
27/08/2025
PCOD मध्ये होमिओपॅथीची प्रचिती"
..काही महिन्यांपूर्वीची खूपच कमी कालावधीत सकारात्मक परिणाम लाभलेली ही केस.. प्रचिती.. २२ वर्षांची तरुण मुलगी...'स्थूल' म्हणावी इतकी तब्बेतीनं लठ्ठ..तिच्या आईसोबत क्लिनिकला आली होती.. थोडी नाखुषीनेच आणि फक्त आईच्या आग्रहाखातर ती होमिओपॅथिक ट्रिटमेंट घ्यायला राजी झाली असावी, हे तिच्या चेहऱ्यावरचे अपेक्षाविरहित आविर्भाव आणि हालचालींमधली अस्वस्थता सांगत होती..
...प्रचितीच्या जुन्या दोन-तीन फाईल्स तिच्या आईनं माझ्या समोर ठेवल्या आणि अत्यंत काकुळतीला येऊन त्या सांगायला लागल्या.. इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणे प्रचितीलाही वयाच्या पंधराव्या वर्षी पाळी यायला सुरुवात झाली.. पाळीच्या ४-५ दिवसांत दररोज ३-४ पॅड्स बदलावे लागायचे...ओटीपोटात, कंबर आणि मांड्यांच्या आतल्या भागात इतकं दुखायचं की, वेदना असह्य होऊन ती स्वतःसोबतच आई आणि लहान बहिणीवरही चिडायची...रात्री-अपरात्री रडायची.. तिच्या वेदना पाहून आईही रात्रभर जागीच..!.. मग सकाळी शेजारच्या डॉक्टरांकडे जाऊन एखादं वेदनाशामक इंजेक्शन-गोळ्या घेतलं की, कसंतरी करुन 'ते दिवस' पुढे सरकायचे...!
सुरुवातीची तीन वर्षं हे असं चाललं..प्रचिती १८ वर्षांची झाली आणि तिची मासिक पाळी अनियमित येऊ लागली..कधी दिड-दिड महिना, तर कधी दोन-अडिच महिने उशिरा..!..म्हणून तज्ञांकडे तिला दाखवलंही जायचं.. आणि गोळ्या-औषधं घेतली की, थोडा फरक पडायचाही ..पण चार-दोन महिन्यांनी पुन्हा तोच प्रॉब्लेम.. प्रचिती आता २० वर्षांची झाली होती आणि तिच्या वयासोबतच तिचा लठ्ठपणाही वाढला होता, चेहर्यावरील केसांची लव ठळक होत असतानाच, डोक्यावरचे केस मात्र लक्षणीयरित्या विरळ झाले होते.. तिच्या वयाच्या मैत्रिणींपेक्षा थोराड दिसायची, म्हणून तिला मैत्रिणींमध्ये मिसळायलाही लाज आणि कमीपणा वाटू लागला.. प्रचिती एकलकोंडी होत गेली.. आता ५-६ महिन्यांतून एकदा पाळी यायची.. चिडचिड, थकवा वाढत जाऊन, तिच्या मनाची एकाग्रता कमी झाली.. आत्मविश्वासही कमी झाला होता..अभ्यासात प्रचितीचं लक्ष लागत नव्हतं, हे तिच्या प्रगतीपुस्तकातली 'अधोगती'च सांगत होती.. ती एकटीच विचारांमध्ये हरवल्यासारखी तासनतास बसून राहायची, नाहीतर झोपून राहायची..घरातलं कुणी काही बोललं, तरी तिचं लक्ष नसायचं.. किरकोळ कारणावरुन घरात कोणावर तरी खेकसायची, तर मध्येच अचानक रडायची आणि "का रडतेस..?" विचारलं तर, शून्यात बघत बसायची.. या दोन वर्षांत तर खूपच हळवी झाली होती प्रचिती..!
