07/02/2025
मॅडम अहो माझी सतत मान दुखतेय,पाठ दुखतेय,
मान अखडल्या सारखी वाटतेय,हाताला मुंग्या यायला लागल्या आहेत...काय होत असेल हो ?अशा कंप्लेंट घेऊन येणारे रुग्ण दिवसा गणिक वाढत आहेत.
यात सर्व वयोगटातील रुग्ण असतात.म्हणजे अगदी १५ वर्षा पासुन पुढे.....
याला आम्ही मेडिकलच्या भाषेत Occupational हजार्ड म्हणतो.म्हणजे आपल्या कामामुळे किंवा कामाच्या चुकीच्या पद्धती मुळे होणारे शरीरावरील दुष्परिणाम....बरेचदा लहान पणापासून काही सवयी बिघडतात.पलंगावर ,सोफ्यावर बसून ,झोपून अभ्यास करणे....यामुळे पाठीवर वाकडे तिकडे ताण येतात.पण लहानपणी याचा त्रास होत नाही.कारण आपले आंग लवचिक असते.जसजसे वय वाढते तसा शरीराचा लवचिकपणा कमी व्हायला लागतो.
आणि मग चुकीच्या posture मुळे त्रास व्हायला लागतो.
माझ्या क्लिनिक मध्ये तर सोफ्यावर वाकडे बसून सतत अभ्यास केल्याने पाठीचे मणके झिजलेले मी पाहिले आहेत.
कोरोना काळात तर परिस्थिती आणखीन बिघडली.work फ्रॉम होम मुळे माणसे घरून कामे करायला लागली.बसण्याची व्यवस्था नीट नसल्याचे पलंगावर , सोफ्यावर वाकडे तिकडे बसून, झोपून काम सुरू झाले.
आणि मान,पाठ,हात...सगळ्याची वाट लागली.
म्हणून शरीराचे नुकसान होऊ नये यासाठी फिजिओथेरपिस्ट म्हणून मी लोकांना काही गोष्टी सुचवते...
१)कामासाठी किंवा अभ्यासासाठी , वाचनासाठी नेहमी एक योग्य खुर्ची आणि टेबल चा वापर करा.
२)शक्यतो पाठ खुर्चीला टेकली पाहिजे.नसेल टेकत तर मगे एक उशी ठेवावी.
३)काम करताना ताठ बसावे,पुढे वाकून बसू नये.
४)पाय जमिनीवर टेकलेले असावे.
५) दर दोन तासाने थोडे चालावे,मानेचे व्यायाम करावे
६) लॅपटॉप वापरताना मान वाकणार नाही एव्हढ्या उंचीवर ठेवावा.
७)शक्यतो दोन्ही हाताची कोपरे टेबल वर टेकून काम करावे.
अशा प्रकारे काळजी घेतल्यास शरीरावरचा ताण खूप प्रमाणात कमी होऊ शकतो आणि अनेक व्याधींना प्रतिबंध होऊ शकतो.
डॉ सुवर्णा भावे