीबायोटिक्स चे कोर्स, अँटासिडस् चा मारा होतो, तपासण्या, सोनोग्राफी आणि बरंच काही. निदान फक्त अपचन!
आणि त्याच कारण म्हणजे आपण संपूर्ण वर्षा ऋतूत केलेली कुपथ्य.
त्यामुळे आत्ता वर्षा ऋतूच्या सुरुवातीपासूनच योग्य आहाराचे आणि पथ्यांचे पालन केले तर आजारी पडायची वेळच येणार नाही.
आजपासूनच ठरवा आणि योग्य आहार शैलीचा मार्ग धरा. यानेच खरी इम्यूनिटी वाढणार आहे!
- डॉ. योगेश वैशंपायन