"डॉक्टर, होईल ना हो माझी प्रचिती बरी..?"..आवंढा गिळत बोलताना प्रचितीच्या आईच्या डोळ्यात दाटलेले अश्रू अनावर होऊन आता ओघळून गालांवर आले, तसे त्यांनी पदरात चेहरा झाकला आणि डोळ्यामध्ये दाटलेल्या भावनांना आलेला पूर कसाबसा थोपवत, त्यांनी एकदा प्रचितीच्या चेहर्याकडे पाहिलं.. क्षणात पुन्हा नजर वळवून खूप आशेनं माझ्याकडे पाहणाऱ्या प्रचितीच्या आईला मी धीर दिला आणि "काळजी करु नका, होईल सगळं सुरळीत" असं आश्वस्त केलं.. "देव करो आणि तुमच्या उपचारांना यश येवो..!" असं बोलून त्यांनी नकळत माझा हात त्यांच्या हातात घेतला.. एका तरुण मुलीचं 'अवघड दिवसांतलं दुखणं' तिला व्यक्ती म्हणून जीवनापासून खूप लांबवर घेऊन गेलं होतं आणि त्याची एका 'मेनोपॉज' झालेल्या आईच्या डोळ्यातील खंत-विवशता आणि 'माझ्या उपचाराने तिची मुलगी बरी होईल', हा भाबडा आशावाद तिच्या त्या हाताच्या स्पर्शातून माझ्याही अंतःकरणाला स्पर्श करुन गेला..!
...प्रचितीच्या आईचं सारंकाही लक्षपूर्वक ऐकत असतानाच मी जुन्या फाईल्स मधील रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शन्स चेक केलेच होते... "प्रचितीसोबत मला थोडं एकांतात बोलायचंय", म्हणून मी तिच्या आईला थोडा वेळ केबिनच्या बाहेर बसायला सांगितलं.. प्रचिती आतापर्यंत काहीच बोलली नव्हती.. तिच्या मनाची अस्वस्थता आणि अस्थिरता मी नजरेनंच टिपत होते.. तिची भिरभिरणारी नजर कधी टेबलवरच्या कॅलेंडरवर, तर कधी भिंतीवरल्या गणपतीच्या फोटोफ्रेमवर...!..मी तिच्याशी साध्या गप्पागोष्टी करत, हळूहळू तिला बोलतं करायचा प्रयत्न करु लागले.. सुरुवातीला ती नुसतंच माझ्या डोळ्यात बघत, थोडा अंदाज घेत, विचार करत मोजूनमापून बोलत होती.. बोलताना थोडी चाचरत होती.. तिला स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आणि माझ्याबद्दलही विश्वास वाटत नाहिये, हे मला दिसत होतं...ती कशीबशी शब्दांची जुळवाजुळव करत, जेमतेम उत्तरं देत होती.. पण, हळूहळू ती मोकळं बोलायला लागली आणि माझं हिस्ट्री टेकिंग सोपं झालं...!
प्रचितीचा हा सगळा त्रास म्हणजे PCOD, अर्थात Poly Cystic Ovarian Disease..!..हाॅर्मोन्सचं असंतुलन, जंक फूड-तळलेले पदार्थ-साखर जास्त असलेले पदार्थ सतत खाणं, लठ्ठपणा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव, अस्वस्थ जीवनशैली, चयापचय (मेटाबोलिझम) क्रियेतील बदल, अनुवांशिकता, प्रदूषण, केमिकल्स, पर्यावरणीय अशी या आजाराची अनेक कारणं असतात... प्रचितीला मी या गोष्टींचं महत्त्व सांगताना, त्यासोबतच आहार-शारिरीक व्यायाम याबद्दल महत्त्वाचे बदल सुचवले आणि होमिओपॅथिक ट्रिटमेंट चालू केली..
एका महिन्यानंतर जेव्हा प्रचिती फॉलोअपला आली, तेव्हा तिची मासिक पाळी नुकतीच येऊन गेलेली होती. तिचा थकवा आणि आळस तर कुठल्या कुठे पळून गेलेला होता...आता ती तजेलदार आणि कॉन्फिडन्ट दिसत होती.. तीन महिन्यांच्या ट्रिटमेंटनंतर प्रचितीची पाळी 'मासिकतेचा धर्म' पाळायला आता नियमितपणे वेळेवर तर येतेच, शिवाय ती आता सगळ्या शारिरीक-मानसिक त्रासांपासूनही पूर्णतः मुक्त झाली.. तीन महिन्यांनंतर तिची सारी औषधंही मी बंद केली...शेवटच्या फॉलोअपच्या वेळचा प्रचितीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि तिच्या आईच्या डोळ्यांतले आनंदाश्रू मलाही खूप छान आणि समाधानी फीलिंग देऊन गेले...!!
©️ डॉ. पल्लवी चौधरी-मिसाळ
हिलिंग पर्ल्स होमिओपॅथिक क्लिनिक
चिंतामणी कॉम्प्लेक्स, माधवबाग कॉलनी,
शिवतीर्थ नगर, कोथरुड, पुणे- ३८
मो. +९१ ९०११०५५०४२
ईमेल:- drpallavichaudhari123@gmail.com